कोरोनामुळे होणारे मृत्यू आपण कसे कमी करू शकतो?

Corona
Corona

नव्या वर्षाची सुरुवात होताच ‘कोविड १९’ हळूहळू मागे हटताना आपण पाहिले. सप्टेंबर २०२०च्या तुलनेत रुग्णांची संख्या देशात नाट्यमयरीत्या कमी झाल्याचे आढळून आले. मात्र, आता स्थिती पुन्हा बदलली आहे आणि पुण्यात ते प्रकर्षाने जाणवते आहे. हे का आणि कसे झाले, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल व केवळ अंदाज न करता माहितीआधारित (डेटा) प्रश्न विचारावे लागतील.

कोरोनाची दुसरी लाट का आली आहे? आपण वाढत चाललेली रुग्णसंख्या कशी कमी करू शकतो? आपण केस पॉझिटिव्हिटी दर कमी करू शकलो नाही, तरी मृत्यूदर कसा कमी करू शकतो? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे होणारे मृत्यू आपण कसे कमी करू शकतो...

संसर्गाची लक्षणे नाहीत...
मार्च व एप्रिल २०२०मध्ये विषाणूचा संसर्ग कमी लोकांना झाला होता व त्यामुळे त्यांना शोधणे व अशा लोकांना वेगळे करणे (आयसोलेट) शक्य होते व त्यामुळे मृत्युदरही कमी होता. आता मात्र सामूहिक संसर्ग फोफावला आहे. एखाद्या व्यक्तीला नक्की कोठून संसर्ग झाला हे शोधून काढणे जवळपास अशक्य आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी लोकांत मोठ्या प्रमाणावर (९५ टक्के) कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत किंवा त्यांच्यात अत्यंत कमी प्रमाणात (३ ते ४ टक्के) लक्षणे आढळतात. याचाच अर्थ मोठ्या प्रमाणातील संसर्ग झालेले लोक शोधले जात नाहीत आणि त्यामुळे ते विषाणूचा संसर्ग इतरांत करीत राहतात.

का वाढला कोरोना?
लोकांचा हलगर्जीपणा व समूह प्रतिकारशक्तीबद्दलची चुकीची धारणा यांमुळे कोरोना वेगाने पसरतोय. ‘कोविड १९’ संदर्भातील सावधगिरी व नियमावली पायदळी तुडवणे, कोविड काळातील आवश्यक जीवनशैली न स्वीकारणे, मास्कचा वापर बंद करणे, गर्दी करणे, खासगी व सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, महासाथीच्या तीव्रतेकडे काणाडोळा करणे यांमुळे हे घडत आहे. शिवाय आता राज्यात ‘सार्स कोव्ह २’चा नवा अवतार ‘डबल म्युटेशन’मधून अवतरला आहे. ‘आयहिलवेल’ या संस्थेच्या अभ्यासानुसार स्पष्ट झाले, की पुण्यातील रुग्णालयांत दाखल झालेल्या ४ हजार ४२१ कोरोना बाधितांना प्रवेशाच्या वेळी ऑक्सिजनची गरज पडली नाही. त्यातील केवळ ७४५ (१६.९ टक्के) रुग्णांची तब्येत नंतर खालावली व त्यांना ऑक्सिजन किंवा ‘आयसीयू’ची गरज पडली. दाखल होतानाच आयसीयूची गरज पडलेले रुग्ण २४१ (५.५ टक्के) होते व केवळ ६१ (१.४ टक्के) रुग्णांना व्हेंटिलेटर लागला.

पहिला डोस ‘गेम चेंजर’
ताजे अहवाल पाहिल्यास दिसते, की लशीच्या पहिल्या डोसची परिणामकारकता (इफिकसी) ७६ टक्के असून, त्यामुळे बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जवळपास शून्य आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २२ दिवसांनंतर मृत्यूचे प्रमाणही शून्य आहे. म्हणजेच, आपण महासाथीने सर्वाधिक बाधित जिल्ह्यांतील १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण पूर्ण केल्यास संसर्गाची तीव्रता कमी होईल आणि मृत्यूही रोखता येतील. त्यातून पुण्यातील आरोग्यसेवेवर आलेला ताणही कमी होईल. सध्या शहरातील बहुतांश रुग्णालये, क्लिनिक, नर्सिंग होम आणि इतर आरोग्य सुविधांची ८० टक्के क्षमता केवळ कोविड रुग्णांसाठी राखीव आहे. त्यामुळे इतर रुग्णांवरील उपचार मागे पडताहेत. पुण्यातील १८ वर्षांवरील सुमारे ४० लाख लोकांना पुढील ३० दिवसांत लशीचा पहिला डोस दिला गेल्यास रुग्णालयांतील खाटा मोठ्या प्रमाणात रिकाम्या होतील व पुढील ६० दिवसांत मृत्यूदर ९० टक्क्यांनी कमी होईल. हे धोरण महिनाभर राबविल्यास १ जून २०२१पर्यंत मृत्यूचे प्रमाण ९० टक्क्यांनी खाली येईल.

