काळजी

sonali navangul
sonali navangul

विशिष्ट गोष्टींबद्दल समाजाची संवेदनशीलता शहाणी नाहीये, हे आपल्याला कळत असेल तर थांबावं की नाही? माणसं अमुक जागी चुकतात हे सवयीचं झाल्यावर तरी! - अशा गोष्टी शांतपणात लक्षात येतात, पण रागाचा पारा चढला की मात्र याबद्दलची स्मरणशक्तीच जाते. परवा असंच झालं. मला ओळखणारी एक ताई म्हणाली, प्रवासाला जाताना ‘ती’ गाडी नेणारेस का ‘ही’ ? म्हटलं ती ‘गाडी’ किंवा ‘गाडा’ नाहीये. पॉवर चेअर किंवा स्वयंचलित व्हीलचेअर म्हण. ती म्हणाली, ‘नाही. मी गाडीच म्हणणार.’ मी चेकाळले. म्हटलं, ‘तुझ्या अंगावरच्या कपड्यांना मी ठिगळांचा कुर्ता म्हणणार.’ आवाज थोडे चढलेच. मी वाद ‘चालवण्यात’ जास्त तर्कशुद्ध नि तिच्याहून मुरलेली असल्यामुळे माझ्याकडे बॅटन आलं नि ते थांबलं. हे पाहत असलेला माझा ज्येष्ठ मित्र म्हणाला, ‘मान्य आहे, एखाद्या अशा साधनाविषयी तू किंवा असे सगळेच विशिष्ट गरजा असणारे लोक अधिक संवेदनशील असता, पण ज्यांना लक्षात येत नाही, त्यांच्याशी हुज्जत नको घालू. त्यामुळं तूच ते दुखरेपणानं धरून ठेवलं आहेस असंही दिसतं. शिवाय बोलणाऱ्या माणसाचा मुद्दाम हिणवण्याचा हेतू आहे का हेही बघ.’ खरंतर दोघांचंही बरोबर. अपंगत्त्व असो किंवा जात, धर्म, वर्ण, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, काम, लिंग... कुणी काही बोलायला लागलं की विशिष्ट गोष्ट आपल्याला निर्देश करून बोलली जातेय, असं वाटून आपल्या लाह्या तडतडायला लागतात. कधी त्या जाणूनबुजून तापवल्या जातात, कधीकधी अगदीच अजाणिवेनं. रागाचा पारा चढताना हे निरखण्याचं भान राखण्यासाठी काय करायचं नि हल्ला करायची योग्य दिशा कुठली हे कसं ठरवायचं हा आपला आपला रियाझ. पण जेव्हा विचार, बदल झिरपवायचा असतो, तेव्हा तोंड उघडण्याशिवाय पर्याय नाहीच. अर्थाचं नि संवेदनेचं आकलन समोरच्या ‘जाणीव-अजाणीव’ ठेवून बोलणाऱ्याला ताबडतोब येईल असं नाही, पण योग्य उच्चार करवून घेतलाच पाहिजे. काही गोष्टींवर ताबडतोब प्रतिक्रिया दिल्यामुळं, चुकीचं बोलणाऱ्या-वागणाऱ्यांना किमान धडधडेल तरी! नंतर मंद आचेवर भात शिजवता येईल की. तिथं संयम नको.

‘माणसां’ची जाणिवेनं काळजी घ्यायची, तर ‘अलोहा’ अंगात मुरवून घ्यायचं, असं एका सिनेमात सांगितलेलं आठवतंय. अलोहा म्हणजे आस्क, लिसन, ऑब्जर्व्ह, हेल्प, आस्क अगेन! काळजी घेण्याची म्हणजे ‘केअर गिव्हिंग’ची ही मूलतत्त्वं. मग ‘काळजी’ घ्यायची, तर विशिष्ट परिस्थितीतल्या माणसांची अधिक घ्यायची हे खरं, पण सरसकट हा भेद करून नाही चालणार! न कळणाऱ्याला सांगत व स्वत:ला सांगण्याच्या पद्धतीबद्दल साक्षर करतच हे होईल. - प्रश्‍न बॅटन अखेरीस कुणाकडं आलं याचा उरणारच नाही मग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com