निकड...

sonali navangul
sonali navangul

कुठलीही दोन माणसं कसल्याच कुरबुरीविना नांदू शकतात का कुठल्याही नात्यात? वादविवादाचा एक टिपूसही नाही नि नातं बघता बघता तुटून गेलं असं घडतं तेव्हा का घडतं? ‘दृष्टी’ नावाचा गोविंद निहलानींचा सिनेमा बघत बसलेले. त्यात आठ वर्षांच्या नात्यातून उठून जाण्याचं बोलताना नवरा म्हणतो, ‘तू एकदम आदर्श बायको, आई, यजमानीण. तुझ्याभोवती इतक्‍या भिंती घालून घेतल्यास की त्या ओलांडून माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचलाच नाही.’ ती गोंधळलेली की कुठं काय कमी पडलं नि अपमानितही, की इतकं करून हे असं? तेव्हा म्हणते, ‘तुझ्यापर्यंत पोचला का माझा आवाज?’ - पुष्कळदा होतं असं की आपण बरंच बोलत राहातो नि त्यातून बिनसलेलं काही नीट होऊन जाईलसं वाटत राहतं. असंही होतं ना की प्रत्यक्षात किंवा फोनवर बोलताना समोरच्या कुणाचं बोलणं एका क्षणी थांबतं. कसल्याशा असुरक्षिततेपोटी किंवा पोकळीच्या गर्भित भीतीनं आपण समोरच्याच्या बोलण्यातली शांतता ऐकू येऊ नये म्हणून बडबड चालू ठेवतो. नंतर नंतर आपलाच आवाज आपल्याला ऐकू येऊ लागतो. त्यामुळे निराश वाटतं, एकटं वाटतं. खरं अनेकदा ते तसं नसतं. आपली भावनिक अवस्था प्रत्येक वेळा समोरच्याशी मॅच होऊ शकत नाही आणि आपण तिरकी उत्तरं शोधतो. संवादाच्या जागा कळायला हव्यात, तशा स्वत:च्या नि समोरच्याच्या गप्प असण्याच्याही जागा कळायला हव्यात की. अवघड असल्या तरी. आपल्या सहवासातल्या लहान-मोठ्या माणसांच्या संपूर्ण समाधानाची व स्थैर्याची हमी आपण खरंच घेऊ शकत नसतो हे मान्य करायला नको काय? ‘दृष्टी’ बघताना असे खूप विचार मनात येत राहिले.

शेजारची सई काही निमित्तानं बोलली. तिचा नवरा सैन्यदलात. लांब, धोक्‍याच्या जागी पोस्टिंग मिळालेला. सईची इरा दोन वर्षांची. सईचं दिवसभर टेराकोटावरचं नक्षीकाम. ती इतकी गढलेली असते सतत, की बाहेरचं जग जणू तिच्या लेखी हयात नसतं किंवा ती दार उघडून डोकावते बाहेर, तेव्हा तिच्यापुरतं, तिला हवं तितकं ते खुलं होतं. मी सहज म्हटलं तिला, की तू माणूसघाणी नव्हेस, पण तुला जमतं कसं इतकं मूकपण? म्हणाली, ‘बोलणं खूप ताकद देतं हे खरंय, पण मी जाणीवपूर्वक हे ‘अर्ज ऑफ स्पिकिंग’ आटोक्‍यात ठेवलंय. कधीकधी जरुरी नाहीत अशा गप्पा आपण मारत जातो नि त्यातून न कळत कुणाची तरी चेष्टा, माघारी बोलणं, खासगी भाग उलगडणं होतं. अनियंत्रित गप्पांमधून येणारा तणाव नि दूषित वातावरण टाळण्यासाठी मी माझ्यापुरता हा मार्ग घेतलाय. मात्र यातून साचलेपण नकोय यायला. म्हणून शब्दांपेक्षा रंगब्रश हा पर्याय!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com