- डॉ. दिलीप स. जोगडॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात २४ ऑगस्टला कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. हे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक-धार्मिक कार्यावर दृष्टिक्षेप. .डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची विद्वत्ता, त्यांचा सत्य व न्याय यांवर असलेला दृढ भरवसा, त्यांची गणिती अचूकता आणि सामाजिक प्रश्नांची शास्त्रशुद्ध उकल करण्याची त्यांची हातोटी या गुणांमुळे पुण्यातील आणि एकंदरच पश्चिम भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचे ते मार्गदर्शक ठरले.मुंबईतील डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, भिकोबा चव्हाण आणि इतर काही सदस्यांनी सन १८६७ मध्ये बंगालमधील ‘ब्राह्मो समाजा’च्या धर्तीवर ‘मुंबई प्रार्थना समाज’ ही संस्था स्थापन केली होती..धर्मसुधारणेच्या कार्यात अग्रणी असलेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर या दोघांच्या भक्कम पाठिंब्यानेच हे घडून आले. मुंबईपाठोपाठ सन १८७० मध्ये पुण्यात चिंतामण सखाराम चिटणीस यांच्या पुढाकाराने ‘पुणे प्रार्थना समाजा’ची स्थापना झाली. लवकरच न्या. रानडे आणि डॉ. भांडारकर या दोन्ही संस्थांमध्ये दाखल झाले.प्रार्थना समाजाच्या धर्मविचाराला तात्त्विक बैठक देण्याचे काम न्या. रानडे व भांडारकरांनी केले. डॉ. भांडारकर हे जागतिक मान्यतेचे संशोधक आणि कार्यप्रवण समाजसुधारक व धर्मसुधारक होते. डॉ. भांडारकर यांनी प्रार्थना समाजाच्या धर्मतत्त्वांची मांडणी संतुलित भाषेत केली..प्रार्थना समाज हा कर्मकांडविरहित असा शुद्ध भागवतधर्म आहे असे प्रतिपादन न्या. रानडे यांनी केले, तर डॉ. भांडारकरांनी प्रार्थना समाजाच्या धर्मविचाराला वेदोपनिषदे, भगवद्गीता, अर्वाचीन संतवाड्मय व बुद्धिप्रामाण्यवाद आधारभूत असल्याचे म्हटले.ज्या धर्ममार्गाने आपण जायचे त्या धर्माचे मूळ येथल्या मातीतीलच असावे, या विचारानेच रानडे - भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची उभारणी केली. न्या. रानडे डॉ. भांडारकरांना गुरुस्थानी मानीत. प्रार्थना समाजाने वेदोपनिषदांत वर्णिलेल्या निराकार; परंतु सगुण अशा ब्रह्मस्वरूप परमेश्वराच्या उपासनेचा मार्ग स्वीकारला. भांडारकरांनी आयुष्याची पन्नास वर्षे प्रार्थना समाजाला दिली..पुण्याच्या बुधवार पेठेतील प्रार्थना समाजाची जागा न्या. रानडे यांनी सन १८७७ मध्ये खरेदी करून संस्थेला दान दिली. त्याच जागेवर उभारलेले हरिमंदिर हे भांडारकरांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे आहे. आज हे हरिमंदिर ऐतिहासिक वारसास्थळ आहे.डॉ. भांडारकरांच्या नेतृत्वाखाली पुणे प्रार्थना समाजाने स्थापनेपासून चालू असलेल्या साप्ताहिक ईश्वरोपासना नियमितपणे चालू ठेवल्याच, शिवाय समाजोन्नतीचे कार्य केले. दोनदोनशे स्त्रियांचे मेळे भरवून स्त्रियांना निबंधवाचनासाठी प्रवृत्त केले. ते हरिकीर्तन करीत व पुराणही सांगत. डॉ. भांडारकरांनी सन १९०१ मध्ये पुणे प्रार्थना समाजाच्या अंतर्गत ‘तुकाराम सोसायटी’ स्थापन केली..संत तुकारामांच्या समजावयास कठीण अभंगांचे अर्थ लावण्याचा उद्देश यामागे होता. या सोसायटीच्या सदस्यांनी डॉ. भांडारकरांच्या मदतीने संत तुकारामांच्या शेकडो अभंगांचा अभ्यास केला. याच सुमारास डॉ. भांडारकर यांच्या शिफारशीवरून पुणे प्रार्थना समाजातील त्यावेळचे तरुण सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची निवड ऑक्सफर्ड येथील उदार धर्मशिक्षण शिष्यवृत्तीसाठी झाली. महर्षी शिंदे यांनी प्रार्थना समाजाला कर्मयोगाचा मार्ग दाखवला..डॉ. भांडारकरांनी जीवनातील विविध टप्प्यांवर आवश्यक असलेल्या नामकरण, विवाह, श्राद्धकर्म इत्यादी संस्कारांसाठी संहिता तयार केली. उपासनांमध्ये गाण्यासाठी सुयोग्य अशी अनेक पदे; तसेच मंगलाष्टकेही रचली. प्रार्थना समाजात गायिली जाणारी पदे व मंत्र अनेक ग्रंथांमधून घेतलेले आहेत; उदाहरणार्थ, उपनिषदे, सदस्यांनी रचलेली पदे, संतांच्या रचना, इत्यादी.प्रार्थना समाजात संगीत भजनाचे महत्त्व आहे. त्यासाठी डॉ. भांडारकरांनी त्या काळचे थोर शास्त्रीय गायक अब्दुल करीम खाँसाहेबांचे शिष्यत्व पत्करले. डॉ. भांडारकर विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते; आणि त्यासाठी ‘अथर्ववेद’ आणि ‘ऐतरेय ब्राह्मण’ यांतील दाखले त्यांनी दिले होते. सन १८९१मध्ये त्यांनी स्वतःच्या विधवाकन्येचा पुनर्विवाह लावून दिला..त्याच सुमारास ब्रिटिश सरकारने आणलेल्या संमतिवयाच्या बिलास तत्कालीन पुराणमतवाद्यांच्या विरोधात त्यांनी पाठिंबा दिला. त्यावेळी ‘सुश्रुत’ आणि ‘वाग्भट’ यांच्या ग्रंथांचे संदर्भ देऊन त्यांनी दाखवून दिले की ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावित बिलातील संमतिवयांपेक्षा ‘सुश्रुत’ आणि ‘वाग्भट’ यांनी सांगितलेली वये जास्तच आहेत..या त्यांच्या प्रतिपादनामुळे पुराणमतवाद्यांनी डॉ. भांडारकरांच्या घरावर दगडफेक केली; परंतु ते आपल्या प्रतिपादनावर ठाम राहिले. लोकमान्य टिळक यांनी आयोजित केलेल्या दारूबंदी चळवळीतही त्यांचा सहभाग होता.(लेखक पुणे प्रार्थना समाजाचे सेक्रेटरी, विश्वस्त आहेत.)(‘हौस ऑफ बाम्बू’ हे सदर आजच्या अंकात प्रसिद्ध होऊ शकले नाही- संपादक.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.