

Goa Marathi Conference: Mahesh Manjrekar receives Lifetime Achievement Award, celebrating Marathi culture
esakal
न अस्कार! काखेत कळसा नि गावाला वळसा असं म्हंटात ते काही उगाच नाही. ‘शोध मराठी मनाचा’ घेत घेत आमचे परममित्र आणि मार्गदर्शक रामदासस्वामी ऊर्फ फुटाणेनानांनी जग पालथं घातलंन, पण मराठी मनाचा शोध अजून लागतोच आहे! अनेक ठिकाणी हिंडून शेवटी फुटाणेनानांनी यंदा गोव्याच्या भूमीत धाव घेतली. निदान तिथं तरी मराठी मनाचा शोध संपावा? पण छे, नव्याने शोधमोहीम सुरु झाली आहे…
मराठी मनाचा शोध गोयांतच लागू शकतो, असं वाटून फुटाणेनानांच्या जागतिक मराठी अकादमीनं यंदाचं शोध मराठी मनाचा संमेलन पणजीत घेतलं. त्याची ही सुरस, सुरंगी कहाणी! पणजीतल्या सुंदर कला अकादमीच्या वास्तूत संमेलन होणार, आणि तिथं अनेक मराठी मनं बसलेली असणार, या कल्पनेनं मी हरखून गेले होते. तसं घडलंही! अनेक नामवंत मराठी मनं तिथं चोणक, माणक्यो, शेणाण्यो आणि हळसण्यांचा आस्वाद घेत निवांत बसलेली दिसली. बाकी मराठी मनं मासे खाण्यात पटाईत!