esakal | सं- वाद?
sakal

बोलून बातमी शोधा

sonali navangul

सं- वाद?

sakal_logo
By
सोनाली नवांगुळ

‘नथिंग टू हाइड’ नावाचा सिनेमा बघत होते. प्रौढ मित्रमंडळी एका पार्टीसाठी जमलीत. बाहेर लागलेल्या चंद्रग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवर, मित्रमंडळींच्या गप्पागोष्टींत एक खेळ सुरू होतो, तो मोबाईल कोण लॉक करतं नि कोण नाही यावरून. एकजण म्हणतो, ‘मी नाही करत लॉक. कारण माझ्याकडे लपवायसारखं काहीच नाही.’ इथंच अव्यक्त संघर्षाची ठिणगी पडते नि ठरतं की सगळ्यांनी आपापले मोबाईल समोर ठेवायचे नि कुठल्याही प्रकारचा मेसेज किंवा फोन आला तर तो घरातल्या खासगी स्पेसमध्ये सार्वजनिक करायचा. वरून हसते-खेळते मित्रमैत्रिणींचे या खेळात खरंतर आतून धाबे दणाणलेले! यातून नंतर बरंच अप्रिय उघड होतं नि घटित सांगायचं किंवा लपवायचं या भरात माणसं एकमेकांना घायाळ करतात. दिसणारी घटना व त्यामागचं सत्य यात अंतर असतं याचा तर्कविचार शक्‍यच नसतो. अशा वेळी नि मग समोरच्यानं अतिखासगीपणा जपणं किंवा शेअर न करणं म्हणजे माणसांना रिजेक्‍शन वाटायला लागतं. आपण स्वत:च्याही ‘खोल’वर ओळखीचे असतोच असं नाही, हा विचार या गोंधळात मनात उगवणं शक्‍यच नसतं. ते न कळल्यानं भ्रमनिरास होतो.

माणसांच्या या खोल नकाशांबद्दलची, पटकथाकार ऊर्मी जुवेकरनं सांगितलेली गोष्ट आठवतेय. तिचं काही लेखन ती सत्यदेव दुबेंना दाखवून चर्चा करत होती, की संवादांच्या आत दडलेली संहिता नीट मांडता येतेय की नाही नि ती येत नसेल तर मग पाहणाऱ्याला अनुभवांशी जोडून घेता येईल अथवा नाही. दुबे तिला म्हणाले, ‘तू म्हणतेस त्याचा विचार तुझ्या लिखाणात दिसतोय. चांगलं लिहिलंस.’ तेव्हा ती म्हणाली, ‘पण मला संवाद लिहिताना थबकल्यासारखं होतं.’ दुबेंचं उत्तर होतं, ‘माणसं एकमेकांशी बोलतात ते एकमेकांना कन्व्हिन्स करण्यासाठी. आपली गोष्ट समोरच्याला पटवण्यासाठी. बाकी कुठं काय बोलणं होतं माणसांमध्ये बघ बरं!’ ऊर्मीला पटलं नि त्या युक्तीला हाताशी घेत तिनं नवे संवाद रचले व पुन्हा दुबेंकडे गेली. सांगितलं की तुम्ही दिलेल्या युक्तीचा खूप फायदा झाला मला. ऊर्मी असं म्हणताक्षणी दुबे गूढ हसत तिला म्हणाले, की आणखी एक सांगायचं राहिलं बरं का... माणसं एकमेकांशी बोलतात लपवण्यासाठी. काहीतरी दिसू नये म्हणून भरमसाट गोष्टींचा पसारा ती मांडत राहतात.

काय खरं नि काय खोटं! माणसांच्या संवादांचे व ते ज्यातून येतात त्या जगण्याचे, अनुभवांचे इतके स्तर नि इतके रंगनिरंग आहेत की ते नेमके मांडणं हे आव्हान धडकी भरवणारंच. असं असूनही, न मोजता येणारे अपेक्षाभंग नि भ्रमनिरास झेलत माणसं गुंतत राहतात एकमेकांत, हे सत्य झाकोळलं जात नाही.

loading image