ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

मी  एक साधा माणूस आहे. नशीबाने दिले, तेवढ्यात समाधान मानणारा. आखिर भाग्य से अधिक और समय से पहले किसको क्या मिलता है?
jharkhand leader home found 35 cr politics
jharkhand leader home found 35 cr politicsSakal

(एका सामान्यजीवाचे दिवास्वप्न..)

मी  एक साधा माणूस आहे. नशीबाने दिले, तेवढ्यात समाधान मानणारा. आखिर भाग्य से अधिक और समय से पहले किसको क्या मिलता है? तरुणपणी स्वप्नं खूप पाहिली. ती सगळी जाहीर सांगण्यासारखी नाहीत.

उदाहरणार्थ, आपल्यालाही एखादी छानशी पत्नी मिळावी. तिने रोज डब्यात फरसबी किंवा कोबीची भाजी द्यावी. (‘चपात्या क्यांटिनमधून घ्या, इथं ग्यास संपलाय घरातला!’ असे ओरडून सांगावे.) आपण इमानेइतबारे नोकरी करावी. साहेबाच्या घरच्या कुंड्यांना पाणी घालावे. त्यांना बाजारातून बटाटे आणून द्यावेत. उरलेल्या वेळेत (त्यांच्या) बंगल्यातले फर्निचर पुसावे.

आमचे साहेब सारखे फोनवर बोलत असतात. त्यांच्याकडे तीन-चार मोबाइल फोन आहेत. आमच्या साहेबांचे साहेब तर फारच मोठे साहेब असावेत. कारण मोठ्या साहेबांच्या घरी बटाटे आणून देण्याचे काम कधी कधी आमचे साहेब करतात.

त्यांच्या घरातल्या कुंड्यांना पाणीही घालतात. इतकेच काय, मोठे साहेब जिथे बसतील, तिथली तीन फूट बाय अडीच फूटाची जागा (येवढी लागतेच!) स्वत:च्या हातरुमालाने साफ करतात. असो.

मोठे साहेब, आणि आमचे साहेब…त्यांचे काय चालते याच्याशी आपल्यासारख्या गडीनोकराचा काय संबंध? मोठ्या साहेबांकडे खोक्यांनी भरलेला एक टेम्पो येतो. तो टेम्पो आमचे साहेब रिकामा करुन घेतात. त्यातले काही खोके घरी नेऊन ठेवायला सांगतात. एखादा खोका तुला ठेव, असे कधी म्हणत नाहीत. पण मी नेतो! एका खोक्याने काय होते? पुन्हा असो.

माझे एक स्वप्न होते…हाडाची काडे करुन पैपै साठवावी, आणि आपल्या संसारवेलीचा मांडव बांधावा. मांडवावर वेल चढावी. वेलीवर दोन फुले यावीत. (दोनच बस्स!) आणि एक दिवस…प्रधानमंत्री आवास योजनेत आपल्याला घर लागल्याचा फोन यावा!

(संदर्भ : अबकी बार…जाहिरात) मोठ्या सोहळ्यात खुद्द पंतप्रधानांकडून घराची चावी मिळवावी. त्यांनी मजकडे बघून गोग्गोड हंसावे. मी त्यांस वांकवांकून नमस्कार करावा. ‘कुछ देनें के लिए आया हूं’ असे त्यांनी म्हणावे. मी लाजून चूर व्हावे.

घर घेतल्याबद्दल साहेबांच्या बंगल्यात सपत्नीक जाऊन पेढे द्यावेत. त्यांनी वाटीत बाकरवडी आणून ठेवावी. (महिन्याभरापूर्वी हीच बाकरवडी आपण मार्केटातून आणली होती, हे आपल्याला नको तेव्हा आठवावे, आणि घास अडावा.) साहेबांच्या बाईसाहेबांनी ‘हं’ असे म्हटल्यावर उठावे.

...नवे घर सजवावे. घराच्या भिंती रंगवून घ्याव्या. न्हाणीघराच्या वरचा पोटमाळा झाकून घेण्यासाठी कारागीर बोलवावा. पलंगालाही हाडपा करुन घ्यावा. लाकडी कपाटे, पेट्या, गुबगुबीत सोफा आणावा. आणि…या सगळ्यात नोटांच्या थप्प्या लपवाव्या!

पलंगावर पाठ टेकवताना रोज आपण या क्षणी मिनिमम पस्तीस कोटी रुपयांच्या ऊबदार रोकडीवर झोपलो आहोत, या कल्पनेने मोहरुन जावे. न्हाणीघरावरल्या पोटमाळ्यावर आणखी पंचेचाळीस कोट दडवलेले आहेत, कपाटामध्ये चोरकप्प्यात सुटी नाणी आहेत, आणि बाकीचे खण नोटांच्या गड्ड्यांनी भरलेले आहे, सोफ्याच्या बैठकीत आणि पाठीतही साठेक कोटी आहेत, इतकेच नव्हे तर घरातल्या फरश्यांखालीही…जाऊ दे.

एक दिवस घराची घंटी वाजावी. दारात चार आगाऊ चेहऱ्याची माणसे उभी राहावीत. त्यांनी ‘ईडी’ किंवा ’आयटी’ एवढेच शब्द उच्चारावे. त्यानंतर दिवसभर नोटा मोजण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम व्हावा!!

घरगड्याकडे नोटांचा डोंगर! नोट गिनते मशीनें थक गईं! करोडपती नौकर!!...हेडलाइनी आणि ब्रेकिंग न्यूज सुरु व्हाव्यात. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपल्याकडे अतिशय आदराने पाहावे. वाह वाह!! कृतार्थतेने आपण भरुन पावावे. असे माझे जुने छोटेसे स्वप्न आहे…दिल क़ो खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है! है ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com