esakal | ढिंग टांग : फ्रेंडीन्नीड इज ए फ्रेंडिंडिड...!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : फ्रेंडीन्नीड इज ए फ्रेंडिंडिड...!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

परममित्र मा. उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हाला मैत्रीदिनाचा हार्दिक शुभेच्छा. खरे सांगतो, आपल्या मैत्रीचा मला खूप खूप अभिमान वाटतो. इतका की, -बंद खोलीत नव्हे- जाहीररित्या साऱ्या जगाला ओरडून आपल्या मैत्रीबद्दल सांगावेसे वाटते. पण काय करणार? जालिम दुनियेला आपली मैत्री पाहावत नाही. आपली मैत्री अशीच अखंड राहो, हीच या पवित्र दिवशी प्रार्थना.

हर एक फ्रेंड जरुरी होता है, असे एक सुभाषित मी ऐकले होते. किती खरे आहे! काहीही (आणि काहीच्या काही) झाले तरी आपण मित्र होतो, आहोत आणि यापुढेही राहणार आहोत. हल्ली आपली गाठभेट दुरापास्त झाली आहे. कुणीतरी आपल्या मैत्रीत बिब्बा घातला! पण ते जाऊ दे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात शाहूपुरी (सहावी गल्ली) येथे आपण दोघे आमनेसामने आलो. त्याचे खरे श्रेय तुम्हालाच. तुम्ही शाहूपुरीच्या चौथ्या गल्लीत होता, आणि मी सहाव्या! ‘‘आहात तिथेच थांबा, मी येतोय!’’ असा तुमचा (दोन गल्ल्या सोडून) निरोप आला. मला नवल वाटले. म्हटले, काय हा नियतीचा खेळ! दोन घट्ट मित्र एकाच एरियात आणि दोन वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये हिंडताहेत! राजकारणातही आपले असेच काहीसे झाले. नाही का?

तुम्हाला भेटायला (खरे तर) घट्ट आलिंगन द्यायला मी पुढे धावलो होतो. पण तुम्ही चपळाईने सॅनिटायझरची बाटली पुढे केलीत! -माझा निम्मा हुरुप तिथेच गेला!! अखेर लांबूनच हात जोडून नमस्कार करण्यावर समाधान मानून घेतले. पण ते जाऊ दे. भेट झाली हे महत्त्वाचे.

आपण दोघे शाहुपुरीच्या (सहाव्या गल्लीत) हजारपाश्शे लोकांच्या गराड्यात उभे राहून एकमेकांच्या कानात काय बोललो, याबद्दल महाराष्ट्रभर कुतुहल दाटून आले आहे. भेट झाली त्या ठिकाणी मैत्रीस्मारक उभे करावे का? असा विचार काहीजणांनी व्यक्त केला आहे. कृपया, आपले मत कळवावे!

गरजवंतासारखा मित्र नसतो. फ्रेंडिन्नीड इज एक फ्रेंडिंडिड, असे म्हटलेच आहे. गरज पडल्यावर भेटूच! दोघे मिळून एक प्लेट बटाटावडा खाऊ. बाकी क्षेम. आपला जीवश्चकंठश्च मित्र. नानासाहेब फ.

ता. क. : बाय द वे, कोल्हपूर, सांगली आणि कोकणातील महापुरासंदर्भात सतरा तांतडीच्या बाबी आणि नऊ दीर्घकालीन उपाय सुचवणारे पत्र तुम्हाला पाठवले आहे. कृपया वाचून घेणे. नाना.

नानासाहेब-

रीतभात म्हणून काहीएक चीजवस्तू असते. तुम्हाला कल्पना नसेल! शिष्टाचार न पाळणे, बंद खोलीतली आश्वासने जाहीररित्या नाकारणे असल्या गोष्टी आम्हाला चालत नाहीत! दोन गल्ल्या पलिकडे तुम्ही उभे आहात हे कळले म्हणून आम्ही निरोप पाठवला होता, इतकेच.

आपण एकमेकांच्या कानात काय बोललो? असे मलाही अनेकांनी विचारले. विशेषत: आमच्या महाविकास आघाडीत प्रत्येकाकडे संशयानेच पाहिले जाते. तुम्ही माझ्या कानात ‘कूऽऽक’ केलेत, म्हणून मी तुमच्या कानात ‘कूऽऽक...कूऽऽक’ केले, असे उत्तर मी दिले आहे. तुम्हीही कृपया तसेच सांगावे. ‘आमचं ठरलंय’ असे (मागल्यावेळेसारखे) खोटेनाटे काहीही सांगू नये, ही हात जोडून नम्र विनंती!

हल्ली आम्ही नवे ‘फ्रेंडिन्नीड’ जोडले आहेत, त्यांना आधी मैत्री दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यातून उरल्याच तर तुम्हालाही देतो! कळावे. आपला. उधोजी. (कारभारी, म. रा.)

ता. क. : तुमचे पत्र मिळाले. सतरा तातडीच्या बाबी आणि नऊ दीर्घकालीन उपाय!! सवडीने वाचीन!

loading image
go to top