
न अस्कार! ऐका हो ऐका, अतिशय आनंदाची बातमी सकाळी सकाळीच कानावर आली. तळेगाव दाभाड्यातून मावळच्या गुणीजनांना हमेशा आधार देणारे पं. सुरेशकाका साखवळकर यांना यंदाचा अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू? तळेगावच्याच माझ्या अत्यंत आवडींचे साहित्यिक गोनीदांच्या भाषेत सांगायचं तर मन अगदी थुईं थुईं नांचूं लागलं…साखवळकरकाकांच्या जोडीला आणखी बोनस म्हंजे माझ्या अतिशय लाडक्या अभिनेत्री नीनाताई कुलकर्णींनाही ‘जीवनगौरव’ मिळालाय. हा म्हणजे डबल धमाकाच! दोघंही रंगभूमीला अगदी समर्पित आहेत. ‘ऐसी कळवळ्याची जाती। जैसी लाभाविण प्रीती’ या तुकोबाच्या अभंगाला साजेशीच ही मंडळी आहेत. सध्या नाटकांना बरे दिवस आले आहेत. (बरे म्हणजे बरेच बरे!) चांगली चांगली नाटकं रसिकांच्या भेटीला येतायत. त्यातल्या सर्वोत्कृष्ट कलावंतांची नावं पुरस्कारासाठी जाहीर झाली आहेत. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ जूनला माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात पुरस्कार सोहळा होणार आहे.