

Literary Elections: Joshi-Kulkarni's Dominance in Maharashtra Sahitya Parishad
esakal
न अस्कार! मराठी माणसाच्या पाचवीला पुजलेल्या निवडणुका थांबायचं नाव काही घेत नाहीत. नुकत्याच महापालिका निवडणुका होऊन गेल्या. अजून महापौरही ठरायचा आहे, पण त्याच्या आतच साहित्यिकांनी नव्या निवडणुकांचं रणमैदान गाजवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा शंखनाद झाला आहे…इथे खुद्द प्रा. मिलिंद जोशी हेच युगंधराच्या आविर्भावात पांचजन्य फुंकीत असल्याचे इमॅजिन करावे! निवडणुकांना तोंड फुटले आहे. सातारची माती अंगाखांद्यावर भिरकावून खुद्द जोशीसर आपुला रथ सामोरा नेत मोरोपंतांची आर्या फेकत विरोधकांस निवडणुकीआधीच नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही इमॅजिन करावे.
पार्थ म्हणे वैराटे रथ कुरुकटकासमीप जाऊ दे,
भोजन करावयातें आले नट कोण कोण पाहू देऽऽ…(रामा रामा हरे हरे…)
मसापच्या निवडणुका गेली कैक वर्षे गाजत आहेत. होण्याआधीच दहाएक वर्ष निरंतर गाजणारी ही लोकशाही व्यवस्थेतली पहिलीच निवडणूक असावी! मसापची ही एक भानगड कुणाला अद्याप समजलेली नाही. दहा वर्षापूर्वी निवडणूक झाली. ती गाजली. मग कोरोना आला, निवडणूक झाली नाही. ती न झालेली निवडणूकही गाजली! मग मुदतवाढ मिळाली, तीही गाजली. आता निवडणुका आल्या, तर त्या बेकायदेशीर आहेत असे कळले. तरीही निवडणुका होतायत म्हटल्यावर ज्यांनी ती बेकायदा ठरवली, त्यांनीच उमेदवारीचे अर्ज भरले!! याला काय म्हणायचे?