गुगलबाबा, पैसाही बोलता है! (वुई द सोशल)

shrimanta mane writes about google viral post
shrimanta mane writes about google viral post

सामान्यांना व्यक्‍त होण्याचं परिणामकारक साधन असं सोशल मीडियाचं कितीही कौतुक असू द्या; या माध्यमातही पैसा बोलतो, हेच शेवटी खरं. फेसबुक, व्हॉट्‌सऍप पोस्ट किंवा ट्‌विटस्‌ हा वरवर बोटांवरचा खेळ वाटला तरी अंतिमत: वरच्या स्तरावर अर्थकारणच निर्णायक असतं. तसंही विचारस्वातंत्र्य व अतिरेक यात एक पुसटशी रेष असते. ती ओलांडली गेल्यानं "यूट्यूब'ची मालकी असलेली गुगल कंपनी अडचणीत आलीय. जगभरातले बहुतेक सगळे मोठे "ब्रॅंण्ड' यूट्यूबवर जाहिराती करतात. गुगलला त्यातून मिळणारं उत्पन्नही मोठं आहे. पण, असं लक्षात आलं की दहशतवादी किंवा अतिरेकी विचारांशी संबंधित व्यक्‍ती, संघटना अन्‌ त्यांना अर्थसाह्य करणाऱ्या संस्थांशी संबंधित व्हिडिओ सुरू असताना त्या जाहिराती दाखवल्या जात असल्यानं ग्राहकांमध्ये जाहिरातदार कंपन्यांबद्दल गैरसमज निर्माण होताहेत. या अतिरेकी विचारांमध्ये केवळ इस्लामशी संबंधित लोक किंवा संस्था आहेत, असं नाही. अगदी "ब्रिटन फर्स्ट'सारखी संस्थाही त्यात आहे. व्हिडिओ भलत्याच विचारांचा प्रसार करणारा अन्‌ तळाला जाहिराती; मात्र व्यावसायिक असा प्रकार ग्राहकांना खटकल्याचे लक्षात आल्यानंतर जाहिराती काढून घेण्याचा सपाटा कंपन्यांनी लावला. जवळपास अडीचशे "ब्रॅण्ड' या मोहिमेत सहभागी झाले. परवाच्या अतिरेकी हल्ल्यामुळं हादरलेल्या ब्रिटिश सरकारनं त्या घटनेआधीच सरकारी जाहिराती यूट्यूबवरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. मार्क्‍स ऍण्ड स्पेन्सर, मॅक्‌डोनाल्ड, टेस्को, टोयोटा, फोक्‍सवॅगन, बीबीसी, लॉरियाल, एचएसबीसी, रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड, लॉयडस्‌, ऑडी, चॅनल 4, गार्डियन अशा नामांकित कंपन्यांनीही अतिरेकापासून दूर राहण्याची भूमिका घेतल्यानं गुगल कंपनी हादरली. मुख्य व्यवसाय अधिकारी फिलिप शिंडलर यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्‍त केली. पुढे असं घडणार नाही, अशी हमी दिली. तरीदेखील तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. गुगलकडून व्हिडिओ व जाहिराती यांच्या परस्परसंबंधांवर काही ठोस धोरण निश्‍चित होईपर्यंत जाहिराती न करण्याची भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. 
असाच आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण माफीनामा पाकिस्तानमधला आहे. प्रेषित महंमद व इस्लामच्या निंदानालस्तीबाबत (ब्लासफेमी) पाकिस्तानात कडक कायदा आहे. त्यात देहदंडाची तरतूद आहे. अशी ईश्‍वरनिंदा सोशल मीडियावर होण्याचे प्रमाण वाढल्यानं पाक सरकारनं फेसबुक व ट्‌विटरकडे मदत मागितलीय. दोन्ही कंपन्यांची कार्यालये अमेरिकेत असल्यानं तिथले पाक उच्चायुक्‍त ईशनिंदा करणाऱ्या खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पाकिस्तानच्या मंत्र्यांनीच दिली. तेव्हा, "बीबीसी एशियन नेटवर्क'नं दर्शकांकडून मतं मागवताना, ""ईश्‍वरनिंदेसाठी कोणती शिक्षा योग्य आहे, असं तुम्हाला वाटतं'' असा प्रश्‍न विचारला. ती मतं "बीबीसी एशियन नेटवर्क' किंवा "शाझिया अवान' यांच्या "ट्‌विटर हॅंडल'वर मागवण्यात आली होती. त्या प्रश्‍नात अप्रत्यक्षरीत्या ईश्‍वरनिंदा हा गुन्हा असल्याचं समर्थन असल्याचं ध्वनित होत असल्यानं वाक्‍यरचनेवरून मोठा गदारोळ माजला. ""तुम्हाला काय, ईश्‍वरनिंदेसाठी लोक जिवानिशी जातात'', अशा आशयाच्या प्रतिक्रिया जगभरातून उमटल्या. अखेर "बीबीसी'ने दिलगिरी व्यक्‍त करून ते आवाहन मागं घेतलं. 

मुंबईसारखंच "लंडन स्पिरिट'! 

बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांतच जगणं रुळावर आणणाऱ्या मुंबईकरांच्या धैर्याचं नेहमीच कौतुक होतं. वारंवार अशा घटना घडणं योग्य नसलं तरी या धैर्याचा प्रत्येकाला अभिमान असतोच. इंग्लंडची राजधानी लंडननं परवा ब्रिटिश पार्लमेंटसमोर, वेस्टमिन्स्टर पुलावरच्या हल्ल्यानंतर तशीच हिंमत दाखवली. खालिद मसूद नावाच्या माथेफिरूच्या कृत्यात वीरमरण आलेला पोलिस अधिकारी किथ पाल्मर, मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी निघालेली आयेशा फ्रेड वगैरे पाच जणांचा बळी गेला. "एमआय-5' पथकानं काही तासांत बऱ्याच संशयितांना अटक केली. पण, ब्रिटिश पोलिसही चुकतात बरं. हल्लेखोराचं नाव आधी अबू इझादीन सांगितलं. पण, लक्षात आलं, की तो तर तुरुंगात आहे. हल्लेखोर मुस्लिम असल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या थोरल्या मुलानं लंडनचे महापौर सादिक खान यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मोबाईलवर बोलत जाणाऱ्या मुस्लिम महिलेचं छायाचित्र व्हायरल झालं. पण, लंडनच्या शांतताप्रेमी अल्पसंख्याकांनी सौहार्द्र दाखवलं. हल्ल्यातील बळी-जखमींसाठी निधिसंकलन केलं. दरम्यान, "अशा भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही', हे दाखवताना अनेक लंडनवासी त्या सायंकाळी मुद्दाम हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये जेवले. मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून त्यांनी "लंडन स्पिरिट' दाखवून दिलं. 
........................................................ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com