पाकिस्तानमधील ऐतिहासिक वळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

historic turning point india Pakistan war isi

पाकिस्तानच्या स्थापनेपासून पाकिस्तानी सैन्यांनी भारतावर युद्ध लादण्याचा आणि हरण्याचा विक्रमच स्थापित केला

पाकिस्तानमधील ऐतिहासिक वळण

पाकिस्तान सैन्याचा शब्द हा तत्कालीन कोणत्याही सरकारसाठी आदेश असायचा. ते पंतप्रधानांना सत्तेवर बसवायचे, तुरुंगात टाकायचे, हद्दपार करायचे किंवा हत्या घडवून आणायचे; पण आता राजकारण्यांकडून पराभव होण्याची भीती सैन्यदलाच्या मनात निर्माण झाली आहे.

पाकिस्तानच्या स्थापनेपासून पाकिस्तानी सैन्यांनी भारतावर युद्ध लादण्याचा आणि हरण्याचा विक्रमच स्थापित केला आहे. भारतासोबत लढताना आणि पराभूत होताना अनेक बिनमहत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व दिले गेले. वस्तुस्थिती ही आहे की, इतक्या सर्व युद्धानंतर या लष्कराने जवळपास अर्धा पाकिस्तान (बांगलादेश) गमावला आहे, त्यांच्या राज्यसंस्थेचा ढाचा, संस्थात्मकता, अर्थव्यवस्था आणि उद्योजकता गमावली आहे. सरतेशेवटी त्यांच्याकडे काश्मीरचा थोडासा भाग शिल्लक आहे. त्यांचा विजयाचा प्रवास कुठपर्यंत कायम राहिला आणि तो कुठे मागे पडला? अफगाणिस्तानात केजीबी आणि सीआयएचा पराभव करणाऱ्या ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांची ही मुलाखत पाहा. त्यांनी स्वतःचा, आयएसआयचा, तिच्या प्रमुखांचा आणि सैन्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

आयएसआयची दहशत

‘आयएसआय’वर सर्व पाकिस्तानी प्रेम करत होते आणि तिचा तिरस्कारही करत होते, तिला घाबरतही होते. सर्व पाकिस्तानी मीडिया एका रांगेत ‘आयएसआय’ची हुजरेगिरी करायचा. तसे केले नाही, तर तुम्हाला तुरुंगात किंवा वनवासात धाडले जाईल. तुमचे प्रेत एखाद्या गटारात किंवा एखाद्या अनोळखी जागेत मिळेल. ‘एआरवाय’चे वृत निवेदक अर्शद शरीफ यांना आठवा. त्यांना त्यांच्या बॉसप्रमाणेच कामावरून काढून टाकण्यात आले आणि हद्दपार करण्यात आले. ओळखण्यात गफलत झाल्याने अर्शद शरीफ यांचा केनियामध्ये पोलिसांच्या गोळीने मृत्यू झाला; तर ‘आयएसआय’ प्रमुख जे जगातील शक्तिमान व्यक्तींपैकी एक आहेत, त्यांनी निवडक प्रेक्षकांसह पत्रकार परिषदेत हजेरी लावली. त्यांचे शब्द म्हणजे पाकिस्तानी माध्यमे, राजकारणी आणि न्यायपालिकेसाठी आदेशच होते. ‘आयएसपीआर’चे प्रमुख त्यांना माहिती पुरवत होते. हे दोघेही त्यांच्या संस्थेच्या वतीने बोलत होते. आपण पीडित असल्याचा दावा करत होते.

कुरघोडीत सैन्य तरबेज

जेव्हा जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी आपल्याला राजकारण्यांकडून धोका असल्याची भीती माध्यमांकडे व्यक्त केली आहे, तेव्हा तेव्हा राजकारणाने ऐतिहासिक वळण घेतले आहे. आपल्या राजकारण्यांना संपवून त्यांच्यावर कुरघोडी करण्यात पाकिस्तानी सैन्य तरबेज आहे. आता त्यांना राजकारण्यांकडून हरण्याची भीती निर्माण झाली आहे. जर इम्रान खान विजयाच्या दिशेने जात असतील, तर या विजयाचे महत्त्व १९९२ मध्ये त्यांनी जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकापेक्षाही नक्कीच जास्त असेल. जर पाकिस्तानी सैन्याचा पराभव लोकप्रिय नागरी शक्तीने केला, तर भारतीय उपखंडातील तो एक ऐतिहासिक कलाटणी देणारा क्षण असेल. सैन्याचा शब्द हा कोणत्याही सरकारसाठी आदेश असायचा. ते कोणत्याही आजी, माजी किंवा संभाव्य पंतप्रधानाला सत्तेवर बसवू शकायचे, काढून टाकायचे, त्याला कारागृहात टाकायचे, त्याची हत्याही करू शकायचे. हे समजून घेण्यासाठी खूप लांब जाण्याची गरज नाही.

