संघर्षसिद्धा मराठी

डॉ. यशवंत मनोहर
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

जगा आणि जगू द्या, विज्ञाननिष्ठा आणि सर्वांना समान न्याय, ही मूल्यं मराठी संस्कृतीत भिनलेली आहेत, त्यामुळेच ही भाषा जागतिकीकरणाच्या संकटांवर मात करेल.

मूलतः मराठी भाषेची प्रकृती संघर्ष करीत पुढं जाण्याची आहे. या तिच्या स्वभावामुळंच ती सतत वर्धिष्णू राहिली. ती कुठंही आटून, थिजून वा मावळून गेली नाही. ती सतत युयुत्सू राहिली. स्वतःची अन्वर्थकता प्रकट करीत राहिली. मागल्या किमान हजार वर्षांत तिनं मराठी भाषकांना जीवनात कसं उभं राहावं आणि उज्ज्वल जीवनाची निर्मिती कशी करावी ते शिकवलं. या हजार वर्षांत ती केवळ टिकूनच राहिली असं नाही, तर स्वतःची क्षमता वाढवित राहिली, स्वतःचा विस्तार करीत आली.

नाथ संप्रदायाच्या प्रेरणेनं चक्रधरांनी तिला संस्कृतमुक्त केलं आणि मराठी भाषकांना निखळ मराठी निरूपिली. हे भाषिक, सामाजिक बंडखोरीचं आणि चातुर्वर्ण्याच्या विरोधाचं निशाण मायमराठीनं आपल्या प्रारंभकाळातच खांद्यावर घेतलं. चोखोबा, जनाई, तुकोबा, बहिणाबाई, शाहीर, पुढं बाबा पदमनजी, केशवसुत यांच्यापासून आंबेडकरवादी, सत्यशोधक, ग्रामीण, मार्क्‍सवादी, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लिम, भटके-विमुक्त यांच्यापर्यंत हे निशाण अधिकाधिक जोमानं फडकत राहिलेलं आहे. हा सर्व इतिहास मराठीच्या स्वातंत्र्याचाच इतिहास आहे. परिवर्तनविरोधी शक्तींशी संघर्ष करताना ती तेजस्वी होत गेली.

मराठी भाषा मूलतत्त्ववादी नाही. ती प्रागतिक आहे. तलाव होणं टाळून ती नदीसारखी प्रवाही राहिली. खुलेपणा आणि पुनर्रचना ही आपली प्रकृती तिनं जपली. स्वतःसाठी विघातक ते तिनं फेकलं, विधायक ते पत्करलं. संस्कृत, फार्सी, अरबी, उर्दू, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषांमधील शब्द तिनं स्वीकारले. या शब्दांना मराठी चेहरा दिला. बदल, सतत बदल ही जीवनाची प्रकृती आहे. हे जो समाज समजावून घेतो आणि जिज्ञासू, शोधक होऊन स्वतःला नवनव्यानं बांधत राहतो, तो समाज कधी जुना होत नाही. जो समाज सतत नवनव्या गरजांची निर्मिती करतो, त्या समाजाची भाषा त्या गरजांची अभिव्यक्ती करीत बदलत राहते. इंग्रज, जर्मन, फ्रेंच, अमेरिकन, जपानी, चिनी या भाषक समाजांनी नवी आव्हानं निर्माण केली आणि या आव्हानांना व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या भाषा अधिक सक्षम झाल्या. या भाषा मृत्युंजय ठरल्या. ग्रीक, लॅटिन वा संस्कृत या भाषांप्रमाणे त्या लयाला गेल्या नाहीत. याचा अर्थ जो समाज नवनवी आव्हानं निर्माण करतो, त्या समाजाची भाषा लयाला जात नाही असा आहे. समाजाचं वाहणं थांबलं की भाषेचं थिजणं अटळ असतं. भाषेचं अन्वर्थक असणं हे समाजाचंच अन्वर्थक असणं असतं.

