जाणकार ‘मध्यस्थ’ राखतील समाजस्वास्थ्य

शीला वैद्य
शनिवार, 23 जून 2018

विविध कारणांनी कौटुंबिक, सामाजिक समस्या वाढत आहेत. हे लक्षात घेतले तर विवाह जमविण्यासाठीच्या मध्यस्थीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. परंतु तशी ती योग्य रीतीने उपलब्ध होताना दिसत नाही. विवाहपूर्व समुपदेशन आवश्‍यक आहे, हा विचार सर्वदूर पसरला तर त्याचा उपयोग समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठीही होणार आहे.

विविध कारणांनी कौटुंबिक, सामाजिक समस्या वाढत आहेत. हे लक्षात घेतले तर विवाह जमविण्यासाठीच्या मध्यस्थीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. परंतु तशी ती योग्य रीतीने उपलब्ध होताना दिसत नाही. विवाहपूर्व समुपदेशन आवश्‍यक आहे, हा विचार सर्वदूर पसरला तर त्याचा उपयोग समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठीही होणार आहे.

साधारण तीन दशकांपूर्वी भारतात जे काही आर्थिक-सामाजिक बदल झाले, त्यातून एकीकडे मध्यमवर्गाचा विस्तार झाला, जीवनमान उंचावले. पण या बदलांच्या काळात नव्याने काही समस्या उद्‌भवल्या आहेत. त्यावर व्यापक मंथन व्हायला हवे. त्या दृष्टीनेच एका महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे. नव्वदच्या दशकांपूर्वी बराच काळ मध्यमवर्गात विवाह ठरवण्याची एकच पद्धत अस्तित्वात होती. जवळच्या, मित्र-मैत्रिणीच्या, नातेवाइकांच्या ओळखीतून विवाहासाठी स्थळे सुचवली जात. स्थळ सुचवणारी व्यक्ती ज्याच्यासाठी स्थळ सुचवायचे आहे त्या घराचा, तेथील संस्कारांचा, आचारविचारांचा, तसेच मुलाच्या वयाचा, शिक्षणाचा विचार करीत. मुलांच्या भवितव्याचा विचार केला जात असे. सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून हे कार्य केले जात असे. सुचवलेल्या स्थळाबाबत घरामध्ये एकत्रितपणे चर्चा होत असे. या चर्चेतून अनेकांच्या विविध विचारांचे पैलू समोर येत असत. त्यामुळे लग्नाबाबत निर्णय घेण्यास मदतच होत असे. परंतु आर्थिक-सामाजिक बदलांमुळे व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. व्यक्तिकेंद्रितता, खासगीपणाच्या कल्पना, कोणतीही गोष्ट पैशाने विकत घेता येते, ही धारणा यांतून नव्या समस्यांनी जन्म घेतला. ‘एकमेकां साह्य करू...’ ही वृत्ती लोप पावत गेली. लग्नासारख्या गोष्टीबाबत ओळखींच्या व्यक्तींची मदत नाकारली जाऊ लागली. लग्न जमविण्याबाबत नातेवाइकांमध्ये होणारी चर्चा बंद झाली. यातून वधू-वर सूचक मंडळे झपाट्याने फोफावली. या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू झाला. ऑनलाइन नावनोंदणी होऊ लागली.

