भाष्य : वेगळं नाही व्हायचं मला...!

विवाह ठरणे, तो यशस्वी होणे या गोष्टी म्हटले तर वैयक्तिक; पण या सगळ्या व्यवहारात सध्या ज्या समस्या उद्भवतात, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी लागते.
Divorse
DivorseSakal
Summary

विवाह ठरणे, तो यशस्वी होणे या गोष्टी म्हटले तर वैयक्तिक; पण या सगळ्या व्यवहारात सध्या ज्या समस्या उद्भवतात, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी लागते.

विवाह ठरणे, तो यशस्वी होणे या गोष्टी म्हटले तर वैयक्तिक; पण या सगळ्या व्यवहारात सध्या ज्या समस्या उद्भवतात, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी लागते. याचे कारण समाजात ज्या प्रकारचे प्रवाह असतात, जे प्रश्न जाणवत असतात, त्या सगळ्याचे प्रतिबिंब या गोष्टीत असते. घटस्फोटांचे वाढते प्रमाण हा काळजीचा विषय आहे.

विवाह म्हटले की त्या घरात नातलग, मित्रमंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरते. परंतु अलीकडच्या काळात काही वेगळेच चित्र दिसायला लागले आहे. इतके की, काही जण विवाहसंस्था मोडकळीस तर आलेली नाही ना, अशी चिंता व्यक्त करतात. कुटुंब न्यायालयांत रोज नव्याने दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या वाढते आहे. ‘वेगळं व्हायचंय मला..’ अशी वृत्ती फोफावताना दिसते आहे. हा प्रश्न त्या त्या व्यक्तींचा आहे, असे म्हणून सोडून देता येणार नाही, याचे कारण हा सामाजिक प्रश्नही आहे. ज्या बाबतीत मोठा उद्रेक होतो, अशा सामाजिक प्रश्नांची चर्चा प्राधान्याने होते. पण सुप्तावस्थेतील अशा समस्यांवर वेळीच मंथन व्हायला हवे; अन्यथा ते नंतर उग्र स्वरूपात समोर येतात. त्यामुळेच समुपदेशन करताना या समस्येचे जे काही पैलू समोर आले, ते मांडण्याचा हा प्रयत्न.

जगण्याची शैली वेगवान झाली आहे. निर्णय झटपट घ्यायचे असतात. हे सगळे मान्यच. पण प्रत्येक विचाराला अनेक बाजू असतात. आणि निर्णय घेण्यापूर्वी त्या सर्व बाजू नीट लक्षात घ्याव्या लागतात. याचे भान कुठेतरी निसटत चाललेले दिसते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती ‘सोशल’ आहे, करीअरला महत्त्व देणारी आहे म्हणून ती आवडणं आणि ती व्यक्ती संसार करताना जोडीदार म्हणून आवडणं, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. सध्या याचीच गल्लत होताना दिसते आहे. साधारणपणे ५० वर्षापूर्वी कोणाच्याही घरात विवाह ठरला की घरात, शेजारीपाजारी आनंदाला उधाण यायचे. सध्याच्या काळात मात्र हे प्रकरण तितके सुखाचे राहिलेले नाही. लग्न म्हटले, की धास्ती वाटू लागली आहे. येणारी मुलगी कशी असेल? आपल्या मुलाचा संसार नीट होईल ना? ही मुलाच्या आईवडिलांना काळजी वाटते; तर आपल्या मुलीशी सासरचे नीट वागतील ना, नवरा तिला समजून घेईल ना, ही मुलीच्या आईवडिलांना काळजी. नवरा- नवरी वेगळ्याच काळजीत असतात. आज मुलामुलींना एकमेकांना भेटून एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार जाणून घेण्यास मुभा दिली जाते. मगच विवाह ठरतात. तरीही घटस्फोट वाढताहेत. ‘लव्ह मॅरेज’ असो, वा ठरवून केलेला विवाह असो.

एक-दोन वर्षांतच बिनसायला सुरुवात होते आणि वेगळे होण्याची भाषा केली जाते. एकमेकांना पसंत करून होणारे विवाहदेखील न टिकण्याचे प्रमाण वाढले आहे. मग नक्की काय चुकते आहे? लग्न ठरल्यावर ही मुले-मुली एकमेकांना समजून घेतात म्हणजे नक्की काय? हा प्रश्न पडतो. विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. ते फक्त शारीरिक नव्हे तर मानसिकही असते. एकमेकांची मने एकमेकांशी संवादी होणे म्हणजे विवाह. आत्ताची पिढी शिकलेली आहे. नोकरी करणारी आहे. समाजात, जगात सर्वत्र वावरणारी आहे. अशा वेळी त्याची जीवनाकडे बघण्याची दृष्टी व्यापक होणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. उलट ती दृष्टी खूपच वरवरची तयार झाली आहे.

