कुटुंब डॉट कॉम : ‘बालकप्रधान’ कुटुंबव्यवस्था

अगदी प्रारंभी मातृप्रधान कुटुंबव्यवस्था होती, नंतर पितृप्रधानता आली हे आपण पाहिलंच आहे. मंगला सामंत यांनी मात्र ‘बालकप्रधान कुटुंबव्यवस्था’ ही संकल्पना मांडली आहे.
family
familysakal
Summary

अगदी प्रारंभी मातृप्रधान कुटुंबव्यवस्था होती, नंतर पितृप्रधानता आली हे आपण पाहिलंच आहे. मंगला सामंत यांनी मात्र ‘बालकप्रधान कुटुंबव्यवस्था’ ही संकल्पना मांडली आहे.

अगदी प्रारंभी मातृप्रधान कुटुंबव्यवस्था होती, नंतर पितृप्रधानता आली हे आपण पाहिलंच आहे. मंगला सामंत यांनी मात्र ‘बालकप्रधान कुटुंबव्यवस्था’ ही संकल्पना मांडली आहे. आज ती समजून घेऊ या. अर्थात त्यासाठी त्यांची त्यामागची भूमिका प्रथम जाणून घ्यावी लागेल. ती थोडक्‍यात अशी आहे - मुळात विवाहसंस्था ही आदर्शही नाही की नैसर्गिकही नाही. खरं तर पितृत्वखात्रीसाठी पुरुषालाच विवाहाची गरज असते. मात्र विवाहाची गरज स्त्रीला असते, असं भासवलं जातं. पुरुषाला स्वतःचं अपत्य हवं असतं; पण अपत्यसंगोपनात त्याला स्वारस्य नसतं. त्याला स्वतःच्या अपत्यांबद्दल ओढ, प्रेम एका मर्यादेपर्यंतच वाटतं. ‘विवाहातून जन्माला येणारी मुलं हीच पुरुषाच्या मालमत्तेची वारस’ हाच कायदा जगभरात आहे. त्यामुळेच पुरुष ‘विवाहा’चा कडवा पुरस्कर्ता असतो. बाकी तो फारसा विचार करत नाही. प्रसंगी आपली जबाबदारी झटकून मोकळाही होतो! याशिवाय विवाहसंस्थेतील कडक नैतिक बंधनांचा जाच होत असल्यानं तो सतत ‘पळवाटा’ही शोधत असतो.

आजवर हे सर्व अबाधित होतं; पण आता स्वतंत्र, सुशिक्षित स्त्रिया ‘पुरुषी मानसिकते''ला विरोध करू लागल्या आहेत. त्यातूनच घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे. काही स्त्रिया विवाह नाकारू लागल्या आहेत. काही अविवाहित स्त्रिया मुलं दत्तक घेऊ लागल्या आहेत... विवाहसंस्थेचं भवितव्य काय, असे प्रश्‍न पडू लागले आहेत. हे सारं असलं तरी मंगला सामंत असं अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की, ‘विवाहसंस्था डळमळीत झाली तरीही कुटुंबसंस्था मोडणार नाही. ‘माता व अपत्य'' हेच खरं कुटुंब असतं आणि ते चिरंतन, चिरकाल आहे. त्या कुटुंबसंस्थेला विवाह असण्या-नसण्यानं काही फरक पडणार नाही. गेली काही हजार वर्षं ‘पित्यासहित’ असते, तीच कुटुंबसंस्था असं मानल्यामुळे आता ती कोसळतेय, मोडतेय असं आपल्याला वाटतं. हे खरं नाही. वास्तव असं आहे की ८० ते ८५ टक्के पुरुषवर्ग ‘कुटुंबसंस्थे’बद्दल अनास्था असणारा किंवा फक्त अंशतः आस्था असणारा असतो. याचं नैसर्गिक स्पष्टीकरण असं की अपत्यजन्मात पुरुषाचं अत्यंत छोटं योगदान असतं. त्यामुळे (स्त्रीच्या ठायी असतो तसा) मानवी जीवनाविषयीचा जिव्हाळा पुरुषांमध्ये स्वाभाविकपणे निर्माण होत नाही. निसर्गतः पुरुष कुटुंबवत्सल नसतो. स्वतःकडे सर्व महत्त्व घेण्याच्या उद्देशानं तो जीवन जगतो. असा पुरुष जबाबदारीनं कुटुंबाकडे लक्ष देईल, बालसंगोपनात सहभागी होईल, ही अपेक्षा फिजूल आहे. अर्थात पुरुषानं असं असण्यात चूक आहे असं नसून चूक आहे ती पुरुषाला ‘माता-अपत्य’ या मूळ कुटुंबात प्रवेश देण्याची!

इतिहासात ही चूक झाली आणि एका अर्थी कुटुंबात परकाच असलेला पुरुष थेट कुटुंबप्रमुख होऊन बसला! त्यातूनच पुरुषप्रधान समाज निर्माण झाला. अर्थात पिता म्हणून कुटुंबामध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या पुरुषाला सरसकट प्रवेश नाकारला जावा, असं मंगला सामंत सुचवत नाहीत. पण असा प्रवेश देण्यापूर्वी पुरुषाला ‘कुटुंबयोग्य’ घडवायला हवं, पालकत्वाचं प्रशिक्षण द्यायला हवं, असं त्या बजावतात. विवाह करायचा असेल तर स्त्री-पुरुष दोघांनाही प्रेम, विश्‍वास, निष्ठा ही मूल्यं पाळावी लागतील हे तर खरंच, पण स्त्री व पुरुष यांची वृत्ती, प्रवृत्ती, वर्तन भिन्न आहे. त्या दोन स्वतंत्र संस्था आहेत. त्यांना एकत्र ‘नांदवण्या''चा प्रयत्न करताना पुरुषांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यावर कायद्यानं काही बंधनं घालावी लागतील, तर स्त्रियांना कायद्यानं काही सुविधा द्याव्या लागतील.

या पद्धतीत कायदे समान राहणार नाहीत; पण स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक ठरतील. हे साध्य करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ‘अपत्य’ ही कुटुंबाच्या केंद्रीय स्थानावर आणावी लागतील. कुटुंबव्यवस्था ‘स्त्रीप्रधान’ किंवा ‘पुरुषप्रधान’ न ठेवता ‘बालकप्रधान’ ठेवावी लागेल. त्यामध्ये प्रामुख्यानं खालील तरतुदी असतील. १. बालकाला मातृसान्निध्याचा मूलभूत अधिकार असेल. २. बालकाच्या सुयोग्य विकासासाठी जनननियंत्रण असेल. ३. माता-पित्याच्या भांडणात मुलांचा ताबा पंधरा वर्षांपर्यंत मातेकडे राहील, असा निःसंदिग्ध कायदा असेल. ४. माता-पित्याच्या वेगळं राहण्याच्या निर्णयात मुलांच्या भल्याची जास्तीत जास्त जपणूक केली जाईल. ५. पुरुषाला पालकत्व हवं असल्यास त्याच्यावर पालकत्वाच्या - पाल्याला प्रेम देण्यासहच्या - सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचं बंधन असेल. तशा तर आणखी अनेक तरतुदी हव्यात - पण प्रथम आईचं आरोग्य, शिक्षण उत्तम हवं.. स्वावलंबन हवं. आई जेव्हा विकासापासून वंचित राहते, तेव्हा बालकाचाही विकास विस्कटतो. म्हणूनच ‘बालकप्रधान समाजा’ची कल्पना स्वीकारायला हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com