राष्ट्रहिताच्या नजरेतून : पाकिस्तानसोबत शांततेचा अन्वयार्थ

पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर बाजवा
पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर बाजवा
Updated on

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी इस्लामाबादच्या सेक्‍युरिटी डायलॉगमध्ये १३ मिनिटांचे भाषण केले. यात त्यांनी सांगितले, की भारत-पाकिस्तानने आपला भूतकाळ गाडून नव्याने सुरवात करायला पाहिजे. शांतता प्रस्थापित करण्याकडे लक्ष दिल्यास दोन्ही राष्ट्रांना आपल्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल; मात्र प्रत्येक पाकिस्तानी नेत्याने भूतकाळात या प्रकारची विधाने केली आहेत. त्यानंतर ते पाठीत खंजीर खुपसतात, मग या वेळी नवीन काय आहे?

केवळ भूतकाळ भविष्यकाळातील दिशा ठरवत असेल, तर पाकिस्तानबद्दल बोलण्याची गरज काय? त्यापेक्षा अधिक स्नायपर रायफली खरेदी करून सीमेवर बसावे का? मग हा पेच कसा सोडवायचा? बॉम्बवर्षाव करून देशांना पाषाणयुगात नेणे हे काही उत्तर नाही. माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत लष्करी ताकदीने प्रादेशिक उद्दिष्ट गाठणे, पाकव्याप्त काश्‍मीर किंवा अक्‍साई चीन मिळवणे अशक्‍य आहे. कारण तुम्ही काही मैल वाटचाल केली, तरी लागलीच जागतिक पातळीवरून दबाव येऊन तत्काळ युद्धबंदी लागू होते, हे व्ही. पी. मलिक यांचे नाही तर माझे शब्द आहेत.

मग आपण भविष्याकडे वाटचाल कशी करायची? गेल्या महिन्यात अचानक दोन्ही देशांच्या मिलिटरी ऑपरेशन संचालकांनी शांततेची विधाने केली. त्यामध्ये २००३ च्या करारानुसार ताबा रेषेच्या दोन्ही बाजूंना शांतता राखण्याबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ होतो यापुढे दोन्ही बाजूंनी गोळीबार करणे, सीमेलगतच्या गावांवर मारा करणे थांबणार आहे. शेवटी असे करून काहीच साध्य होत नाही. केवळ मनातील राग (द्वेष) बाहेर पडतो. ठराविक काळानंतर यातून पुढे जायला हवे, बाहेर पडायला हवे, हे त्यांना ठावूक असते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी अचानक सकाळी उठून एकाएकी हे विधान केले असेल असे कुणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. दोन्ही राष्ट्रांत पडद्याआड चर्चा सुरू होती, त्याचा हा परिपाक होता.

या विधानानंतर जुन्या लष्करी, गुप्तचर आणि सामरिक आस्थापनांकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला. भूतकाळाला गाडून पुढे जावे, या पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या विधानाचा अर्थ असा घ्यायचा का, की भारताने भूतकाळ विसरावा; मात्र पाकिस्तानने आपले नुकसान करत राहायचे. ज्या लोकांनी आयुष्यभर केवळ एकाच शत्रूशी लढा दिला, त्यांच्यासाठी हे ठीक आहे; मात्र मी उल्लेख केल्याप्रमाणे २०२१ मध्ये दुसऱ्या राष्ट्राच्या सीमेत आक्रमण करून काहीही साध्य होणार नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हृदयात संशय कायम ठेवून बाजवा यांच्या विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी डोके वापरायला हवे. त्यांच्या भाषणात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिले म्हणजे एकमेकांच्या अंतर्गत प्रश्‍नात हस्तक्षेप न करणे; मात्र याचा अर्थ वेगळा काढू नका. कारण कुणीही पाकिस्तानी कमांडरला श्रीनगरच्या बदामी बाग कॅंटोन्मेंटच्या गोल्फ मैदानावर गोल्फ खेळायला बोलावले नाही. दुसरी बाब म्हणजे पाकिस्तानने काश्‍मीरचा उल्लेख सोडलेला नाही. काश्‍मीरसंदर्भात भारत अनुकूल वातावरण निर्माण कसे करतो त्यावर बोलणी अवलंबून आहेत, असे म्हटले आहे. ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीची परिस्थिती बहाल करण्याविषयीचा उल्लेख आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाप्रमाणे जनमत घेण्याची आठवणही यामध्ये करून दिली आहे. याचा अर्थ पाकिस्तानी लष्कराने ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीची स्थिती बहाल करण्याची मागणी सोडून दिली आहे का? मात्र तुम्ही तत्काळ निष्कर्षावर पोहोचू नका. जर भारत दोन्ही सीमांवर कात्रीत सापडला असेल, तर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची परिस्थितीत त्यापेक्षाही भयावह आहे.

पाकिस्तानी शासकांची मुले, मालमत्ता आणि पैसे सर्व पाश्चिमात्य देशांत आहेत. जर ते भारताशी द्वेष बाळगणार नाहीत, तर त्यांना चीनमध्ये साम्य दिसणार नाही. आखाती देशांनी पाकिस्तानला एकटे पाडले आहे. अशा वेळी भारतासोबत शांतता राखणे हा एकमेव पर्याय आहे. दुसरीकडे मोदी सरकारने पाकिस्तानबद्दलच्या नीतीचा थांगपत्ता कुणालाही लागू दिला नाही, हे आपण कबूल केले पाहिजे. याची कुणकूण होती, असा दावा कुणी करत असेल तर ते खोटे बोलत आहेत; मात्र मोदी सरकारला संघर्ष नको हे स्पष्ट आहे. अर्थसंकल्पात संरक्षण बजेट कमी झाले. त्यामुळे सरकारला युद्धाची तयारी निश्‍चितच करायची नाही हे सिद्ध होते.

मोदी सरकार सशक्त असल्यामुळे ते युद्धबंदीची नीती तयार करू शकतात. कदाचित त्यांच्या जागी एक कमजोर सरकार असते तर पूर्व लडाखमध्ये आपण खूप दबावाखाली असतो आणि पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याची भूमिका घेण्यास कचरले असते. मोदी चीनसोबत संघर्षास तयार नाहीत, असा टोमणा मोदींना लगावला जातो; मात्र १९६२ मधील नेहरू सरकार सध्याच्या मोदी सरकारच्या तुलनेत कमजोर होते. त्यांना युद्ध लढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मोदी खूप ताकदवान नेते आहेत. ते युद्धाच्या जाळ्यात फसणार नाहीत. त्यापेक्षा ते शांतता पसंत करतील.

पाकिस्तानला दोनच पर्याय
पाकिस्तानच्या पूर्वेकडे भारतासारखा मजबूत शेजारी, पश्‍चिमेला अस्थिर अफगाणिस्तान आणि इराणसारखे जटील राष्ट्र, उत्तरेला चीन आहे. अमेरिका आता पाकिस्तानचा मित्र नाही. ‘क्वाड'सारख्या संघटनेच्या माध्यमातून भारत-अमेरिकेची मैत्री अजून घट्ट झाली आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आता पाकिस्तानची आहे. पाकिस्तानकडे दोनच पर्याय आहे, एक तर भारतासोबत शांतता प्रस्थापित करावी किंवा लढाई सुरू ठेवावी आणि चीनला लष्करी संरक्षक मानणे किंवा आर्थिक वसाहत होणे.

(अनुवाद - विनोद राऊत)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com