esakal | ढिंग टांग : कोण तो आपल्यातला फितुर?
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : कोण तो आपल्यातला फितुर?

ढिंग टांग : कोण तो आपल्यातला फितुर?

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.

वेळ : भडकलेली! काळ : सटकलेला!

(राजाधिराज उधोजीमहाराज आपल्या अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. येरझारा घालता घालता हवेतच तलवारीचे चार हात करीत आहेत. अज्ञात शत्रूची खांडोळी केल्याखातर विजयी आरोळ्या देत आहेत. पुन्हा येरझारा घालीत आहेत. अब आगे…)

उधोजीराजे : क..क…कोण आहे रे तिकडे?

मिलिंदोजी फर्जंद : (मुजरा करत) बोहोला!

उधोजीराजे : बोहोला काय बोहोला! ‘आज्ञा महाराज’ असं अदबीनं बोलता नाही येत? कुणी केलं तुला फर्जंद?

मिलिंदोजी : (पुन्हा लवून मुजरा करत) चुकलं! आज्ञा महाराज! काय काहाम काहाडलं?

उधोजीराजे : (सर्द होत) पुन्हा तेच! ‘काय काहाम कहाडलं?’ ही काय विचारण्याची पद्धत झाली? शी:!!

मिलिंदोजी : (नाइलाज झाल्यागत) चुक…ऱ्हायलं!

उधोजीराजे : राज्याचा हालहवाल काय आहे?

मिलिंदोजी : हालच हाल आहेत महाराज!...आय मीन…एकदम टॉपक्लास काम चाल्लंय! चोऱ्यामाऱ्या करणारे, खंडणी मागणारे, खंडणी देणारे, दरोडे घालणारे, अंमली पदार्थवाले, काळाबाजारवाले, अंडरवर्ल्डवाले सगळेच ठीकठाक आहेत महाराज!!

उधोजीराजे : (संतापून) खामोश! खोचक टोमणे मारलियास गर्दन मारली जाईल!

मिलिंदोजी : (चतुराईने) ज्या राज्यात काळे धंदेवाले जोरात असतात, तेच राज्य प्रगतीपथावर असतं महाराज!

उधोजीराजे : (गोंधळून) ते ठीक आहे, पण असल्या थर्डक्लास गुन्हेगारांची ख्यालीखुशाली काय कामाची?

मिलिंदोजी : (धूर्तपणाने) मग कोणाची सांगू महाराज?

उधोजीराजे : (स्नेहाळ आवाजात) माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मला काळजी आहे! आमच्या कारभारी मंडळातील एकोप्याची आम्हाला चिंता आहे! मराठी माणूस एकजूट रहावा, ही आमची तळमळ आहे! मराठी माणसाच्या या राज्याला फंदफितुरीची कीड लागावी, हे केवढं दुर्दैव!

मिलिंदोजी : (सावधपणे) कोणी केली फंदफितुरी? महाराज, आपण फकस्त नाव सांगा! नाही देशोधडीला लावला तर नावाचा फर्जंद नाही!

उधोजीराजे : (क्रुद्ध चेहरा करोन...) असल्या फितुरांना तीनदा हत्तीच्या पायी देऊन चारवेळा कडेलोट करुन गाढवावरुन दहावेळा धिंड काढायला हवी! (दातओठ खात चेवात येत) गनिमाला कागदपत्रं पुरवतात लेकाचे!!

मिलिंदोजी : कसले कागद महाराज?

उधोजीराजे : (ताडताड येरझारा घालत) गनिमाच्या त्या कुण्या सोमय्यागोमय्या सरदाराला कोण कागदपत्रं पुरवतंय, कोण त्या ईडीच्या गढीत जाऊन आमच्याविरुध्द कान फुंकतंय, याचा शोध घ्या! ही विषवल्ली मुळापासूनच उखडून फेकायला हवी!

मिलिंदोजी : काय सांगायचं महाराज? हल्ली आपल्या पार्टीतला जो तो एकमेकांकडे संशयानं बघायला लागला आहे! परवा त्या सरदार परबांनी मलाच ‘‘काय रे, तू नाही ना दिलेस?’’ असं पटकिनी विचारलं!

उधोजीराजे : दयाऽऽ…कुछ तो गडबड है!

मिलिंदोजी : (कानात कुजबुजत) कुणाला सांगू नका, पण आपल्या महालात गुप्त भुयार सापडलंय.

उधोजीराजे : गुप्त खजिना सापडला की काय?

मिलिंदोजी : (आंबट तोंड करत) कसला खजिना? ते भुयार थेट ईडीच्या गढीत निघतंय!

आता बोहोला!!

loading image
go to top