योगींची झेप, उत्तरप्रदेश तळाला

yogi adityanath
yogi adityanath

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील उत्तरप्रदेश विकासाच्या बाबतीत यथातथाच आहे. परंतु, त्यांचे वैयक्तिक राजकीय भवितव्य आकाशाला भिडू पाहत आहे. एवढे की त्यांची तुलना मोदी यांच्याशी होऊ लागली आहे.

राष्ट्रीय पातळीवरील मथळ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान मिळत आहे ते त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून. दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीला पंतप्रधानांनी नुकतेच संबोधित केले. ही बातमी तुम्हाला कुठे दिसली का? संपूर्ण राष्ट्राच्या मेंदूवर शेतकरी आंदोलनामधील घडामोडींचा मारा होत असताना बाजी मारली ती योगी आदित्यनाथ यांनी सहा ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय नेत्यांविरोधात दाखल केलेल्या पोलिस तक्रारीने. त्यांच्यावरील आरोपही कटकारस्थान करणे आणि देशद्रोह यासारखे गंभीर स्वरूपाचे होते. दुसऱ्या दिवशी याच बातमीचा सोशल मीडियावर धुमाकूळ होता. या दिवशीचे सर्व ट्रेंड उत्तरप्रदेशशी संबंधित होते. लगोलग मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी योगींच्या निर्णयाची नक्कल करीत याच सहा जणांविरुद्ध मध्यप्रदेशात एफआयआर दाखल केला. यात दिलासा एकच होता की त्यात देशद्रोहाच्या आरोपाचा समावेश नव्हता.

योगी आदित्यनाथ यांचा जन्म आताच्या उत्तराखंडमधील. त्यांचे आधीचे नाव अजय मोहन बिश्त. मार्च २०१७ मध्ये त्यांची उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. येत्या पाच आठवड्यांमध्ये ते चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय राजकारणातील मापदंडांच्या मानाने ते फक्त ४५ वर्षांचे म्हणजे युवाच होते. मोदी आणि शहा यांना दिल्लीतील राजकीय पंडितांना धक्का देणे आवडते. योगी आदित्यनाथ यांची निवड करून या लॉबीला त्यांनी असाच धक्का दिला. चार वर्षांनंतर ते बातम्यांचे मथळ्यांवर मथळे देत आहेत. मात्र, दिल्लीमधून झालेल्या ट्विटसाठी त्यांना एफआयआर दाखल केल्यामुळे आपण केलेली निवड खरेच योग्य आहे काय याचा अदमास मोदी-शहा निश्चितच घेत असतील. कारण या राज्यातील निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द प्रिंटचे राजकीय संपादक डी. के. सिंग यांनी योगी यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्यात योगी हे भाजपचे मुख्यमंत्री तसेच नेता होण्याची इच्छा असलेल्यांचे रोल मॉडेल कसे बनले आहेत, याचा ऊहापोह त्यांनी केला होता. डिसेंबर २०१८ मध्ये मी एक लेख लिहिला होता. त्यात नोटाबंदी नव्हे तर योगींची मुख्यमंत्रिपदी निवड करणे ही मोदी यांची सगळ्यात मोठी चूक होती, असे मत व्यक्त केले होते. आदित्यनाथ यांना एकच गोष्ट ठाऊक आहे ती म्हणजे ध्रुवीकरण आणि ते ती करतील, असे मी या लेखात म्हटले होते. ध्रुवीकरणाच्या प्रयत्नात योगींच्या हातून राज्यावरील पकड सुटेल आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना उत्तरप्रदेशात मोठे यश मिळवता येणार नाही, असे भाकीत मी केले होते. मोदींना उत्तरप्रदेशात ८० पैकी ५० जागा मिळवता येणार नाही, असे मी म्हटले होते. त्यांना ६० मिळाल्या.

