esakal | अग्रलेख : कोण मेले...कुणासाठी?
sakal

बोलून बातमी शोधा

editorial

अग्रलेख : कोण मेले...कुणासाठी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ऑक्सिजनअभावी देशात एकही बळी गेल्याची माहिती मिळालेली नाही, हे नवे नेतृत्व लाभलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यसभेत सांगण्यात आले. आदरणीय मनसुखभाई मंडाविया यांनी या खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोकांच्या अपेक्षा उंचावल्या. त्याला साजेसे भाषण करायला हवे, या हेतूनेच बहुधा आपल्या पहिल्या तडाखेबंद भाषणात कोरोनाच्या हाताळणीबाबत सरकारने उत्तम कामगिरी केल्याचे त्यांनी सांगून टाकले. मनसुखभाई, देशाला आपल्यासारख्या संवेदनशील, द्रष्ट्या आरोग्यमंत्र्याची गरज होतीच, ती पूर्ण झाली. तीन दिवसांपूर्वी संसदेत आपण केलेले पहिलेच भाषण ऐकून आमच्या श्रुती अगदी धन्य धन्य जहाल्या! अर्थात, आपले अत्यंत मनोज्ञ आणि विचारांना चालना देणारे भाषण सर्वांनी आवर्जून ऐकले पाहिजे, असे खुद्द पंतप्रधानांनीच बजावून सांगितले होते.

या भाषणानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी भारतात एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, ही वस्तुस्थिती तुमच्या खात्यातर्फे राज्यसभेत सांगण्यात आली. आम्ही आपले नसत्या भ्रमात आणि अनामिक भीतीच्या जाळ्यात गुरफटून बसलो होतो. ऑक्सिजनच्या अभावी कोण कुठे मेले? हा सरकारचा अप्रत्यक्ष सवाल चारशेचाळीस व्होल्ट्‍सचा झटका देऊन गेला, हे मात्र खरे. तुमच्या संसदेतल्या भाषणावर आणि त्यानंतरच्या लेखी उत्तरावर काही नकारात्मक विचारांच्या काँग्रेसी विरोधकांनी जे काही काहूर माजवले आहे, तेही आता अनाकलनीय वाटू लागले आहे. तुमच्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची ग्वाही दिली. किती खरे आहे हे! गेलेल्या आप्ताची घुसमट आठवून आठवून आम्ही जनसामान्य उगीचच इतके दिवस अश्रू ढाळत बसलो. जे घडलेच नाही, तेच मनात उगाळत बसलो.

मुळात कोरोनासारख्या शतकातून एकदाच येणाऱ्या महासाथीशी लढणे हे काही येरागबाळाचे काम नोहे. सुदैवाने आपल्या देशाला समर्थ पंतप्रधान आणि आपल्यासारखा संवेदनशील, विवेकी आरोग्यमंत्री लाभला आहे. एरवी तिसऱ्या लाटेला आपण कसे तोंड देणार, या भीतीने तोंडचे पाणीच पळाले असते. केंद्रीय आरोग्य विभाग हा फक्त राज्य सरकारांनी पाठवलेला रुग्ण आणि बळींचा तपशील (डेटा) संकलित करुन प्रसिद्ध करत असतो. राज्य सरकारांनीच ऑक्सिजनबळींचा तपशील पाठवला नाही तर केंद्रीय आरोग्य खाते काय करणार? परंतु, सामान्यजन आणि अतिसामान्य माध्यमे यांना ही साधी तांत्रिक बाबदेखील समजत नाही. खरोखर कठीण आहे! मनसुखभाई, काहीही म्हणा, हल्लीच्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे पुरती बिघडलेली आहेत, हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.- काहीही दाखवतात आणि छापतात! गेल्या एप्रिल-मे महिन्यात या माध्यमांनी किती थैमान घातले होते, आठवते आहे ना?

