ही नटरंगी नार, पाडी पट्टी चोपोनिया पार,हिनं पाटलाला घातलाय डोळा,(जोशी)- कुलकर्ण्याला केलाय खुळा,-मास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी!.न अस्कार! पठ्ठे बापूरावांची ही लावणी गुणगुणत शेजारुन परफ्यूमसारखे दर्वळत गेलेले आमचे विश्वासराऊ बघून माझ्या बै डोळ्यांची धणीच फिटली! काय ते फैनाबाज ज्याकिट, काय त्या व्हटांवर मिश्या, काय ती राजस भाषा!! आहा!वाचकहो, हा मजकूर मी साताऱ्याच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप क्र. १ इथंच एका खुर्चीत बसून लिहित्येय. सुप्रसिध्द खरे केटरर्सचं सुग्रास भोजन बोलावत असूनही मी (तुमच्यासाठी) लिहित्येय….एकच सांगत्ये- या साताऱ्याची तऱ्हाच निराळी! अवघं वातावरण मराठीमय झालंय. काल संध्याकाळी हीऽऽ लांबलचक ग्रंथदिंडी निघाली होती. मी आपली मोती चौकात उभी राहून सगळं नीट बघत होते. ५५ चित्ररथ समोरुन गेले. एका चांदीच्या रथात खुद्द विश्वासराऊ, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे, मराठी साहित्याच्या तंबूचा सध्याचा मधला खांब ऊर्फ मिलिंद जोशी-कोटवाले आणि मसापच्या शाहुपुरी शाखेचे सर्वेसर्वा आणि सातारा संमेलनातले ‘नारायण’ ऊर्फ विनोदवीर कुलकर्णी अशी नामी मंडळी सस्मित नजरेनं रयतेकडे कृपादृष्टीचा कटाक्ष टाकत बसलेली! पुढे रथातून शिवेंद्रसिंहराजे पायउतार झाले आणि अमेरिकेचे खासदार श्रीश्री ठाणेदार चढले. बाकी काही म्हणा, राजे-पाटील, जोशी-कुलकर्णी या चौकडीनं साहित्य संमेलनाची पालखी आपल्या खांद्यावर पेलली..उद्घाटनाच्या कार्यक्रमात स्टेजवर बहुतेक सगळे कोट किंवा जाकिटवाले. अध्यक्षपदी विश्वासराऊ असल्यामुळे की काय कुणास ठाऊक, अचानक उकडायलाच लागलं! साताऱ्यात कडाक्याची थंडी असताना मांडवात गरम का होतंय, कळेना! असो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समयोचित भाषण केलं. पण भाषण वगळता सारा वेळ ते मागल्या सोफ्यावर बसून फोनवर कुणाशी तरी बोलत होते. निवडणुकीचे दिवस असल्यानं हे होणारच. -माझ्या पोटात गोळा! फोनवर बोलायचं, मायक्रोफोनवर बोलले तर नसती पंचाईत! पण तसं नाही घडलं….प्रमुख अतिथी आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. मृदुला गर्ग यांचं बोलणं रसिकांना नीट ऐकूच येत नव्हतं. ‘सुनाई दे रहा है? आवाज आ रही है?’ असं त्या मधूनच विचारत. तेवढं स्पष्ट ऐकू येत होतं. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकरांनी ‘प्रकृतीमुळे हिंडणं जमलं नाही, आता नवे संमेलनाध्यक्ष काय करतात बघू’ असं म्हणत आपल्याकडची सूत्रं पाटलांच्या हाती दिली. त्यांना काय माहीत? या पाटलाचा पाय घरात टिकंना! आधीच पायाला भिंगरी लावल्यागत (लावण्या गुणगुणत) हितं थितं जात्यात! आता सूत्र घेटल्यावर तर मग काई इच्यारुच नगा! पुन्ना असो!.सुरवातीला मी पठ्ठे बापूरावांच्या लावणीतले बोल दिले, ते काही उगाच नाही. खुद्द विश्वासराऊंनी अध्यक्षीय भाषणातही त्यांची नोंद केली आहे. ते म्हणाले, ‘ गावच्या सतरा भानगडी निस्तरताना पाटील, कुलकर्ण्याला युती करावी लागतीच!’ वाह रे वाह! ‘राजकारण्यांना आचारसंहिता असते, आणि ती काही दिवसांचीच असते. पण आम्हा साहित्यिकांच्या क्षेत्रात विचारसंहिता असते, आणि तिचा प्रभाव अनेक दशकं टिकतो,’ असंही पाटीलबावाजी म्हणाले. कोटी बरी होती, पण तितकीशी खरी नव्हती. असो, असो..एकंदरीत, साहित्याचा सातारी जर्दा चांगला जमला आहे. लावण्या-बतावण्या सगळं काही सायसंगीन पार पडलंय. पुढलं साहित्य संमेलन शंभरावं असणार आहे. मामला आणखी जोरदार व्हायला पाहिजे. सातारकरांनी अपेक्षा उंचावल्या आहेत, आणि ९९ ते १०० या एका धावेसाठी विश्वासराव पाटील क्रिझवर उभे आहेत. येऊ द्या फास्ट डिलिव्हरी, गुगली, फ्लिपर…काहीही!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.