संगीताच्या ‘इंद्रधनुष्या’चा वेध...

शंकर- जयकिशन हा शब्द उच्चारताच संगीतप्रेमी रसिकांच्या आठवणी जाग्या होतात
Shankar Jaikishan music composer
Shankar Jaikishan music composer
Updated on

शंकर- जयकिशन हा शब्द उच्चारताच संगीतप्रेमी रसिकांच्या आठवणी जाग्या होतात. मग १९४९ मधल्या ‘बरसात’ पासूनच्या लोकप्रिय गाण्यांची नुसती झड लागते आणि मन प्रणयसंगीताच्या इंद्रधनुष्यात न्हाऊन निघते. संगीतकार शंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांत जयकिशन यांच्या ९४ व्या जयंतीच्या निमित्तानं ‘बियाँड एंटरटेनमेंट’ या संस्थेच्या वतीने पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रविवारी (ता. १३) सायंकाळी त्यांच्या संगीतप्रवासाचा वेध घेणारा कार्यक्रम होत आहे त्यानिमित्तानं...

- सुलभा तेरणीकर

स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला ते बालपणीचे सवंगडी वाटतील. तारुण्यात आणि आता प्रौढ वयात ते मित्र वाटतील. असे संगीतकार म्हणजे शंकर जयकिशन ! खिशात सोन्याची नाणी खुळखुळत असावीत अशा सिनेसंगीताच्या सुवर्णकाळाचे बाल्य, तारुण्य ज्यांनी अनुभवले आहे, त्यांच्यासाठी शंकर जयकिशन हे एखाद्या कुलदैवतासारखे प्रिय आणि पूजनीय.

आज मात्र संगीतकार शंकर यांची जन्मशताब्दी येऊन ठेपली आहे आणि चर्चगेटच्या गेलॉर्डवर बसलेल्या देखणा जयकिशनबद्दल ९४ वी जयंतीचा उल्लेख होतो तेव्हा काळाचा एक मोठा पदर हातातून निसटून गेल्याचे जाणवते. नंतर सिनेसंगीताच्या सूर्याचे किती तरी उदयास्त झाले याची जाणीव होते. ‘झनन झनन झनन घुंगरवा बाजे, आयी हूँमैं सजके, कमर मोरी लचके’ सारखं बालपणी निनादत राहणारं गाणं आठवतं. अनिल विश्‍वास, जयदेव, सज्जाद यांनी अंतर्मुख केलं तरी शंकर- जयकिशन यांच्या संगीताबद्दल फक्त वाटत राहतं की हे तर आपलं भरभरून जीवनरस भरून राहणारं अक्षय्य पात्र!

तबलापटू - हार्मोनियमवादक

खरं तर शंकर रघुवंशी आणि जयकिशन पांचाल ही नावं ही ठाऊक नव्हती. मूळचे पंजाबी. पण मध्यप्रदेशात १९२२ मध्ये १५ ऑक्‍टोबरला जन्मलेले आणि हैद्राबादमध्ये वाढलेले शंकर आणि १९२९ मध्ये ४ नोव्हेंबरला बान्सवाडा (गुजरात) येथे जन्मलेले जयकिशन असे तपशीलही ठाऊक नव्हते. नृत्यकुशल, तबलापटू शंकर आणि हार्मोनियमवादक जयकिशन यांनी आमच्यासाठी रचलेलं गाण्याचं अंबार हेच ठाऊक होतं. त्या दोघांच्या वेगवेगळ्या शैलीही ठाऊक नव्हत्या. फक्त शंकर जयकिशन इतकेच पुरेसं असे.

राजना हवी होती ‘बरसात’

लोकप्रिय संगीत आणि लोकप्रिय सिनेमा यासाठी तळमळणाऱ्या राज कपूरना पृथ्वी थिएटर्समध्ये हे दोघे मिळाले. पापाजींनी- पृथ्वी राजनी कविसंमेलनातून हेरून आणलेले शैलेंद्र, हसरत राज कपूरने पारखून घेतले आणि ईश्‍वरी संकेत असलेला लता मंगेशकर हा स्वरही अचूक दाखल झाला. १९४८ मध्ये ‘आग’च्या अपयशाने पोळून निघालेल्या राजना ‘बरसात’ हवी होतीच आणि तसेच घडले. काश्‍मीरच्या पार्श्‍वभूमीवरची रामानंद सागर प्रणय कथा मुक्त प्रणय, संगीत यांनी चित्रपट संगीतातला नव्हे सिनेमातला बंदिस्तपणा खुला केला.

