
समांतर सिनेमातलं ‘सुमित्रा’पर्व...
- सौरभ खोत
बायकांच्या वाट्याला आलेल्या दुःखाला सुमित्रा भावेंनी मोठ्या पडद्यावर मांडलं. समस्या मांडत असतानाच त्या प्रेक्षकाला सहजसोप्या आणि भावपूर्ण उत्तराप्रत नेतात, हे त्यांच्या समांतर सिनेमाचं यश म्हटलं पाहिजे. त्यांच्या निधनाला नुकतंच एक वर्ष झालं, त्यानिमित्तानं.
चित्रपट भारतीय समाजव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. रोजच्या जगण्यात, देहबोलीत, पेहरावात आणि वागण्यात इतर अनेक घटकांसह चित्रपटही असतोच. कांकणभर अधिकच. म्हटलं तर ही घटकाभरची करमणूक आहे. बहुतांश वेळा आपल्या आयुष्याचं ओझं बाजूला टाकून, कल्पनेच्या बऱ्या-वाईट जगात नेणारं माध्यम आहे. पण प्रत्येक कलेत एक अंतर्भूत अशी संवेदनशील शक्ती असते, जी समाजमन, संस्कृती आणि ज्ञानाचा परीघ वाढवण्यासाठी मोलाची ठरते. प्रसंगी शोषित आणि वंचितांच्या दुःखाला आवाज मिळवून देते. चित्रपटकला ही त्यात अधिक प्रभावी आणि सशक्तपणे पोचणारी कला आहे. सुमित्राबाईंसारख्या संवेदनशील व साक्षेपी दिग्दर्शिकेने, ही शक्ती सामाजिक जाणिवा जागृत करण्यासाठी मोठ्या नेटाने वापरली. मुळातच सुमित्रा भावेंची अभ्यासकक्षा ही अचंबित करणारी होती. आपण करतो आहोत त्या कामासंबंधीची त्यांची विचारस्पष्टता आणि निग्रह पक्के होते. व्यावसायिक सिनेमा हा बॉक्स ऑफिसच्या आणि पर्यायाने अनेक तडजोडींच्या खांबांवर उभा असतो. त्यातून खऱ्या प्रबोधनाची, प्रभावाची आणि खोलवर रुजू शकणाऱ्या संवेदनांची रुजवण फारशी होत नसते. मुळी तसं अपेक्षितही नसते. म्हणूनच अनेक अनावश्यक, दांभिक आणि जोखड होऊन बसलेल्या परंपरांवर प्रहार करत, आपल्यातलं मानव्य जागं व्हावं यासाठी समांतर सिनेमाचा नाद कानी पडणं गरजेचं असतं. (भाषा म्हणून) मराठीत समांतर सिनेमाचा हाच संस्कार सुमित्राबाई-सुनील सुकथनकरांच्या प्रयत्नातून रुजवला गेला आणि तदनंतर भाषेच्या चौकटी ओलांडून तो अनेकांचा झाला. अगदी जगभर पोचला.
उत्तराप्रत नेणारा सिनेमा
सुमित्राबाई गांधीवादी विचारांच्या, सामाजिक प्रश्नांच्या मोठ्या अभ्यासक होत्या. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससारख्या (टीस) आघाडीच्या संस्थेतून त्यांचं शिक्षण झालं. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर आणि ग्रामीण, आदिवासी भागातल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर त्यांनी काम केलं. त्यामुळे बायकांच्या वाट्याला आलेल्या दुःखाला त्यांनी मोठ्या पडद्यावर विचारपूर्वक मांडलं. ती दाहकता कुठलाही गाजावाजा न करता प्रेक्षक म्हणून आपल्या बुद्धीत पेरली, आपल्याला अस्वस्थ केलं. फक्त प्रश्न मांडून त्यांचा सिनेमा स्वस्थ बसलेला नाही. त्यांच्या कथेत त्यांनी जगण्यातल्या अपरिहार्य दुःखाची मांडणी केलेली आहेच पण त्यासह त्या प्रेक्षकाला सहजसोप्या आणि भावपूर्ण उत्तराप्रत नेतात. उदाहरणादाखल ‘बाधा’ चित्रपटात येणाऱ्या अंधश्रद्धा, स्त्रियांचं परंपरेखाली भरडलं जाणं, मजूर स्त्रियांचं शोषण आणि ‘सारजाबाई’ या दलित स्त्रीला गैरसमजातून दिली जाणारी वागणूक असे सामूहिक प्रश्न जसे समोर ठेवलेले आहेत तसेच वैयक्तिक दुःखाचे, पात्रांच्या ठायी असलेले भयशंकेचे प्रश्नही समांतर मार्गाने येतात. एका बाईला दुसऱ्या बाईचं बाईपण आकळलं की गुंतागुंत कशी संपते याचं हे उत्तम उदाहरण आहे. मूलबाळ नसलेली सारजाबाई जेव्हा अडलेल्या बाईला मोकळं करते तेव्हा तिचं मनोधैर्य बळावलेलं असतं. म्हणजेच सामाजिक द्वंद्वासह त्या-त्या पात्राच्या वैयक्तिक आयुष्याची गुंतागुंत व संघर्षानंतर मिळणारं आत्मबळ असा परीघ, त्या नितांतसुंदर शैलीत आपल्यापुढे ठेवत.
