esakal | ढिंग टांग : बाण जाती वाया वाया…!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : बाण जाती वाया वाया…!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्लव नाम संवत्सर श्रीशके १९४३ ज्येष्ठ शु. पंचमी (कुमारषष्ठी)

आजचा वार : नमोवार…म्हंजे गुरुवार!

आजचा सुविचार : कशास कष्टविसी काया। बाणा जाती वाया वाया । तेच बाण उचलोनिया। मारितसे धनुर्धर।।

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी काहीही म्हणो, मला मात्र सध्या बारा हत्तींचे बळ आले आहे. फारा दिवसांनी काहीतरी ‘जिंकलो’ आहे! धर्मयुद्ध टाळण्यापूर्वीच एक ‘प्री-धर्मयुद्ध’ आमच्याच पक्षात पेटले होते. ते शेवटी मीच जिंकले, याचे विलक्षण समाधान वाटते आहे. माझ्यावर सोडण्यात आलेले सर्व बाण कुचकामी ठरले.

युद्धाचे रणशिंग फुंकणारांची पंचाईत झाली. हे म्हंजे रणशिंग फुंकण्यासाठी ओठांवर ठेवावे, आणि त्याचवेळी समोर उभ्या असलेल्या कार्ट्याने चिंचेचे बुटुक चोखत रोखून बघावे, तसे झाले. जितम जितम!

आजही दिल्लीदरबारी माझ्याच शब्दाला वजन आहे, हे इतरांना त्यानिमित्ताने कळले, हे बरेच झाले. पावणेदोन वर्षापूर्वी सत्ता थोडक्यासाठी माझ्या हातातून गेली. ‘मी पुन्हा येईन’ असे मी म्हटले, तर त्याचीही टिंगल केली गेली. पण मी ठरवले होते की, सत्ता नसली म्हणून काय झाले? आपण मुख्यमंत्र्यासारखेच वागायचे. काही लोक अजूनही मलाच ‘मा. मु.’ मानतात. जे लोक मानत नाहीत, त्यांनी आता हे मानले पाहिजे की, दिल्लीतील पक्षश्रेष्ठीही मलाच ‘मा. मु.’ मानते. मी दिल्लीला गेलो की मला ते ‘आवो, सीएमसाहेब!’ असेच प्रेमाने पुकारतात, आणि (प्रेमानेच) डोळे मिचकावतात! पक्षश्रेष्ठींना माझे पुन्हा एकदा वंदन असो!!

युद्ध कुठलेही असो, जिंकणार मीच, ही आता काळ्या फत्तरावरची रेघ आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (आणि आमच्या विरोधकांनी) आतातरी हे लक्षात घेतले पाहिजे. साक्षात परमगुरु नमोजी आणि गुरुवर्य मोटाभाई यांचा वरदहस्त लाभलेल्या शिष्योत्तमाला पराभवाचे भय बाळगण्याचे कारणच काय? तेव्हा तात्पर्य इतकेच की, शहाण्या माणसाने माझ्या नादाला लागू नये, नसत्या गमज्या मारु नयेत. तसे केले, तर पदरी अपयश ठरलेले!

दिल्लीत अजूनही माझाच शिक्का चालतो, हे काही लोकांना पाहवत नाही. म्हणूनच ‘मी केंद्रात जाणार, दिल्लीला जाणार, महाराष्ट्रातली पीडा टळणार’ अशा आवया उठवण्यात आल्या होत्या. काही काळ माझाही त्या आवईवर विश्वास बसला. पण मागल्या दिल्ली भेटीत मा. मोटाभाईंचा कोरा चेहरा बघून समजून गेलो! परतल्यावर जाहीर केले, ‘‘मी पंचवीस वर्षे महाराष्ट्रात राहणार!’’ माझे हे वक्तव्य ऐकूनच काही जणांचे बहुधा धाबे दणाणले. त्यांनी मला घायाळ करण्यासाठी बाणांवर बाण सोडले. तेच उचलून मी त्यांच्यावर सोडले! माझ्यासारखा धनुर्धर आमच्या पक्षात आहे का कोणी? काल आमचे कमळाध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर आले, आणि त्यांनी मला अभिनंदनाची टाळी दिली. ‘कमाल केलीत!’’ ते म्हणाले.

‘तुमच्या कोल्हापुरात काय म्हणतात हो ते?,’’ मी विचारले. ‘‘आपल्याशी वाकडं तर नदीला लाकडं!’’ त्यांनी सुचवले.

‘छे छे, दुसरंच असतं काहीतरी…!’’ मी. त्यांनी बरेच डोके खाजवले. मग काहीतरी आठवून जीभ चावली, स्वत:शीच ‘नको नको ते नको!’ असे पुटपुटत आणखी विचार केला.

‘‘टांगा पल्टी घोडे फरार?’’ मा. चंदुदादा. ‘‘करेक्ट! या प्री-धर्मयुध्दात आमच्या विरोधकांची तीच गत झाली की नाही?’’ मी म्हणालो.

…त्यांनी पुन्हा एकदा टाळी दिली.

loading image