

BJP's Involvement: Vidarbha Literary Union Election Controversy
esakal
प्रिय फडणवीसजी, सविनय प्रणाम. जय हो. हे गोपनीय पत्र मी तुम्हाला मुद्दाम नागपूरच्या ॲड्रेसवर पाठवले आहे. गपचूप वाचा! महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात काय गडबड आहे? माझ्याकडे गंभीर तक्रारी आल्या आहेत.
या घटकेला माझ्या मेजावर तुमच्या नागपूरहूनच आलेले एक स्फोटक पत्र पडले आहे. ते लाल अक्षरात आहे! मराठी भाषेचे लढाऊ सरदार माननीय श्रीपाद भालचंद्र जोशीजींनी ते पाठवले आहे. पत्र वाचून मला तर घामच फुटला!
देवेंद्रजी, तुम्हाला काय सांगू? आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर मी आजवर खुशीत होतो. साक्षात पू. मोदीजींनी मला बोलावून ‘नवीनजी, तुम्ही नवीन आहात. भाजपचे अध्यक्षपद हा काटेरी मुकुट आहे. भले भले थकले. तुम्ही लौकरात लौकर तयार व्हा. अजून खूप चुनाव जिंकायचे आहेत,’ असे बजावले होते. मी मागे हटलो नाही. पण हे पद काटेरी आहे, हे श्रीपाद भालचंद्रांचे पत्र वाचताना तीव्रतेने जाणवले. ‘विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत तुमचा पक्ष थेट हस्तक्षेप करतो आहे, हे खपवून घेतले जाणार नाही,’ असा स्पष्ट दम त्यांनी मारला आहे. त्यांनी तुम्हाला पाठवलेल्या क्रमांक २च्या स्मरणपत्राची कॉपीही जोडली आहे. तुमचीच नाही तर त्यांनी माननीय गडकरीजींचीही तक्रार केली आहे. आता मला सांगा, हा प्रश्न कसा सोडवायचा?