नअस्कार! टिळकरोडवरील खलबतखान्यात मसलत ठरली. येकदम पांच-पंधरा निवडक लढवय्यांची फौज घेवोन सुलतानढवा करण्यापेक्षा दोघा-तिघा सिंहाच्या छातीच्या शिलेदारांनाच मोहिमेवर धाडावे. अचानक गनिमी काव्याने हमला करोन कामगिरी फत्ते करावी. तैसेचि घडले….गतसप्ताहातली गोष्ट. पर्जन्यकाळ नुकताच सूर धरो लागला होता. ‘मसाप’च्या कचेरीतून मिलिंदाजी जोशी, विनोदाजी कुलकर्णी आणि आडकर प्रमोदाजी या तिघा शिलेदारांनी तयारी सुरु केली. विनोदाजी म्हणाले, ‘मिलिंदाजीसाहेब, सील करा अंगाला! अन्यथा येक म्हणता येक व्हावयाचे!’‘या मिलिंदाजीस अजून तलक चिलखताची गरज पडली नाही, तर ती आज का पडावी? चला, दही घ्या तळहातावर..,’ मिलिंदाजींनी आश्वस्त केले. हे खरेच होते. या मिलिंदाजींची जुबान म्हणजे केशर, गुलाब, कस्तुरी, चंदनादी परिमळांचा अर्क, आणि त्यात मधुपर्क!! वक्तृत्व हेच चिलखत आणि संभाषणकला हीच वाघनखे!!.प्रमोदाजी आडकर हे तर बोलून चालून ॲडवोकेट. ते कुठल्याही अवघड खटल्यासाठी तयारच असतात. ते पहा, ते तिघेही वीर निघाले! निघाले, अगदी चौटाप दौडत निघाले, मोहीमशीर जाहाले!साहित्य संमेलनाचा सरकारी निधी मिळवण्यासाठी अनेक बैठका कराव्या लागतात. सबब, सरकारी महाकोशाची मीटिंग आहे, ऐसी बतावणी करोन तिघांनीही मुंबईत शिताफीने प्रवेश मिळवला..(संशयास जागा नको, म्हणोन टोलदिखील भरला…) मीटिंगचा उपचार पार पाडता पाडता मिलिंदाजींनी आपले खबऱ्यांचे जाळे कामास लावले, आणि हमल्याचे लोकेशन निश्चित केले. ‘सट्टक’कार प्रा. भालचंद्र वनाजी नेमाडेजी नेमके कोठे राहतात? या सवालातच लोकेशन दडले होते. एका विश्वासू खबऱ्याने अचूक माग काढत सांताक्रुझच्या गावगाड्यात कुठेतरी नेमाडेसर राहतात, हे हुडकून काढले.वास्तविक खुद्द नेमाडेसरांना ॲड्रेस विचारला असता तरी त्यांनी सांगितलाच असता. पण नेमाडेसर मुळात फोन उचलत नाहीत. उचलला तर विविध आवाज काढून ठेवून देतात, असा पूर्वानुभव होता..मिलिंदाजी- विनोदाजी-प्रमोदाजी ही तिकडी फोनबिन करण्याच्या भानगडीत न पडता थेट नेमाडेसरांच्या घरीच धडकली.आधीच हे तिघे ‘मसाप’वाले. म्हणजे उदाहरणार्थ साहित्य संमेलनं वगैरे करणारे. यांना कोण वेळबिळ देऊन भेटेल बिटेल? आधी बंद करा ती संमेलने, मग भेटायचे बघू…असे नेमाडेसरांनी सांगितले तर काय घ्या?.ट्रिंग ट्रिंग…दाराची बेल वाजवली. दारावर पाटी. -‘मराठी वाचा, मराठी वाचवा’. हे म्हणजे थोरच. इंग्लिश भाषा ही फडतूस भाषा आहे. युरोपात तिला कुत्रे विचारीत नाही.…थोड्या वेळाने दोन भरदार मिश्या दारात प्रकटल्या. मिश्यांना चिकटून हुबेहूब नेमाडेसर दाराची चौकट ‘प्यासा’तल्या गुरुदत्तसारखी पकडून उभेच्या उभे! हुबेहूब म्हणजे अगदी तंतोतंत नेमाडे!! इथे विनोदाजींचे भान हरपले. ‘लेखक तो दिसतो कसा आननी?’ याचे उत्तर हेच तर मोहिमेचे फलित होते….मिलिंदाजी, विनोदाजी आणि प्रमोदाजी हे तिघेही शिलेदार संमेलनं फिम्मेलनांच्या नसत्या उठाठेवी करणारे. तरीही नेमाडेसरांनी त्यांस प्रेमभरें जवळ घेतले. दोन तास गप्पा मारल्या. ज्ञानपीठाची ट्रॉफी दाखवली. फडताळावर ठेवलेली ती ट्राफी बघून विनोदाजींचे भान पुन्हा एकदा हरपले. त्यांनी सहज उचलून बघण्याचा यत्न केला. जाम हलली नाही..एकंदरित ऐवज वीसेक किलोचा असणार, याचा अंदाज विनोदाजींनी बांधला. (गेल्याच रैवारी त्यांनी दोन किलो बटाटे घरी नेले होते. असो.) तेवढ्यात नेमाडेसरांनी सहज चहाचा कोप उचलावा तशी ट्राफी उचलून विनोदाजींच्या समोर धरली. म्हणाले, ‘घ्या ना! बघा, बघा!’विनोदाजींचे भान आणखी एकदा हरपले! पुढे आपण पुण्याला परत कसे आलो, हे वारंवार विचारत आहेत, असे समजते!…अशी झाली मोहीम फत्ते!!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.