२०१७ च्या निवडणुकीदरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या मठात मी, प्रणय रॉय आणि दोराब सुपारीवाला या तिघांनी चर्चा केल्यानंतर मी एक लेख लिहिला. यावेळी झालेल्या चर्चेत उत्तरप्रदेशाचे छोट्या राज्यांमध्ये विभाजन करायला हवे काय, असा प्रश्न मी योगी यांना केला. तेव्हा या कल्पनेला त्यांनी फारसा विरोध दर्शविला नव्हता. पश्चिम उत्तरप्रदेशचे हरित प्रदेश हे नवे राज्य करता येईल काय, असा प्रश्न केला असता त्यांनी हा प्रदेश राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरेल असे सांगून ही शक्यता नाकारली होती. उत्तरप्रदेशची लोकसंख्या २३ कोटीच्या घरात असून प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक मुस्लिम आहे. त्यातही मुस्लिमांची संख्या पश्चिम उत्तरप्रदेशात सर्वाधिक आहे. यानंतर पूर्वांचल हे वेगळे राज्य करता येईल काय असे विचारले असता योगींच्या डोळ्यात चमक दिसली. यावरून त्यांना एखाद्या लहान राज्याचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे या लेखात मी म्हटले होते. या लेखात मी व्यक्त केलेले सर्व अंदाज चुकीचे ठरले.

मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातून भरघोस यश मिळवले. तर गोरखपूरमधील त्या चर्चेनंतर तीन आठवड्यांनीच योगी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. एकीकडे माझे अंदाज चुकले असताना डी. के. सिंग यांचे अंदाज मात्र बरोबर ठरत आहेत. योगी हे भाजपचे मुख्यमंत्री आणि नेत्यांचे रोल मॉडेल ठरले आहेत. आज भाजपमधील प्रभावशाली नेत्यांची मांडणी करायची झाल्यास ती मोदी, शहा, भागवत अशी राहिली नसून मोदी, शहा, योगी अशी झाली आहे. योगी आज जे करतात ते त्याची नक्कल भाजपचे नेते दुसऱ्या दिवशी करतात, अशी स्थिती आहे. बातम्यांचे मथळे देण्याबाबत ते आज मोदी यांच्याशी स्पर्धा करू पाहत आहेत. आज भाजपमध्ये लोकांची गर्दी खेचणारे नेते कोण ? असा प्रश्न केला असता त्याचे उत्तर मोदी हे निश्चित आहे. पण त्यानंतरचे नाव आहे ते योगी आदित्यनाथ आणि तेजस्वी सूर्या यांचे.

योगी सत्तेवर आले तेव्हा त्यांच्याकडून उत्तर प्रदेशला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांच्या हाती राज्याचा कारभार गेल्यानंतर विकासाचा वेग घसरायला लागला. २०१५-१६ या वर्षात राज्याच्या विकासाचा वेग ८.८५ टक्के तर पुढील वर्षात १०.८७  एवढा होता. २०१७-१८ मध्ये विकासाचा दर ७.२४ टक्के होता तो २०१८-१९ मध्ये ४.३८ टक्क्यांपर्यंत घसरला. यंदाचे वर्ष कोरोनाचे असल्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. आर्थिक आघाडीवर असे निराशाजनक चित्र असले तरीही योगी यांच्याकडे भाजपमधील भविष्यातील नेतृत्व म्हणून बघितले जात आहे. आजच्या घडीला ध्रुवीकरणाची ताकद असलेले ते एकमेव नेते आहेत. मोदी-शहा यांचे काँग्रेसमुक्त भाजपचे स्वप्न असताना योगी मुस्लिममुक्त उत्तरप्रदेश या आपल्या संकल्पनेवर काम करीत आहेत. उत्तरप्रदेशसाठी योगी यांनी फार काही मोठे काम केलेले नाही. तरीही २०२२ मध्ये उत्तरप्रदेशात आणि २०२४ मध्ये देशात होणाऱ्या निवडणुकीसाठी मोदी आणि शहा यांना त्यांची गरज भासणार आहे.

योगींच्या निवडीने उत्साह अन अपेक्षा!
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी तेव्हा योगी आदित्यनाथ हे प्रबळ दावेदार नसले तरीही त्यांच्या निवडीने पक्षात उत्साहाची लाट पसरली. जातीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांच्या व्यवस्थेत कोणतेही कौटुंबिक व्यावधान नसलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या निवडीने दशकानुदशके गटांगळ्या खाणाऱ्या या राज्यात विकासाची नवी पहाट उगवेल, अशी अपेक्षा होती. त्यांच्या नेतृत्वात विकासाला चालना मिळेल, अशीही अपेक्षा होती. खरे तर अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातील दुसऱ्या टप्प्यात विकासाने वेग पकडला होता. 

(अनुवाद : किशोर जामकर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com