

‘कुटुंब’ हा तसा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातच आपण वाढलेलो असतो, घडलेलो असतो. कुटुंबातल्या प्रत्येकाशी आपले काही भावनिक अनुबंध असतात.
‘कुटुंब’ हा तसा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातच आपण वाढलेलो असतो, घडलेलो असतो. कुटुंबातल्या प्रत्येकाशी आपले काही भावनिक अनुबंध असतात. पण मौज म्हणजे या ‘कुटुंब’ संकल्पनेवर / संस्थेवर काही अभ्यासकांनी अगदी पराकोटीची टीकाही केली आहे. अक्षरशः तुटूनच पडली आहेत ही मंडळी.
शुलामिथ फायरस्टोन म्हणतात, ‘जीवशास्त्रीय कुटुंब हेच स्त्रीच्या दुय्यमत्वाचं कारण असतं. या कुटुंबात स्त्रीला पुरुषावर अवलंबून राहावं लागतं. माणसाची पोरं स्वतःच्या पायांवर उभी राहण्यासाठी जो दीर्घ काळ लागतो, त्यात स्त्री अडकून पडते. ‘आई-बाळ’ नात्यामुळे तिची मानसिकता वेगळी घडते आणि त्यातून स्त्री-पुरूष अशी जी श्रमविभागणी होते, ती तिच्यावरच उलटते. हे ‘जीवशास्त्रीय कुटुंब’ नष्ट केलं, तरच स्त्रीची दुय्यमत्वातून सुटका होईल.'
स्त्री जेव्हा पुरुषाची पत्नी होते, तेव्हाच ती त्याच्या कुटुंबाची सदस्य होते. कुटुंब स्त्रीला सुरक्षितता देतं, असं म्हटलं जातं. पण ‘स्त्री-पुरूष’मध्ये छाया दातार यांनी अतिशय परखड, जळजळीत शब्दांत ‘कुटुंब संस्थे’चा समाचार घेतला आहे. त्या म्हणतात, ‘सुरक्षिततेचं कोंदण म्हणता म्हणता कुटुंब ही स्त्रियांच्या स्वातंत्र्याची कबरच बनली. कुटुंबसंस्था ही सर्वांत प्राथमिक संस्था खरी; पण याच संस्थेच्या रचनेमुळे स्त्री, पुरुषाच्या पोटात सामावली गेली. भले कुटुंबसंस्था ही समाज धारणेची महत्त्वाची वीट बनली. पण या विटेच्या आत दोन व्यक्ती, दोन वेगळ्या प्रवृत्ती ‘नांदता’हेत याचं भानच राहिलं नाही. कारण एकीनं दुसऱ्याला स्वतःचं जीवन अर्पण करून टाकलं... या स्वातंत्र्याच्या कबरीत स्वतःला चिणून घेतलं’. हे नेमकं कसं झालं, या संदर्भात छाया दातार यांनी अतिशय विस्तृत स्वरूपात आपली भूमिका मांडली आहे आणि नंतर त्या ‘कुटुंब नको’ अशा निष्कर्षालाही आल्या आहेत.
ही ‘स्वातंत्र्याची कबर’ उखडून टाकण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, या संदर्भातही त्यांनी स्वतःचे विचार मांडले आहेत. मात्र तिकडे वळण्यापूर्वी त्यांची ‘कुटुंब’विषयक भूमिका समजून घ्यावी लागेल. त्यांच्या प्रतिपादनातील प्रमुख मुद्दे असे आहेत. प्रारंभी सामुदायिक जीवनपद्धती होती. पण हळूहळू खासगी संपत्तीचा संचय होऊ लागला आणि अशी संपत्ती असलेल्या पुरुषाच्या ‘मालकी’चं कुटुंब निर्माण झालं. कुटुंबातल्या स्त्रीचं स्वातंत्र्य संपवलं गेलं. आपलं अपत्य कळावं व आपल्या खाजगी संपत्तीला वारस मिळावा, या पुरुषी गरजेपोटी स्त्रीवर बंधनं आली. तिच्या इच्छेचा कुणी विचारच केला नाही. शेतीच्या कामासाठी तिला भरपूर मुलं व्हावीत, अशी अपेक्षा पुरूष करू लागले. स्त्रीचे श्रम हे समाजासाठी खर्ची न पडता, पुरुषासाठी व मुलांसाठी खर्ची पडू लागले.
सामुदायिक जीवन पद्धतीतही स्त्रिया मुलांचं संगोपन मोठ्या प्रमाणावर करीत; पण कुटुंबसंस्थेमध्ये पुरुषांच्या ‘सेवे’चीही कामं त्यांना करावी लागली. स्वयंपाक करणं, कापड विणणं, शेतीत काम करणं… ही उत्पादनाची कामं स्त्रिया पूर्वीही करत. परंतु पुरुषाला बसल्याजागी प्यायला पाणी आणून देणं, त्याचे पाय चेपणं, खरकटी ताटं उचलणं ही ‘सेवा’ स्त्रियांच्या माथी आली. स्त्रियांचं गुलामपण इथे सुरू झालं...
मग पुढे कुटुंबाचा मान राखणं, चालीरीती पाळणं... ही कर्तव्यंही आली. कुटुंब म्हणजे खरं तर पुरुषाचा विस्तारित ‘अहं’ होता... आजही आहे. संरक्षणकर्ता, पालनकर्ता, या भूमिकांतून पुरुषांनं आपली कुटुंबाची कल्पना आणि मालकी पक्की केली. स्त्रीला निर्णयस्वातंत्र्य नाकारून, सामाजिक व्यवहारातून तिला हद्दपार करून, स्वतःच्या हुकुमाचं ताबेदार बनवलं. घराच्या बाहेर न पडल्यानं स्त्रीची कोंडी झाली. ती घर नावाच्या पिंजऱ्यात अडकली, तरीही दुसऱ्या बाजूनं तिला त्या पिंजऱ्यांच्या गजाचा आधारही वाटत राहिला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे कुटुंबाची चौकट तोडणं... असं समीकरण तिच्या मनात घट्ट झालं आणि त्या कल्पनेचं तिला भय वाटू लागलं.
वरवर पाहता कुटुंबसंस्थेची रचना आदर्श असल्याचं भासतं; पण ती प्रत्यक्षात अत्यंत दांभिक रचना आहे. स्त्रीच्या पातिव्रत्याचे पोवाडे गायले जातात; पण पुरुषाच्या पत्नीव्रताचा उल्लेखही केला जात नाही. स्त्रीला पातिव्रत्याच्या नावाखाली ‘कुटुंबा’त कोंडून, गणिका संस्था निर्माण करून पुरुषानं स्वतःच्या स्वैराचाराची सोय करून ठेवली. पुरुषी ‘स्वैराचारां’चा स्त्रियांना धसका असतोच. एका पुरुषाला सोडलं, तर सतरा पुरुषांचं आपण भक्ष्य होऊ, या भीतीनं स्त्री कुटुंबात होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करून त्याला ‘उबदार घरकुल’ म्हणते. कुटुंबव्यवस्थेमुळे, त्यातील असमानतेमुळे व दडपणामुळे स्त्रीचं व्यक्तिमत्व बोटचेपं बनतं.अशी ही कुटुंबरचना स्त्रीनं आदर्श मानायची, ती कुठल्या आधारे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.