लशींची उत्पादनक्षमता काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर वाढविल्यानंतर आपल्याला दुसरा डोस देणे शक्य आहे. तसेही, मोठ्या कालावधीसाठीची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी दुसरा डोस १२ आठवड्यांनंतर घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ब्रिटन, स्कॉटलंडमध्ये पहिला डोस दिल्यानंतर मृत्यूदर कमी झाल्याची आकडेवारी आहे. आपण आता ज्येष्ठ नागरिक आणि संसर्गाचा धोका असलेल्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण केले आहे. आता धोका असलेल्या इतरांचे लसीकरण सुरू करणे महत्त्वाचे आहे. २७ ते २८ वयोगटातील तरुणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे दिसून येणे ही धोक्याची घंटा आहे. सध्या दिवसभरात १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना संसर्ग होत असून, केस पॉझिटिव्हिटी रेट ३० ते ३५ टक्के आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून, वेगाने प्रतिबंधक पावले उचलायला हवीत.

दररोज एक लाखांना लस
पुण्याचे लसीकरणाचे मॉडेल देशासाठी रुपेरी किनार बनली असून, त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या. गेल्या शनिवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६ हजार ९५४ जणांचे लसीकरण झाले. सध्याचे निर्बंध व मर्यादित साधनसामग्री असूनही आपण दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण करण्याच्या तयारीत आहोत. सर्व वयोगटांसाठीचे लसीकरण खुले केले आणि प्रत्येक पुणेकराला येत्या ३० दिवसांच्या विक्रमी वेळेत या सर्वांना पहिला डोस दिल्यास दैनंदिन मृत्यूदर आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नाट्यमयरीत्या कमी झालेले दिसेल. हे पर्यायी मॉडेल आणि धोरण साधे, व्यवहार्य आहे. त्याचे दुष्परिणाम नाहीत. फक्त अधिक लशी उपलब्ध करून द्याव्या लागतील. पुणे जिल्ह्यासाठी लसीकरणाचे अधिक उदारमतवादी धोरण राबवावे लागेल. देशातील या सर्वाधिक ग्रस्त जिल्ह्याची त्याद्वारे कोरोनातून सुटका करता येईल. जिल्ह्यातील मृत्यूदर वेगाने वाढतो आहे आणि तातडीने तो रोखण्यासाठी कंबर कसावी लागेल. लसीकरणासाठी लावलेल्या चाळण्या हटवाव्या लागतील आणि ते सर्वांसाठी टप्प्याटप्प्याने खुले करावे लागेल. मात्र, ठराविक वय आणि सहव्याधी असलेल्यांसाठीच लस देणे हा पर्याय काढावा लागेल.

यासाठी पुणे शहराकडे संसाधने, व्यासपीठे, पायाभूत सुविधा, क्षमता आणि मजबूत आराखडा तयार आहे. गरज आहे प्रतिबंध हटविण्याची, विश्वास ठेवण्याची व आपल्या क्षमतेनुसार लसीकरणाची. सध्याची रुग्णवाढ व मृत्यूदर पाहता आपण दिवसाला एक लाख जणांचे लसीकरण करण्यात अयशस्वी ठरल्यास दिवसाला ५० जणांचे मृत्यू होतील. महत्त्वाचे म्हणजे, आपण केवळ जीव गमावणार नसून, मोठ्या लोकसंख्येच्या भविष्याबद्दलच्या आशा, आर्थिक - मानसिक स्थैर्य व आरोग्यही गमावणार आहोत. भारताने कोरोनाची पहिली लाट रोखण्यात चांगली कामगिरी केली आहे आणि आता लेखात विशद केलेले धोरण राबवून आपण पुण्याला भारतातील पहिले ‘कोरोना मृत्यूमुक्त शहर’ बनवू शकतो. यातून देश आणि जगात मोठा सकारात्मक संदेश जाईल. त्याचबरोबर याद्वारे आपण पुन्हा एकदा जगाच्या आर्थिक विकासाचे केंद्र बनू शकतो.

(लेखक ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर ‘कोविड १९’ रिस्पॉन्स’चे प्रमुख व समन्वयक व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज आणि अॅग्रिकल्चरलचे अध्यक्ष आहेत.)

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com