घर दोघांचं... काम कुणाचं?

घरकाम हा तसा अगदी साधा, किरकोळ वाटणारा विषय. पण तोही अनेकदा कळीचा ठरत असतो.
Shivraj Gorle writes about home and family dispute relationship housework
Shivraj Gorle writes about home and family dispute relationship houseworksakal

घरकाम हा तसा अगदी साधा, किरकोळ वाटणारा विषय. पण तोही अनेकदा कळीचा ठरत असतो. खरं तर घरकाम हा आजचा आपला विषय नाहीच. खरा विषय आहे- घरकामाविषयीचा पुरुषी दृष्टिकोन! त्यात दोन मुद्दे असतात. पहिला- घरकाम हे बिनमहत्त्वाचं असतं. त्यात डोकं कुठं वापरायला लागतं? आणि दुसरा- ते बायकांनीच करायचं असतं. प्रथम पहिल्या मुद्यावर बोलू. मी स्वतः अर्थशास्त्र आणि ‘मॅनेजमेंट’ हे दोन विषय शिकलो आहे. मौज म्हणजे या दोन्हीकडे आम्हाला पहिलं उदाहरण दिलं गेलं ते गृहिणीचंच! साधनं मर्यादित असतात, गरजा मात्र असंख्य असतात. मर्यादित साधनांसह अधिकाधिक गरजा जास्तीत जास्त चांगल्या रीतीनं कशा भागवता येतील. हा अर्थशास्त्राचा गाभा असतो. त्या दृष्टीनं विचार करता प्रत्येक गृहिणी ही अर्थशास्त्रात पारंगत असतेच. त्याशिवाय ती घर चालवूच शकणार नाही. शिवाय मॅनेजमेंट. रोजचा स्वयंपाक, घरकाम, कामवालीच्या वेळा व दांड्या, नेहमीची खरेदी, मुलांचा अभ्यास, बिलं वगैरे भरणं, लहान- मोठ्यांची आजारपणं, सणा-समारंभाची सफाई व तयारी, पाहुण्यांची सरबराई.. हे सगळं ‘मॅनेज’ करण्यातही ती तरबेज असतेच.

किंबहुना ती हे सारं इतक्‍या कुशलतेने करीत असते की, पुरुष मंडळींपर्यंत त्यांची ‘झळ’ पोहोतच नाही. त्यामुळेच तर त्यांना घरकामाचं ‘मोल’ जाणवत नाही. गंमत अशी की अनेकदा स्त्रियाही ‘गृहिणी’ असणं हे काहीसं कमीपणाचं मानत असतात. ‘आय ॲम जस्ट अ हाऊसवाईफ’ हे उद्‌गार नेमकं तेच व्यक्त करीत असतात. ‘रिकामटेकडी’ किंवा ‘तू काय दिवसभर घरीच तर असतेस'' यातील हेटाळणीही त्या सहन करीत असतात. प्रश्‍न असा आहे की, ज्याला ‘थॅंकलेस जॉब’ म्हणता येईल, असं हे जबाबदारीचं ओझं स्त्रीला जाचत कसं नाही? याचं एकमेव कारण असं आहे की, स्त्रीची ही सारी ‘सेवा’ घरासाठी असते, मायेपोटी असते. केवळ कोरड्या व्यवहारानं कुणी स्त्री खऱ्या अर्थानं घर सांभाळूच शकणार नाही. पण नेमक्‍या याच कारणामुळे स्त्रीला गृहित धरलं जातं... तिच्या कामाचं मोल केलं जात नाही. आता दुसरा मुद्दा- घरकाम हे काही पुरुषांचं काम नव्हे, ते बायकांनीच तर करायला हवं. सामाजिक संकेत असाच आहे. पण तो आता कालबाह्य झाला आहे. ‘पुरुषांनी कमवायचं आणि बायकांनी घर चालवायचं’ ही पूर्वीची विभागणी होती. आता ती निश्‍चितच तशी राहिलेली नाही. स्त्रियाही आता कमावू लागल्या आहेत. घराच्या अर्थकारणात महत्त्वाचं योगदान देऊ लागल्या आहेत. तरीही घरकामातून त्यांची काहीच सुटका झालेली नाही. पुरुषांचं यावर उत्तर असतं- ‘कामाला बाया ठेवा; पण घरकामाचं काय ते तुमचं तुम्ही पाहा'' म्हणजे शेवटी जबाबदारी फक्त स्त्रीच्या डोक्‍यावर!

घरची जबाबदारी आणि नोकरी अशी दुहेरी कसरत करताना आजच्या स्त्रीची कमालीची ओढाताण होत असते. ती पेलता यावी म्हणून ‘सुपरवुमन’ होण्याची तिची धडपड सुरू असते. तरीही घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होतंय, अशी काहीशी अपराधीपणाची भावनाही ती वागवत राहते. हे चित्र बदलायचं असेल तर स्त्री-पुरुष दोघांनाही आपली मानसिकता, आपले दृष्टिकोन बदलावे लागतील.

मंगला गोडबोले म्हणतात त्याप्रमाणे ‘गृहिणींचा अनेकदा आपण गृहकृत्यदक्ष आहोत, ‘स्त्री सुलभ’ सगळी कामं आपल्याला जमतातच हे दाखवण्याचा अट्टहास असतो. खरं तर ‘स्त्री सुलभ’ ही तशी भ्रामकच कल्पना आहे. कामांचे, कलांचे, व्यासंगाचे स्त्री व पुरुष या ‘लेबला’चे गठ्ठे निसर्गानं केलेले नाहीत. ते आपणच करून ठेवले आहेत.’ स्त्रियांनी नोकऱ्या करणं आणि पुरुषांनी भाकऱ्या थापणं इतकी काही ‘समानते’ची उथळ कल्पना नसावी. पण पत्नीला घरकामात मदत करणं हे कमीपणाचं का मानलं जावं? त्यातूनही जे थोडीफार मदत करतात, ते जणू आपण ‘उपकार’च करतो आहोत, असं समजत असतात. ही ‘उपकारक’ वृत्ती कशासाठी? घरकाम म्हणजे घरातल्या सर्वांचं काम. ‘मिळून सर्वजण’ घराच्या साऱ्या जबाबदाऱ्या ‘शेअर’ करूया, अशी वृत्ती का नसावी? एक तर निश्‍चित- संसार हे आता ‘लवचीक’ राहिले तरच टिकणार आहेत. अडवणुकीपेक्षा परस्पर सोय, परिस्थितीनुसार बदल या आधारे घरची कामं आणि जबाबदाऱ्यांचं वाटप करावं लागणार आहे. ती आता काळाचीच गरज झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com