‘ऑक्सिजन की किल्लत’, ‘ग्यारह मरीजों ने दम तोडा’ वगैरे मथळे आठवतात ना? ते ऑक्सिजनचे सिलिंडर घेऊन धावाधाव करणारे रुग्ण, श्वासाश्वासासाठी तडफडणारे अतिदक्षता विभागातले पेशंट, ऑक्सिजनच्या अभावामुळे इस्पितळांमध्ये उडालेला हाहाकार, एखाद्या बीमार मातेला कडेवर उचलून आकांत करत इस्पितळाकडे धाव घेणारा युवक, ते घाऊकरित्या जळणारे मृतदेह…एक ना दोन, अशी डझनावारी दृश्ये दाखवून दाखवून या वृत्तवाहिन्यांनी डोके नुसते सुन्न केले होते. जयपूरच्या गोल्डन इस्पितळात ऑक्सिजनअभावी डझनावारी रुग्ण दगावल्याचे किंवा कर्नाटकात चामराजनगरच्या इस्पितळात ३६ अत्यवस्थ रुग्णांना ऐनवेळी प्राणवायू न मिळाल्याने, ओढवलेले मरण, असल्याही बातम्या आकडेवारीसकट आल्या होत्या. सगळे खोटे निघाले! ‘ केवळ मनोरंजनाच्या हेतूने सदरील वृत्तकार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून हा कार्यक्रम पूर्णत: काल्पनिक आहे. कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी त्याचा काहीही संबंध नाही, तसा आढळल्यास तो योगायोग समजावा’ असा ‘डिस्क्लेमर’ तरी या माध्यमांनी द्यायला हवा होता. काल्पनिक दृश्ये बातम्या म्हणून दाखवणारी ही माध्यमे…ते काही नाही, यांना वठणीवर आणलेच पाहिजे. म्हातारी ऑक्सिजनअभावी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो!

प्रिय मनसुखभाई, माध्यमांचे एक वेळ सोडा, शहराशहरांत, गावागावांत राहणाऱ्या सामान्यजनांनी त्या काळात काय भोगले, याची नोंदही सरकारी दफ्तरात नसणारच. कारण जे घडलेच नाही, त्याची नोंद कशी ठेवणार? आजही अनेक नातलगांना वाटते, की ऑक्सिजनचा पुरवठा मिळाला असता, तर आपले आप्तेष्ट आज हयात असते, आपल्यासोबत राहात असते. किती भ्रामक समजूत आहे! अहो, सगळे काही ‘वर’ ठरलेले असते, वेळ भरली की जाणारा जातोच. तो नेमका कशाने गेला, ऑक्सिजनच्या अभावाने गेला की, अन्य कुठल्या कारणाने, हे जाणून घेऊन काय मिळवायचे? आयुष्य क्षणभंगुर असते, हे आता आम्हाला पुरते पटले आहे.

राज्यांकडे लसींचा पुरवठासुध्दा पुरेसा असून लसींचा साठा अपुरा पडू देणार नाही, हेही तुम्ही सांगितलेत, ते बरे झाले. आठवडेच्या आठवडे लसकेंद्रांवर खेट्या मारणाऱ्या रिकामटेकड्यांना आता तरी शहाणपण येईल. ‘लस उपलब्ध नसल्याने लस केंद्र बंद राहील’ या पाट्या बघून परत येण्यात त्यांना कुठली मौज वाटते, कोण जाणे! आपल्या भाषणामुळे आम्हा सामान्यांना चांगले बळ मिळाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी झुंजण्यासाठी आम्ही सारे अगदी बळीच्या बकऱ्याप्रमाणे सज्ज झालो आहोत. पण ऑक्सिजनअभावी एकही बळी गेला नाही, किंवा लसपुरवठा व्यवस्थित सुरु आहे, हे सभागृहात सांगताना नव्या आरोग्यमंत्र्यांची जीभ अडखळली नसेल का?

loading image