मानवशास्त्र अभ्यासातील नवे प्रवाह

शौनक कुलकर्णी
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्ट्ये, मानवी वागणूक, भिन्नता, उत्क्रांतीची समाजबांधणी व संस्कृतीवर परिणाम याचा अभ्यास मानवशास्त्रात केला जातो. सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो.

मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्ट्ये, मानवी वागणूक, भिन्नता, उत्क्रांतीची समाजबांधणी व संस्कृतीवर परिणाम याचा अभ्यास मानवशास्त्रात केला जातो. सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो.

ग णित, अभियांत्रिकी शाखांची जशी एक अभ्यासप्रणाली आहे, त्याप्रमाणेच जीवशास्त्रीय आणि सामाजिक शास्त्रांचाही एक स्वतंत्र बाज आहे. या शाखांतर्गत असेही काही विषय आहेत, जे अभ्यासकांना विशेष प्रकारे आकर्षित करू शकतात. यामध्ये प्रामुख्याने समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानवशास्त्र आणि इतिहास, पुरातत्त्व यांचा विशेषत्वाने समावेश होतो. हे सर्वच विषय आपल्या व्यापकत्वामुळे आणि केवळ माणसाभोवतीच फिरत असल्यामुळे अधिक कुतूहलजन्य होतात. मानवशास्त्र हा यापैकीच एक विषय जरी मानव्यविद्याशाखेत येत असला, तरी त्याचा गाभा हा जीवशास्त्रीयच आहे.

मानवशास्त्र म्हणजेच ‘अँथोपोलॉजी’ची सुरवातच मुळी मानवी वंशाच्या अभ्यासातून झाली. सर्वसामान्यांसाठी तर ते मानववंशशास्त्र असेच होते. परंतु, वंशकल्पनेच्या मर्यादा आणि त्यातील थोतांड लक्षात आल्यावर हेच शास्त्र मानवशास्त्र म्हणून अधिक व्यापक अर्थाने ओळखले जाऊ लागले. सुरवातीच्या काळात वंश अभ्यास हाच मानवशास्त्रीय अभ्यासाचा गाभा होता. जगप्रसिद्ध अशा ‘अमेरिकन जर्नल ऑफ फिजिकल अँथोपोलॉजी’ या नामांकित नियकालिकाने याविषयी खंड प्रसिद्ध केला होता. वंश म्हणजेच ‘रेस’ यापासून सुरू झालेला अभ्यास पुढे ‘रेसिझम’, ‘एथनेसिटी’ या मार्गाने पुढे गेला. गेल्या पाच ते सात दशकांत मानवशास्त्रीय अभ्यासात आमूलाग्र बदल झाले आहेत. केवळ मानवी समूहातील विविधता आणि तिचे स्वरूप अभ्यासण्याऐवजी त्याचा मीमांसात्मक आणि चिकित्सात्मक अभ्यास होऊ लागला. सामाजिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय अभ्यासाबरोबर जीवशास्त्रीय मानवशास्त्राने विशेष मजल मारली आहे.

पारंपरिक रक्तगट, दस्त रेखाटन यांसारख्या अभ्यास पद्धती केव्हाच मागे पडून, डी.एन.ए. अभ्यास पद्धतीने आता जम बसविला आहे. मात्र, मानवमिती किंवा ‘अँथ्रोपोमेट्री’ या शाखेचे महत्त्व आजही अबाधित आहे. कुपोषण आणि आरोग्यविषयक क्षेत्रात मानवमितीचा सर्रास वापर होतोच. परंतु, त्याशिवाय इंजिनिअरिंग डिझाइनमधील एरगॉनॉमिक्‍स आणि ‘ह्यूमन फॅक्‍टर’ या क्षेत्रात त्याचे खूप महत्त्व आहे. ‘स्पोर्टस अँथ्रोपोमेट्री’सारखी क्षेत्रेही विकसित झाली आहेत.
आरोग्यविषयक क्षेत्रातही मानवशास्त्राचे योगदान आहेच. ग्रामीण आणि आदिवासी भागांत स्वयंपाकासाठी आजही प्रामुख्याने चूलच वापरली जाते. यासाठी जळण म्हणून प्रामुख्याने जवळपासची लाकडेच वापरली जातात. ऋतुमानानुसार उपलब्ध जळावू लाकडे आणि त्यातून बाहेर पडणारा वेगवेगळा धूर, चुलीजवळ असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आणि त्यांच्याजवळ असणारी लहान आणि तान्ही बालके, त्यांच्या आरोग्यावर, फुफ्फुसांच्या क्षमतेवर होणारा परिणाम आणि सर्वांचा त्या घराच्या रचनेशी असलेला संबंध एक वेगळा आणि महत्त्वपूर्ण अभ्यास ठरतो. धूम्रपानाचा आरोग्यावर होणारा परिणाम ज्ञात आहेच. परंतु, धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थ किंवा तंबाखू, मिश्री यांचा स्त्रियांच्या विशेषतः गरोदर स्त्रियांच्या आरोग्यावरील परिणाम आणि प्रसूतीदरम्यान पुढे येणाऱ्या समस्या मानवशास्त्रीय अंगाने अभ्यासिल्या जातात.

