

Who Counts Pune? : Diary of a Future MP
esakal
ढिंग टांग
मन भरून आले आहे. डोळ्यात आनंदाश्रू उभे आहेत. अखेर जगात देव आहे, आणि तो सारे पाहतो आहे. नमो नम:...नमो मुखे म्हणा, नमो मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? आपण आपले काम निर्मम भावनेने करत राहावे. फळफळावळीची आशा धरो नये. कधी ना कधी फलप्राप्ती होतेच. माझी अवस्था तर आंब्याच्या झाडाखाली वाट पाहात बसलेल्या मोरासारखी होती. वरती आम्रवृक्षाला मोहोर धरला. मग बाळकैऱ्या आल्या. त्या बाळकैऱ्यांच्या कोनदार कैऱ्या झाल्या. त्या पिकल्या. पिकून आंबा पाडाला आला आणि एक दिवस जाळ्या घेऊन माणसे आली, आणि त्यांनी आख्खा आंबा उतरवून खोक्यात भरून नेला. मी आंब्याखाली तसाच! परंतु, तीन दिवसांपूर्वी आक्रीतच घडले. एक पिक्कल आंबा बदकन अंगावर पडला!!
मर्ढेकरांची गणपत वाणी कविता आठवत इतकी वर्षे कंठली. ‘गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी...’ पण नाही, सगळेच काही गणपत वाणी नसतात. श्रद्धा आणि सबुरी ठेवली की चांगले फळ मिळते. मला मिळाले. नमो नम:!