esakal | ढिंग टांग : करेक्ट कार्यक्रम!

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : करेक्ट कार्यक्रम!
sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

प्रिय (माजी) मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. फारा दिवसांनी आपल्याला पत्र लिहिण्याचा योग येत आहे. आपला कारभार सोडला तर बाकी सारे सुक्षेम असेल , अशी अपेक्षा आहे. तुम्ही सांगितल्यानुसार रोज वारंवार हात धुण्याचा करेक्ट कार्यक्रम सुरु आहे. दुहेरी मास्कदेखील वापरतो आहे. (टीव्हीला बाइट देण्यापुरता मात्र काढून खिशात ठेवतो.) सुरक्षित अंतराचा नियम पाळत आहे. चिंता नसावी!

कालचा दिवस समाधानाचा गेला. समाधानाचा म्हंजे शब्दश: समाधानाचा. बंगालमध्ये आमच्या पक्षाला भरघोस यश मिळाले, आणि त्याच वेळी मंगळवेढा-पंढरपुरात राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम झाला. आमचे श्रीमान समाधान आवताडेजी निवडून आले. आपण खरोखर निवडून आलो आहोत, यावर त्यांचा स्वत:चाच विश्वास बसत नव्हता. एकदा तर बेसावधपणाने त्यांनी स्वत:च ‘छ्या, असं कसं हुईल? फेरमोजणी घ्या’ असे म्हटले. त्यांना ताबडतोब आतल्या खोलीत पाठवण्यात आले. आमचे लोकल कमळाध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर तर काल रात्रीच (नाइट कर्फ्यू असल्याने लपत छपत) शुभ्र झब्बा परिधान करुन आले. मी विचारले, ‘‘ कुठल्या कार्यक्रमाला निघालात?’’ ‘‘करेक्ट कार्यक्रमासाठी! तुम्ही अजून तयार नाही झालात?’’ त्यांनी उलट विचारले. कशीबशी समजूत घालून त्यांना परत पाठवले. असो.

मंगळवेढा-पंढरपूरच्या विजयासाठी आम्ही बरेच कष्ट घेतले होते. त्याचे चीज झाले. परंतु, कालपासून जो भेटतो तो मला एकच प्रश्न विचारतो आहे की आता सरकारचा करेक्ट कार्यक्रम कधी? काय उत्तर द्यायचे हा प्रश्नच आहे. ‘वेळ आली की करुच’ असे सांगून सध्या वेळ मारुन नेत आहे. आपण मनावर घेऊ नये!

सध्या आपली लढाई कोरोनाशी आहे, हे आता आम्हाला (निवडणुकांचा खेला आटोपल्यानंतर) पूर्णत: पटले आहे. तेव्हा सध्या तरी तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. काही दिवसांनंतर करेक्ट कार्यक्रमाची तारीख कळवीनच. आपली उपस्थिती प्रार्थनीय नव्हे, अनिवार्य राहील. तुमचा पास मजजवळ राखून ठेवला आहे. आठवणीने मागून घेणे.

कळावे. आपला (माजी) मित्र. नानासाहेब फ.

नाना-

जय महाराष्ट्र. तुमचे पत्र सॅनिटाइज करोन घेतले, मग वाचले. आम्ही ते एरवीही सॅनिटाइज केलेचि असते. पण ते जावो दे. पंढरपुरातल्या पोटनिवडणुकीतील आमच्या आघाडीचा उमेदवार पडिला, त्याचे आम्हाला विशेष दु:ख नाही, कारण त्याच वेळेस पश्चिम बंगालच्या रयतेने तुमचा करेक्ट कार्यक्रम केला. वेळवखत पाहोन जनता सर्वांचाच करेक्ट कार्यक्रम करते, हा धडा यातून आपण शिकला काये? आमच्या पराभवापेक्षा तुमचा पराभव अधिक आनंददायक आहे. आमच्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही टपोन बसलेला आहा, हे आम्हास ठावकीं आहे. पण तुमचा बेत तडीस जाणार नाही, याची खातरी बाळगावी. नपेक्षा अपेश पदरी पडोन नवाच करेक्ट कार्यक्रम होईल.

चौदा महिन्यांपूर्वी आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम एकदा नव्हे, दोनदा केला होता याची याद आहे का? एकदा दिवसाढवळ्या आणि एकदा भल्या पहाटे! नको तेथ हात घालो जाल, तर भाजेल, हे ध्यानी धरावे! तुमच्या करेक्ट कार्यक्रमाची करेक्ट तारीख आधी जाहीर करा, तिकिटविक्री आम्ही करु! बाकी काय लिहावे? सुज्ञास सांगणे लगे, अज्ञांस न लगे.

उधोजी.

वि. सू. : डब्बल मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा! किंबहुना धुवाच!!