....त्याग ही त्याची कसोटी

लग्न झाल्यावर मुलीला आपले घर सोडून दुसऱ्या घरी जायचे असते. अशा वेळी या मुलीने जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. आपण नोकरीनिमित्त गाव सोडून दुसरीकडे गेलो, तर तेथील लोकांशी आपल्याला जुळवून घ्यावे लागते. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. का? तर आपली नोकरी टिकावी म्हणून. खरं ना? मग असाच प्रयत्न लग्न टिकवण्यासाठी आपण का नाही करत? आपण आपल्याला आवडलेल्या मुलाशी/मुलीशी लग्न केलेले असते. त्याबरोबर संसाराची स्वप्नं बघितलेली असतात. मग ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागला तर काय हरकत आहे? अर्थातच त्याग दोघांनी करायचा असतो. एखाद्या मुलाला ड्रिंक्स घेण्याची, मित्रांबरोबर सतत फिरण्याची सवय असेल आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला ते आवडत नसेल तर ही गोष्ट सोडण्यास काय हरकत आहे? पण नाही. अशावेळी मुलगा समर्थन देतो, की मला ऑफिसच्या पार्टीला जावे लागते वगैरे. हे योग्य समर्थन असू शकत नाही. कारण प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे की खरंच असे आहे का? का मलाही ते आवडते? मुला-मुलींना संसार करताना अनेक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. त्याला आपण तयार आहोत का, याचा विचार प्रत्येक मुला-मुलीने करायला हवा. आज घरातील कामे नवरा- बायको वाटून घेतात, ही चांगली गोष्ट. पण कामे वाटून घेण्यात हमरीतुमरी नसावी प्रेम असावे. घटस्फोटाकरता न्यायालयात जाणारी किती तरी मुले मुली क्षुल्लक कारणावरून भांडताना दिसतात.

उदाहरणार्थ, मुलीच्या म्हणण्यानुसार ‘माझा नवरा त्याच्या आईचे फार ऐकतो, माझे ऐकत नाही. नवरा माझी बाजू घेत नाही. मी का हे सहन करू?’ हे झाले एकत्र कुटुंबातील. पण जे घरात दोघेच रहातात तेही भांडतात. दोघेही ‘तू हे काम करत नाहीस, तू ते करत नाहीस’,असे एकमेकांवर आरोप करत असतात. घरात सर्व कामांना मशीन असले तरी ते लावायचे कोणी यावरूनही भांडणे होतात. मूल झाले तर ते सांभाळणार कोण? ते आजारी पडले, तर सुटी कोण घेणार? रात्री रडले तर कोण बघणार? यावरून भांडणे करताना दिसतात.

काही ठिकाणी मुले मुली आम्ही किती सुधारलेल्या मतांचे आहोत हे दाखवतात, पण वागणुकीत ते दिसून येत नाही. ते दोघेही लग्नापूर्वी एकमेकांच्या अनेक गोष्टी मान्य करतात. उदाहरणार्थ, मुलगा सांगतो माझा मित्रपरिवार मोठा आहे.

आठवड्यातून एक दिवस मी त्यांच्याबरोबर असतो. मुलगी हे मान्य करते; पण लग्नानंतर याच मुद्यावरून भांडणे होतात. अशावेळी मुलीला विचारले, ‘हे तुला माहीत होते ना, मग आता का भांडणे होत आहेत? तर यावर मुलीचे म्हणणे असते, ‘ मला वाटलं लग्न झाल्यावर तो बदलेल. तेच मुलाचेही. त्याला करिअर करणारी बायको हवी. तिने घरात काही नाही केले तरी चालेल, असे प्रारंभी म्हणणारा नंतर ‘तू घरात का काही बघत नाहीस’,अशी तक्रार करू लागतो. हे घडते, याचे कारण तितक्या सखोलपणे नि गांभीर्याने आधी विचार केलेलाच नसतो. मित्र, आईवडील, नातेवाईक यांनी व्यक्त केलेल्या मतांचा प्रभाव असतो. स्वतःचा विचार नसतो. म्हणून गणित चुकतं.

लग्न झालेल्या तरुण मुलांनी/मुलींनी आत्मपरीक्षण करावे. स्वतःला नीट ओळखले पाहिजे. त्यांच्या आईवडिलांनीही त्यांच्या मर्यादा ओळखण्याची गरज आहे. आपला मुलगा किंवा मुलगी, नातवंडे हे धरून ठेवण्यासाठी नसतात. त्यांना त्यांचे आयुष्य जगण्यासाठी सोडून द्यायचे असते. इथे आपल्या प्रेमावर म्हणजेच आपल्या स्वामित्वावर बंधन घालायचे असते. दोघांच्याही आईवडिलांनी आवश्यक तेवढाच हस्तक्षेप करावा. मुलांमुलींनीही सतत मदतीसाठी आईवडिलांवर अवलंबून रहायचे नसते. आपले प्रश्न आपण दोघे मिळून सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. संसार आपला आहे तर तो पेलण्याची जबाबदारी आपली दोघांची आहे, हे नीट समजले तर विवाह मोडकळीस येणार नाहीत. ‘वेगळं व्हायचं नाही मला..’ असा निर्धार केला तर ती गोष्ट अशक्य नाही. विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशनातून अशा निर्धाराला बळकटी येऊ शकते. त्या प्रक्रियेत पालकांचाही सहभाग घ्यायला हवा. करीअरमध्ये यश मिळविण्यासाठी तरुण मुले खूप झगडतात, तीच जिद्द यशस्वी सहजीवनासाठीही दिसायला हवी. त्यासाठीची वैचारिक मशागत होण्याची नितांत गरज आहे.

(लेखिका कुटुंब समुपदेशक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com