esakal | ढिंग टांग : निर्णय, घोषणा आणि पॉलिटिक्स!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : निर्णय, घोषणा आणि पॉलिटिक्स!
sakal_logo
By
- ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्‍स, वांद्रे (बुद्रुक)

वेळ : निजानीज!

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर बॅब्स...हौज यु अं?

उधोजीसाहेब : (कानटोपी आणि मास्क चढवत) माझ्या खोलीत हल्ली असं कुणी येत नाही रे! बेधडक धाडकन दार ढकलून!! मी या महाराष्ट्राचा कारभारी आहे, एवढी तरी जाणीव ठेव!!

विक्रमादित्य : (खांदे उडवत) हॅ:!! सगळेच येतात असेच! मी स्वत: पाहिलंय! तुम्ही सोडून तुमच्या खोलीच्या दारावर कुणीही टकटक करत नाही!! तुम्ही मात्र स्वत:लाच विचारता, ‘मी येऊ?’ मग आत जाता! हाहा!!

उधोजीसाहेब : (संतापून) चेचीन!

विक्रमादित्य : (आश्चर्यानं) ...आणि हे काय? तुम्ही घरातही मास्क लावता? कमालच झाली! घरात कुणी मास्क वापरतं का?

उधोजीसाहेब : (दोन बोटे दाखवत) दोन-दोन!

विक्रमादित्य : (थक्क होत) दॅट मेक्स इट फोर! धिस इज टू मच हं बॅब्स! काळजी घ्यायला हवी हे ठीक आहे, पण इतकी?

उधोजीसाहेब : (कुजबुजत) शुऽऽ...हळू बोल! रात्र वैऱ्याची आहे!

विक्रमादित्य : (कोरडेपणाने) नाइट कर्फ्यू आहे, हे ठाऊक आहे मला! कधी एकदा ही पीडा टळतेय, असं झालंय मला! कित्येक दिवसात रात्री साधं आइसक्रीम खायला जाता आलेलं नाही! दारावर कुल्फीवालाही हल्ली येत नाही! छ्या:!!

उधोजीसाहेब : (गंभीरपणाने) सगळ्यांनी मास्क वापरला तर हे सगळं शक्य होईल! मी कधीपासून लोकांना सांगतोय, अरे काळजी घ्या, मास्क लावा, हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, गर्दी करू नका!! पण माझं कुणी ऐकेल तर ना? शेवटी मनावर दगड ठेवून मला कडक निर्णय घ्यावा लागला!

विक्रमादित्य : (शोधक नजरेने) कुठाय?

उधोजीसाहेब : (चमकून) काय?

विक्रमादित्य : (दोन्ही हाताने फुटबॉलचा आकार दाखवत) दगड!

उधोजीसाहेब : (खवळून) मनावर ठेवलाय! तुला दिसणार नाही! चेष्टा करतोस माझी? करा करा, चेष्टा करा! पण शेवटी माझंच खरं ठरेल, हे लक्षात ठेवा! कितीही उड्या मारल्यात तरी माझंच ऐकावं लागेल सगळ्यांना!

विक्रमादित्य : (गरागरा डोळे फिरवत) कोण्णीही ऐक्कत नाहीए तुमचं! लस मोफत देणार म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला स्वत: सांगायला हवं होतं! पण बाकीच्यांनी आधीच सांगून टाकलं होतं! मग मलाही सांगावं लागलं!

उधोजीसाहेब : (काकुळतीला येत) मी तरी काय करु? क्याबिनेट बैठक झाल्यावर खुर्चीतून उठून बाहेर येईपर्यंत दाराच्या जवळ बसलेले मंत्री आधी सटकून पत्रकारांना सांगून टाकतात! मी थांबा, थांबा म्हणून सांगत असतो, कोणीही थांबत नाही! कधी एकदा बाहेर जाऊन टीव्ही क्यामेऱ्यांसमोर उभा राहातो, असं होतं त्यांना!

विक्रमादित्य : (हात वर करत) मी मोफत लसीकरणाबद्दल जाहीर केलं, पण लगेच ट्विट डिलीट केलं हं!

उधोजीसाहेब : (उपहासाने) थँक्यू! महाराष्ट्र आपला आभारी आहे!

विक्रमादित्य : (युक्ती सुचवत) तुम्ही एक भन्नाट आयडिया का करत नाही? लस मोफत मिळणार नाही, असं बैठकीत जाहीर करायचं! बाकीचे लोक धडाधड बाहेर येऊन टीव्हीवाल्यांना सांगतील! मग आपण सावकाश बाहेर येऊन ‘निर्णय बदलला’ असं सांगून टाकायचं! आहे काय नि नाही काय!! कशी वाटली माझी आयडिया?

उधोजीसाहेब : (कौतुकानं) शाब्बास! बाळा. बाळा, बालिष्टर का नाही रे झालास? जय महाराष्ट्र!