
कुरुक्षेत्रावर कौरवसेनेचे सेनापतिपद गुरुवर्य द्रोणाचार्यांकडे आले. ते अतिशय पराक्रमी धनुर्धर होते. अनेक दिव्यास्त्रांचे स्वामी. दुर्योधनाला दिलेल्या वचनाखातर तेराव्या दिवशी कोवळ्या अभिमन्यूचा चक्रव्यूहात घात केल्यानंतर द्रोणांनी पांडवसेनेचा अपरंपार संहार केला. अश्वत्थामा त्यांचा लाडका पुत्र, तोही कौरवांकडून रणांगणात उतरलेला होताच. अजेय द्रोणांना रोखण्यासाठी युगंधर कृष्णाने युक्ती करून भीमाकरवी अश्वत्थामा नावाचा एक गजराज लोळवला, आणि ते वृत्त द्रोणांच्या कानी जाईल, अशी व्यवस्था केली. वृत्त ऐकून विव्हल झालेल्या द्रोणांनी धर्मराज युधिष्ठिराला विचारले : ‘‘युधिष्ठिरा, तू कधीच असत्य भाषण करीत नाही, तूच सांग, माझा अश्वत्थामा खरंच गेला का?’’ त्यावर युधिष्ठिरानं ‘‘होय, गुरुवर, अश्वत्थामा हत: नरो वा कुंजरोवा… माणूस की हत्ती ते माहीत नाही..’’ अर्थात शेवटले शब्द त्याने फक्त पुटपुटले. दु:खावेगाने द्रोणांनी शस्त्रच टाकले. खरे तर ते होते सत्य-असत्याचे मिश्रण. पण त्यातून साधायचा तो परिणाम साधला गेला. एकूणच द्वापारयुगापासून कलियुगापासून हा प्रश्न चिरंतनच राहिला आहे- खरे काय नि खोटे काय?