आपण माणूस म्हणून कोण आहोत? ते जसे आहोत तसे का आहोत? आणि माणूस म्हणजे ‘आपण’ कोठून आलो आहोत? या प्रश्‍नांची उत्तरे जरी मिळाली, तरी मानवी समुदायांसाठी त्याचे व्यापकत्व आहेच. मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीने आजवर मिळालेले जीवाश्‍म महत्त्वाचे आहेतच. परंतु, आता आनुवंशिक आणि रेण्वीय पृथक्करणाचे पुरावे अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. पारंपरिक अभ्यासातून आणि उपलब्ध जीवाश्‍मांच्या आधारे आजच्या मानवाचे उत्पत्तिस्थान आफ्रिकेत असल्याचे डार्विनने सांगितले होतेच, तर ‘मायटोकाँड्रिअल इव्हच्या’ संशोधनातून याच निष्कर्षाला आधुनिक पाठबळ मिळाले आहे. रेण्वीय मानवशास्त्र हा त्यामानाने खूपच अलीकडचा विषय आहे. त्यातून मानवी उत्क्रांती, मानवी समाजाच्या इतिहासाचे पुनरावलोकन आणि समाजीकरणाची क्रिया पडताळणे शक्‍य होते. आधुनिक मानवाचे उत्पत्तिस्थान, त्याचे स्थलांतराचे मार्ग, मानवी पेशीतील तंतुकणिका किंवा मायटोकाँड्रिआमधील विविधता आणि पितृरेशीय ‘वाय’ क्रोमोसोम्साचा प्रवास अभ्यासला जाऊ लागला. याच अभ्यासाला मिळालेले महत्त्वपूर्ण वळण म्हणजे ह्यूमन जीनोम डायव्हर्सिटी प्रोजेक्‍ट. रेण्वीय जीवशास्त्रातील प्रगतीमुळे हा टप्पा आवाक्‍यात आला.

ग्रेगर मेंडेल यांच्या आनुवंशिकतेच्या नियमांच्या शोधाने अनुवंशशास्त्राचा पाया घातला गेला. वॅटसन आणि क्रिक यांनी शोधलेल्या डी.एन.ए. रेणूंमुळे अभ्यासाचा आराखडा निश्‍चित झाला, तर जीनोम प्रोजेक्‍टने त्यावर कळस चढविला. रेण्वीय मानवशास्त्राचा अभ्यास तीन अंगाने होतो. तंतुकणिकांतील म्हणजे मायटोकाँड्रिअल डीएनएमधील विविधता, जी मातृवंशीय मार्गाने संक्रमित होते, तर ‘वाय’ क्रोमोसोम विविधता पितृवंशीय मार्गाने संक्रमित होते आणि तिसरा कायिक किंवा ऑरोसोमल डीएनए विविधता ज्याचा व्याप अधिक गुंतागुंतीचा आहे.

सामाजिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्व मानवशास्त्र या तीन प्रमुख शाखा आहेत. अनेक गोष्टींचा परस्परसंबंध शोधण्याचे काम मानवशास्त्राद्वारे केले जाते. जे लोक उन्हात जास्त फिरतात, त्यांची त्वचा जास्त गडद होते, असे म्हटले जाते. आदिवासींच्या बाबतीतही हे असे आहे का, याचा अभ्यास आता करण्यात आला आहे. त्वचेचा रंग आणि अतिनील किरणे यांचा काही संबंध आहे का, हेही आता तपासले गेले आहे. कुपोषणाचाही मानवशास्त्रीय अभ्यास सुरू आहे. आदिवासी घरांची रचना, त्यांची ठेवण, ते कोठे काम करतात, यांचा अभ्यास करण्यात आला आहे. महादेव कोळी आणि भिल्ल ही या अभ्यासाची प्रातिनिधिक उदाहरणे.

मानवशास्त्र आता प्रगतीच्या वेगळ्या वळणावर आहे. कोणत्याही समाजाच्या किंवा जाती-जमातीच्या उगमापासूनची मार्गक्रमणा, त्यांच्यातील शाखा, उपशाखा इतकेच नाही, तर मानवी वर्तन, अस्तित्व, आरोग्य आणि स्वास्थ्य या चारही घटकांवर अधिक प्रकाश टाकणार आहेत. हे सर्वच मानवशास्त्राच्या आवाक्‍यात असले, तरीही इतर शास्त्रांच्या सहयोगातून याला मूर्त स्वरूप येत आहे.

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मानवशास्त्रविभागप्रमुख आहेत.)

Web Title: shaunak kulkarni write article in editorial page