esakal | कुणीतरी, कुठेतरी असतं...
sakal

बोलून बातमी शोधा

sonali navangul

कुणीतरी, कुठेतरी असतं...

sakal_logo
By
सोनाली नवांगुळ

समजा गाला-हनुवटीवर खळ्या आहेत, तर ओळखू येतात. ओठांची विशिष्ट मुडप, तुमच्या घशावरचं दृश्‍य-अदृश्‍य होणारं हाड, भुवईचा विशिष्ट बाक, नाक उडवण्याची तऱ्हा नि काही विशिष्ट लकबी लक्षात येतातच सहज. पण कधी कधी एखादं जगणं इतकं बिनमहत्त्वाचं असतं, की त्याच्या लकबींविषयी मुद्दामहून बोलणारं कुणी असत नाही. या निरुल्लेखाचे निनावी पोचे आपल्या नकळत आत खोल राहतात. अशा गर्दीत हरवलेल्या नि पुन्हा मुंबईत हातावरचं पोट असलेल्या रफीला त्याची आजी भेटायला येते, ती अखेर त्याला लग्नासाठी कुणीतरी मुलगी भेटली या आनंदानं. ती कौतुकानं म्हणते, ‘तुझं ते खास ओठाच्या कोपऱ्यातलं हसू, तुझ्या आजोबांची आठवण देणारं!’ ती कौतुकानं असं म्हणत राहाते. आपल्या आयुष्यात कुठलीही जोखीम न घेऊ शकलेली, अगदी स्वत:साठी कपड्याचा रंग निवडण्याचीही, ती मिलोनी. ती अनोळखी असणाऱ्या फोटोग्राफर रफीसाठी का म्हणून त्याची होणारी बायको नुरी असल्याचा बनाव पार पाडत असेल? एकमेकांच्या आयुष्यातली कुठली कमतरता ही दोन वेगळ्याच परिस्थितीतील माणसं पुरी करत असतील? मिलोनी स्वत:चा फोटो बघत रफीला म्हणते, ‘या फोटोतली मुलगी आहे, ती माझ्याहून अधिक सुंदर नि खूश दिसतेय.’ तेव्हा तिला स्वत:तलं हरवलेलं काय समजून आलं असेल? आपण कोण व कसे आहोत हे जाणवून देणारी, आपल्या मन:स्थितीच्या बदललेल्या कलाची नोंद घेणारी माणसं जगण्याच्या रेट्यात पुढे जाताना बहुमोल असतात, मग ती मिलोनीच्या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात तोंड मिटून काम करणारी रामप्यारी का असेना! रोज झोपताना मिलोनीला दूध-कॉफी असं काहीतरी आणून देऊन तिला, ‘दीदी, और कुछ दूँ? बिस्कीट?’ असं विचारणारी रामप्यारी मुळात तितकंच विचारत नसते. ती तिच्या परीनं मिलोनीविषयी प्रेम दाखवत असते. काही गोष्टी ठसठशीतपणे दाखवाव्या लागत नाहीत, नाहीतर त्या फार बऱ्या दिसत नाहीत, हे मिलोनीलाही कळतं. रोजच्या जगण्यात जे घडतंय ते फार मनासारखं नसलं, तरी स्वप्नील वाटणाऱ्या नजरेच्या, स्पर्शाच्या, प्रश्‍नाच्या, उत्सुकतेच्या धाग्याला धरून कल्पनाविश्‍व फुलवता येतंच. ... म्हणून डोळे मिटून त्रयस्थाच्या नजरेनं स्वत:ला स्वप्नात नव्यानं रचत असू...आपल्याला विशिष्ट चाकोरीत न पाहणाऱ्या माणसांबरोबर रमत असू...अशा माणसांबरोबर आपल्यातलं अवघडलेपण गळून जाऊन अदृश्‍य रेषा ओलांडता येत असावी. ‘फोटोग्राफ’ सिनेमाच्या निमित्तानं अशी माणसं आठवली कितीतरी! चिमुरडी हिमानी माझ्या वाढदिवशी कानाशी कुजबुजत म्हणालेली, ‘गिफ्ट आहे तुझ्यासाठी.’ म्हटलं ‘दाखव.’ तर, ‘ऐकायचं गिफ्ट आहे’ म्हणत डोळे मोठे करत म्हणाली, ‘माझं नाव हिमानी नवांगुळ.’

loading image