आता मध्यस्थाची जागा थेट वधू-वर सूचक मंडळांनी घेतली आहे. संगणकाच्या एका क्‍लिकवर अनेक ठिकाणची मुला/मुलींची माहिती वधू-वर सूचक मंडळे मिळवून देतात. या मंडळामध्ये नाव रजिस्टर करून खरी माहिती प्रत्यक्ष मुला/मुलीने भरावयाची असते. त्यात त्यांच्या अपेक्षा, आवडीनिवडी, सवयी, गुण-अवगुण, छंद, नोकरी व परिवार ह्याविषयी देखील लिहावयाचे असते. नावनोंदणी झालेला उमेदवार या माहितीच्या आधारे योग्य जोडीदार निवडतो व लग्न ठरते. इथपर्यंत सर्व योग्य वाटते. पण काही वेळा पालक या वधूवर सूचक मंडळापासून आपल्या पाल्याची खरी माहिती लपवतात, तर काही प्रसंगात ही मंडळेच उमेदवारांना खरी माहिती देत नाहीत. अशा अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशाच एका प्रकरणात मुला-मुलीने ऑनलाइन माहिती वाचून एकमेकांना भेटायचे ठरवले. मुलगा उच्चशिक्षित कॉम्पुटर इंजिनिअर, तर मुलगी डॉक्‍टर होती. दोघेही एकत्र भेटल्यावर प्रथमदर्शनी पसंती झाली. शिक्षणाविषयी, करिअरविषयी बोलणे झाल्यावर, मते पटल्यावर लग्न ठरले. परंतु लग्नानंतर काहीच दिवसातच मुलीला नैराश्‍याचे झटके येऊ लागले. ही गोष्ट मुलीच्या पालकांनी विवाह मंडळापासून लपवली होती. विवाह मंडळांनी ही मुलगी उच्चशिक्षित आहे हे पाहून पालकांनी दिलेल्या माहितीच्या जास्त खोलात न जाता नाव नोंदवून घेतले. परंतु या घटनेमुळे दोन कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. झाल्या प्रकाराने मुलाचा लग्नसंस्थेवरील विश्वास उडाला. या मुलाच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार पालकांना/मंडळांना कोणी दिला? वास्तविक लग्न जुळविणे हे सामाजिक कार्य आहे. परंतु सध्या त्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात नाही. पैसे मिळवण्याचे एक नवे साधन या दृष्टिकोनातून अनेक मंडळे चालविली जात असल्याचे चित्र आहे. याला काही सन्मान्य अपवाद असले तरी एकूण चित्र निराशाजनक आहे. लग्न ठरवण्यसाठी आपण घेत असलेली मुला/मुलींची माहिती खरी आहे का नाही, हे पडताळून पाहणे ही जबाबदारी मंडळांनी टाळता कामा नये. लग्न जुळवणे ही कागदोपत्री प्रक्रिया नसून दोन व्यक्तींच्या आयुष्याचा प्रश्‍न असतो. चर्चा, विचारविनिमय, संवाद यांचा या सगळ्याचा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. मंडळानी मुला/मुलीचे नाव नोंदवून घेताना त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष चर्चा करून मगच नाव नोंदवून घेणे अपेक्षित आहे. ह्या प्रकारची चर्चा करण्यासाठी अनुभवी व जाणकार व्यक्ती असणे गरजेचे आहे. विवाहपूर्व समुपदेशन ते करतात. मुला-मुलींनी स्वतःविषयीची खरी माहिती लिहिणे कसे योग्य, हिताचे आहे, हे त्यांना समजावणे आवश्‍यक असते. तसेच लग्नाविषयी त्यांचे विचार जाणून घेऊन आवश्‍यक वाटल्यास त्यावर चर्चा करणे हेही मंडळाचे कार्य आहे. नोदणी केलेल्या उमेदवाराचे मेळावे घेऊन त्यांच्या सामूहिक चर्चा घेणेदेखील आवश्‍यक आहे.

पालकांनीही जाहिरातबाजीच्या प्रलोभनांना बळी पडता कामा नये. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करता विवाहाच्या संदर्भात व्यक्तीच्या भावनांचा विचार अत्यंत महत्त्वाचा. विवाहाने दोन व्यक्ती व दोन कुटुंबे एकत्र येतात. त्यामुळे जराशा चुकीने सर्वांच्याच भावना दुखावल्या जातात, तर काही वेळा नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. केवळ मुला-मुलींचेच नव्हे तर दोन्हीकडच्या पालकांचेही समुपदेशन आवश्‍यक आहे. अशा प्रकारच्या समुपदेशनात मुलामुलींच्या लग्नाबद्दल नेमक्‍या काय कल्पना आहेत? कोणकोणत्या गोष्टींमध्ये तडजोड करण्यास ते तयार आहेत? जोडीदाराच्या सवयी, आवडीनिवडीबाबत किती गांभीर्याने विचार केला आहे? की फारसा विचारच केलेला नाही? एकत्र राहणे, वेगळे राहणे याबाबत विचार केला आहे का? मुलांना जन्म देणे, वाढवणे याबाबत विचार केला आहे का? स्वतःच्या करिअरबाबत काय विचार आहे? जोडीदाराने करिअर केले तर चालणार आहे का? लग्नानंतर आपली आर्थिक स्थिती कशी असणे अपेक्षित आहे? या आणि अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न असतात; ज्यावर समुपदेशक मुलामुलींशी सविस्तर चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो.
अलीकडेच सुरू झालेल्या ‘वैवाहिक समुपदेशन’ या डिप्लोमा कोर्समध्ये विवाहपूर्व समुपदेशन कसे करावे, याबाबत शिकवले जाते. असे शिक्षण घेतलेले समुपदेशक विवाह मंडळांनी नेमणे आवश्‍यक आहे किंवा पालकांनी त्यांच्याशी संपर्क साधणे आवश्‍यक आहे. अलीकडच्या काळात सेवाक्षेत्र विस्तारते आहे आणि बरेचसे रोजगार त्यात निर्माण होत आहेत, असे म्हटले जाते. परंतु त्यात यशस्वीरीत्या काम करता यावे, यादृष्टीने एक दृष्टिकोन घडविला पाहिजे. मानसशास्त्र, भाषा, अन्य मानव्यविद्याशाखा यांत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींसाठी हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यात काम करून सामाजिक सेवा करता येईलच; परंतु अर्थार्जनही करता येईल. त्यामुळेच अशा प्रकारचे मनुष्यबळ तयार व्हावे, या दृष्टीने शिक्षणसंस्थांनाही प्रयत्न करायला हवा.  मानसशास्त्रीदृष्ट्या योग्य समुपदेशकाकडून विवाहपूर्व समुपदेशन घेणे आणि मगच विवाह करणे, हा विचार समाजात सर्वदूर पसरला, तर त्याचा उपयोग समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठीही होणार आहे.

Web Title: shila vaidya write artilce in editorial