esakal | ढिंग टांग : घरातले अभंग!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : घरातले अभंग!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

देखिता आभाळ । देखतची राही ।

काहीचिया बाही । दिसो लागे ।।

मेघे साकारिले । तुझे रुप माये ।

वेडावुनी जाये। जीव माझा ।।

आभाळ अंगण । आभाळ ओसरी ।

आभाळ पंढरी । झाली झाली ।।

देखिला किरीट । गळा तुळशीमाळ ।

कानींचे कुंडल । लोंबती गे ।।

कासे पितांबर । कर कटेवरी ।

नभात पंढरी । सजली गे ।।

वाहे चंद्रभागा । वरतूनी खाली ।

सुस्नात हो झाली । प्रिथिमी माय ।।

कडकडे वीज । कोसळे आवेगीं ।

जणू तुझ्यालागी । एक झाली ।।

विठू माझा आता । डोलतो शिवारी ।

घेतो भार शिरी । भक्तांसाठी ।।

रोज कोठे कोठे । भेटतो गा देव ।

मनीं भक्तीभाव । दाटे तेव्हा ।।

देव घरीदारी । देव इस्पितळी ।

शुभ्र वस्त्रांतळी । देव आहे ।।

सावळे सुंदर । रुप मनोहर ।

ऐसा विश्वंभर । उभा ठेला ।।

युगे अठ्ठावीस । विटेवरी उभा ।

मागे दिव्यशोभा । झळाळते ।।

विठुच्या अंगणी । कैवल्याचे झाड ।

त्यासी येई पाड । अमृताचा ।।

रत्नकीळ प्रभा । साकळे अंतरी ।

देह हा पंढरी । झाला काय ।।

तेजाचा तो पुंज । आनंदाचा कंद ।

भक्तिचाच छंद । जडवितो ।।

तरी विश्वंभरा । न ये तुझी साद ।

जाहलो मोताद । दर्शनाला ।।

पडिले अंतर । नाही दृष्टभेट ।

पंढरीची वाट । दूर राहे ।।

दूरता तुझी ना । होतसे सहन ।

मग अंतरभान । कैसे पाळू?।।

शिवशिवती पाऊले । मन घेई ओढ ।

जित्याची गा खोड । जात नाही ।।

अवखळ वासरु । माये देते ढुशा ।

तैसी माझी मनशा । तुला छळे।।

हट्टी माझे मन । धावे तुझ्या पायी ।

ऐकतचि नाई । काई केल्या ।।

मनींची हुरहूर । उतावीळ गत ।

माझे मनोरथ । सोळखांबी ।।

करोनी प्रपंच । सारे यथासांग ।

फेडायाचे गा पांग । वारीमध्ये ।।

ऐसे घोकुनिया । बैसलो घरात ।

देखिले मनात । तुझे रुप ।।

आता माझे मन । झाले गा पंढरी ।

वाहते अंतरी । चंद्रभागा ।।

तुझे आणि माझे । नुरे काही मत ।

भक्तीचे अद्वैत। साकारिले ।।

loading image