कठोर वास्तवाचं चित्रण
सुमित्राबाईंनी केलेला अखेरचा चित्रपट म्हणजे ‘दिठी’. चित्रपटाचं मुख्य अंग हे मानवी दुःखाबाबत आणि त्यातही आपण जे एकट्याने भोगतो त्याबाबतचं आहे. पुत्रवियोगाने कोसळलेला रामजी लोहार त्याच्या तीस वर्षांच्या वारीचे दिवस आठवतो आहे. त्या क्षणांना जो काही म्हणून एक अर्थ लाभला होता, त्याचा माग काढू पाहतो. त्यातच गावातल्या शिवा नेमाणेची गाय विण्याच्या अवस्थेला पोचलीये, अडलीये आणि सुटकेसाठी तळमळते आहे. रामजीला तिचा आकांत कळतो आणि तिच्या सुटकेत आपलीही अल्पशीच पण सुटका आहे हे त्याला उमगतं. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी सहवेदना आणि सकारात्मकता या दोन तत्त्वांना केंद्राशी ठेवत पाड्यापालांपासून ते शहरी श्रीमंत घरांपर्यंतची सगळी माणसं, कथानकं दाखवली. समजावून सांगितली. त्यांच्या निर्मितीतून त्यांनी अनावश्यक आणि जबरदस्तीने सामाजिक बदलांचं कडू पिण्यास दिलं नाही. जे सत्य खरोखर कडू आहेच ते त्यांनी गुळाचा खडा हाती ठेवत, आस्थेने भरविण्याचा मनस्वी प्रयत्न केला.
समृद्ध दृष्टीच्या सुमित्राबाई
सुमित्रा भावेंच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा, डॉ. संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित केलेला ‘सुमित्रा भावे-एक समांतर प्रवास’ हा माहितीपट अनेक कारणांनी महत्त्वाचा ठरतो. सुमित्रा भावे हे समांतर सिनेमा निर्मितीमधलं महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी केलेली निर्मिती हा कलात्मक, समाज आणि सामाजिक बदलांना चालना देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. त्यामुळे त्यांची या सर्व संदर्भांतली वैचारिक भूमिका, वैयक्तिक आयुष्याची जडणघडण आणि त्यांना अपेक्षित सकारात्मक बदल याबद्दल दस्तुरखुद्द त्यांनी व्यक्त होणं गरजेचं होतं. ते यातून साध्य झालंय, असं म्हणायला हरकत नाही. व्यक्ती म्हणून असणारं त्यांचं चित्रण, कार्यपद्धती, विचारप्रक्रिया, नाविन्याची आणि समृद्ध परंपरेची असणारी सारखीच ओढ याचा आवाका आपल्या ध्यानी यायला लागते. डॉ. मोहन आगाशे यांनी या माहितीपटात मौलिक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की, काही चित्रपट हे प्रेक्षक आणि अभ्यासकांच्या त्यावरील चर्चेनंतरच पूर्ण होतात. सुमित्रा भावे यांचा सिनेमा याच प्रकारात मोडणारा आहे.
बाईंचे सिनेमे, त्यातली अनेक दृश्यं पाहिली की या वाक्याचा प्रत्यय येतो. त्यांचं प्रतिमा आणि तिच्या ठायी असणाऱ्या नादाचं तंत्र अनेक प्रसंगांमधून जाणवतं. ज्याचे अर्थ आपले आपण जाणून घ्यायचे असतात. या माहितीपटामुळे सुमित्राबाईंच्या कलानिर्मितीकडे सजगपणे पाहण्याची आणि ती खोलवर शिरून समजून घेण्याची समृद्ध दृष्टी अनेकांना येईल, असे वाटते. सुमित्रा भावेंनी विचारपूर्वक हे तंत्र निवडलं आणि त्याद्वारे, येणाऱ्या काळासाठी आपण सामाजिक इतिहासाचा दस्तावेज निर्माण करतो आहोत, या जबाबदारीने त्यांनी कलानिर्मिती केली. आज त्या इहलोकात नसल्या तरी त्यांनी निर्माण केलेले चित्रपट, लघुपट आणि लेखन याहीपुढे संवेदनशील मनांची वाट उजळत ठेवणार आहे.
Web Title: Saurabh Khot Writes Sumitra Bhave Entertainment Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..