बेनझीर भुत्तो २००७ मध्ये जेव्हा त्यांच्या वनवासातून दुसऱ्यांदा परत आल्या, तेव्हा सत्तेवर त्यांचाच प्रभाव असेल असे दिसत होते. (१९८६ मध्ये त्या पहिल्या वनवासातून परतल्या होत्या. ‘इंडिया टुडे’साठी मी त्याचे वार्तांकन केले होते.) त्यांच्या जीवाला धोका आहे, असा इशारा अनेकदा देऊनही त्यांची हत्या झाली. भुत्तो यांचे सरकार गडगडले आणि त्यांचे पती एक बिनमहत्त्वाचे, नामधारी अध्यक्ष झाले. त्यानंतर नवाझ शरीफ बहुमताने जिंकले. आपण खरे पंतप्रधान आहोत, असा त्यांना सुरुवातीला विश्वास होता. पण, नंतर सैन्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा भ्रम उघड झाला. २०१८ ला त्यांनीच नेमलेल्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली सैन्याने त्यांना कारागृहात टाकून नंतर हद्दपार करण्याचा कट रचला होता. त्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही, याची पक्की खात्री करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत सैन्याने प्रतिगामी सुन्नी गट तेहरिक-ए-लब्बैकची निर्मिती केली आणि तिला बळही दिले.

वादाची ठिणगी

इम्रान खान हे तेव्हा पाकिस्तान सैन्याचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत नसले, तरी फरक थोडाच पडणार होता? त्यांना बहुमत मिळावे, यासाठी सैन्य आणि आयएसआय यांनी एकत्र येत छोटे पक्ष आणि अपक्षांना एकत्र आणले. सैन्याच्या ‘प्याद्या’साठी बहुमत हा मुद्दाच नव्हता; पण, तोपर्यंत हे प्यादेसुद्धा स्वतःला खरोखर पंतप्रधान समजू लागले आणि सैनिकांत अस्वस्थता पसरू लागली. सर्वात वाईट म्हणजे इम्रान खान यांचा हा भ्रम केवळ देशापुरता सीमित नव्हता. ते स्वतःला इस्लामिक उम्माहचे नवे नेते, २१ व्या शतकातील खलिफा समजू लागले. ते शरियतची भाषा बोलू लागले. कुराणचे दाखले देऊ लागले. पश्चिमविरोधी असणारा इस्लामिक अजेंडा तयार करण्याचा प्रयत्न करू लागले. यामुळे सैन्य सावध झाले. राजकारणाच्या उच्चस्थानी असल्यामुळे इम्रान खान यांना आपण सैन्यदलाचे बॉस आहोत, असे वाटू लागले. यातूनच प्रथम उच्चस्तरीय नियुक्तांवरून वादावादी सुरू झाली. पहिली ठिणगी पडली ती आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीवरून. सैन्यदलाचे प्रमुख हे नदीम अंजुम यांच्या बाजूने होते; तर इम्रान यांची पसंती लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना होती. त्यामुळे हा वाद म्हणजे अंतिम सामन्याआधीच्या महत्त्वपूर्ण सामन्यासारखा होता.

आता स्थानाला धोका

षड्‍यंत्र, विश्वासघात आणि हत्या अशा संपूर्ण कुरूप कथेतील समान धागा कोणता आहे, याचा विचार करा. जनरल कमर जावेद बाजवा हे या काळात प्रमुख होते. नवाझ शरीफ यांनी त्यांची नियुक्ती केली होती. ज्यांना नंतर अटक करण्यात आली आणि हद्दपार केले गेले. बाजवा यांना इम्रान खान यांनी तीन वर्षांची मुदतवाढ दिली. बाजवा यांनी आधी इम्रान खान यांना उभे केले, नंतर त्यांना पदच्युत केले आणि आता त्यांना आव्हान दिले आहे. गेल्या पाच दशकात पाकिस्तानातील दोन महान राजकीय घराण्यांनी लोकशाहीसाठी आपापल्या मार्गाने लढा दिला आहे. भुत्तो परिवाराचा पाकिस्तान पीपल्स पक्ष (पीपीपी) आणि शरीफ परिवाराची पाकिस्तान मुस्लिम लिग (पीएमएल-एन) हे दोन्हीही आता थकले आहेत आणि त्यांची सर्व शक्ती खर्च झाली आहे. आपले सिंहासन वाचवण्यासाठी दोघेही सैन्यदलावर अवलंबून आहेत. हे नेहमीचेच आहे. जर सैन्य तुमच्या बाजूने असेल, तर पाकिस्तानातील जग तुमच्या ताब्यात असते. त्यामुळेच आजची परिस्थिती सर्वसाधारण नक्कीच नाही. कारण सैन्यदलाला आपली सत्ता आणि स्थानाला मोठा धोका जाणवत आहे. हा धोका लोकप्रिय, लोकशाहीवादी सत्तेपासून निर्माण झाला आहे. मग इम्रान खान यांच्यात अनेक दोष असतील तरी काय? लोकशाही नेहमीच परिपूर्ण असते, असे आपण म्हणू शकतो का?

टॅग्स :PakistanEditorial Article