आज ‘बरसात’ चे संगीत पुन्हा ऐकल्यावर भाबडं मन हळवं होतं. चिकित्सक विचार कुंठित होतात आणि विश्‍लेषण करता करता ‘बरसात’ च्या संगीतावर ग्रंथराज होऊ शकतो हे उमगते. भैरवी, पहाडी, ब्लू डान्यूबची सिंफनी, काश्‍मिरी लोकगीत, भरघोस पण सुखावणारा वाद्यवृंद आणि नवखा कोवळा लता स्वर याचे पुन्हा गारूड होते मनावर... आणि मग पुढे अविरत सिनेमांची, गाण्याची शंकर जयकिशनी बरसात होत राहते.

राज कपूर, शैलेंद्र- हसरत, शंकर- जयकिशन- लता मुकेश यांच्यावर जीव जडलेले रसिक दुसरं काही ऐकायला तयारच नसतात. ‘तेरे बिना आग ये चाँदनी, घर आया मेरा परदेसी’चे स्वप्नदृश्‍य मावळत नाही त्यांच्या मनातून... ‘छोटीसी ये जिंदगानी रे’ सिनेमात गाडीवान होऊन म्हणणारा मुकेश, राज कपूरचा आवाज होऊन जातो... पण शंकर जयकिशन हे ‘प्यार हुआ इकरार हुआ’मध्ये हे समीकरण मोडीत काढतात..मन्ना डे यांच्या आवाजात एक रोमॅंटिक गाणं देऊन जातात.

‘मयूर पंख’ सर्वश्रेष्ठ कलाकृती

आर.के.च्या झगमगत्या बॅनशिवाय शंकर जयकिशनची दौड सुरू राहते आणि रसिकांची दमछाक करत राहते. ‘दाग’, ‘पतिता’, ‘शिकस्त’, ‘औरत’, ‘पूजा’, ‘आस’, ‘बादल’, ‘राजहठ’, ‘पटरानी’, ‘हलाकू’, ‘कठपुतली’, ‘उजाला’, ‘मयूर पंख’, ‘नया घर’, ‘बसंत बहार’... शंकर जयकिशन प्रेमी कुणी असं विधान करतो की त्यांची सर्वश्रेष्ठी कलाकृती म्हणून मी ‘मयूर पंख’ची निवड करेन. अर्थात त्या बिचाऱ्याला हल्ल्याला सामोर जावं लागतं. कारण अशा सुंदर गीतानं भरलेलं ताटच त्याच्या पुढे ठेवलं जातं...

शास्त्रीय संगीताची जोड

लोकप्रिय संगीताची एक स्वतंत्र परिभाषा लिहिणाऱ्या शंकर जयकिशनसाठी काहीही अशक्‍य नसतं की अवघडही...‘बसंत बहार’ सारखा संगीतप्रधान चित्रपट शास्त्रीय संगीताची मैफलच सजवतात. विख्यात बासरीवादक पन्नालाल घोष, थोर गायक पंडित भीमसेन जोशीही त्यात सहभागी होतात. ‘दुनिया न भाये मोहे अब तो बुला ले शरणो में’ सारखं गीत रफी गातात आणि शंकर जयकिशन एका वेगळ्या संगीताच्या दालनात घेऊन जातात.‘सीमा’मध्ये ‘मनमोहना बडे झूठे’साठी जयजयवंती रागाची जणू खास वेगळी बंदिश बांधतात. ‘सुनो छोटी सी गुडिया की लंबी कहानी’साठी विख्यात सरोद वादक अली अकबर खानना पाचारण करतात.

जाझ संगीताचा प्रयोग

‘तिसरी कसम’ साठी खास उत्तर प्रदेशची नौटंकी अवतरते.. वैविध्यामध्ये मोजदाद करता येत नाही. यामधून शंकर आणि जयकिशन यांचे वेगळे चरित्र, त्यांची माहिती हरवून जाते. खाण्यापिण्याची पर्वा न करता काम करणाऱ्या संगीतकारांबद्दल माहिती घ्यायची पुन्हा गाण्याकडेच यावे लागते. भारतीय रागमालिकांमधून ‘जाझ’ संगीताचा प्रयोग किंवा भैरवी रागातूनच अनेक गाणी रचणारे शंकर जयकिशन किंवा त्यांचे जीवन शोधणं अवघड होऊन जातं.

शंकर यांची अाळंदी वारी

अतिरेकी मद्यपानामुळे अकालीच म्हणजे वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी निघून गेलेल्या जयकिशन यांना जाऊन एकावन्न वर्षे होत आहेत, हे आजही धक्कादायक वाटतं. शंकर हे सोनोपंत दांडेकर यांचे अनुग्रहित होते व पायी आळंदीची वारी करत असत हेही बुचकळ्यात पाडते. त्यांनी चित्रपट संगीतात निर्माण केलेल्या ‘रोमॅंटिसिझम’शी जुळवता येत नाही. १९४९ मधल्या ‘बरसात’ याद विरत नाही पण १९८६ मधला ‘कृष्णा कृष्णा’ आठवत नाही. अपयश असो की मृत्यू त्यांचे संगीताचे अक्षय्यपात्र मात्र रिते होत नाही... हे खरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com