अव्वल इंग्रजीतील प्रबोधनामुळं मराठीला मोठ्या प्रमाणात स्वतःला सक्षम करण्याचं आव्हान मिळालं. कारण मागील अनेक शतकं अध्यात्मानं तिची इहलोकाशी, त्यातील दाहक आव्हानांशी गाठच पडू दिली नव्हती. त्यामुळं मराठीला एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात स्वतःला नव्यानं रचावं लागलं. या आव्हानावर तिनं मात केली आणि विसाव्या शतकात तर ती पूर्ण स्वयंप्रकाशित झाली. जागतिकीकरणाची अर्थसत्ता भांडवलदारांच्या हातात आहे. जागतिकीकरण म्हणजे सर्व जग सारखं करणं वा सपाट करणं. यात भाषिक, सांस्कृतिक आणि वाङ्‌मयीन सपाटीकरणही अभिप्रेत आहे. "आपल्या भाषिक, सांस्कृतिक, जीवनदृष्टीविषयक आणि वाङ्‌मयीन विविधतांशी फारकत घेऊन या सपाटीकरणात समरस व्हा, स्वतःला आमच्यात विलीन करा,' असा हा दुष्ट प्रस्ताव आहे. पण, त्यापुढं मराठी शरणागती पत्करणार नाही.

लोकसंख्येच्या दृष्टीनं मराठीचा जगात सतरावा क्रमांक आहे आणि महाराष्ट्रातील, भारतातील आणि विदेशातील मिळून मराठी भाषकांची संख्या दहा कोटी आहे. एवढ्या लोकांनी निष्ठेनं मराठी बोलण्याचा, ज्ञान-विज्ञानातील प्रश्‍नांचा मराठीतून विचार करण्याचा आणि मराठी ललित साहित्याचे निर्माते आणि वाचक होण्याचा जीव ओतून प्रयत्न केला, तरी मराठीचा दिवस कधीही मावळणार नाही. मराठीचा गौरव वाटावा असं श्रेष्ठ वैचारिक वाङ्‌मय तिच्यात आहे. फुले, लोकहितवादी, डॉ. आंबेडकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, गं. बा. सरदार, शरद पाटील, रावसाहेब कसबे यांच्यासारख्यांची दीपमाळ मराठीजवळ आहे. संपर्कात येणाऱ्या भाषांमधील शब्दांचं मराठीकरण करून घेण्याची क्षमता आहे. भाषेला नवनव्यानं घडवणारे आणि नवे शब्द, नव्या प्रतिमा आणि रचनेच्या नव्या तऱ्हा निर्माण करणारे साहित्यिक मराठीत आहेत.

वऱ्हाडी, खानदेशी, दख्खनी, कोकणी, ठाकरी, वारली, आगरी अशा बोलींचं मराठीचं महाकुटुंब आहे. या बोलींमधील शब्दांचे पाट मराठीला सतत येऊन मिळतात. मराठी पूर्वीसारखी उच्चवर्णी मध्यमवर्गापुरतीच सीमित राहिली नाही. आंबेडकरवादी, स्त्रीवादी, आदिवासी- भटके-विमुक्त, मुस्लिम, मार्क्‍सवादी, ग्रामीण, विज्ञानवादी या साहित्यप्रवाहांनी मराठीचं साहित्य आणि शब्दभांडार समृद्ध केलं आहे. ही नवी आणि अपूर्व ताकद तिला मिळाली आहे. ती आता मूठभरांची भाषा राहिली नाही. आता ती सर्वच लोकांची भाषा झाली आहे. मराठी राजभाषा असणं मोलाचंच; पण ती लोकभाषा होणं तिच्या दीर्घायुष्यासाठी फारच आवश्‍यक आहे. जगा आणि जगू द्या, विज्ञाननिष्ठा आणि सर्वांना समान न्याय, ही संविधानसंस्कृती मराठीची संस्कृती आहे. ही विश्‍वाला मार्गदर्शन करणारीच संस्कृती आहे.

ही संस्कृती जिच्या रक्तात आहे, जी बोलणारा विराट समाज आहे आणि जिची दारं जगातील सकल उजेडांच्या सन्मानासाठी सतत उघडी आहेत आणि जी सतत पुनर्रचनाशील आहे, ती भाषा आपल्या या सामर्थ्यामुळंच जागतिकीकरणाच्या संकटांवर मात करेल, ही खात्री आहे. सर्वच मराठी भाषकांनी मराठीची ही महत्ता मनात वागवायला हवी. अधिकाधिक अन्वर्थक अस्तित्वासाठी संघर्ष हाच मराठीचा बाणा आहे. म्हणून आपण सर्वांनीच मराठीसंबंधी भयभग्न मनानं विचार करणं टाळायला हवं. कुसुमाग्रज नावाच्या मराठीच्या महानायकाला विनम्र अभिवादन करताना हाच संकल्प करायला हवा.

(लेखक साहित्यिक, समीक्षक आहेत.)

Web Title: struggle proven marathi language