कोरियन द्वीपकल्पात शांततेचे वारे

सुधीर तु. देवरे
शुक्रवार, 15 जून 2018

डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट हे हिंद- प्रशांत क्षेत्रात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पहिले पाऊल ठरू शकते. या असाधारण भेटीची फलश्रुती त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे कसे पालन होते यावरच अवलंबून आहे.

डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची भेट हे हिंद- प्रशांत क्षेत्रात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पहिले पाऊल ठरू शकते. या असाधारण भेटीची फलश्रुती त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे कसे पालन होते यावरच अवलंबून आहे.

अ मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची सिंगापूरमधील भेट ही एक ऐतिहासिक घटना होती. गेल्या सत्तर वर्षांपासून शत्रुत्व असलेल्या या दोन देशांच्या नेत्यांनी संयुक्त निवेदनावर सह्या करतानाचे दृश्‍य विश्‍वास न बसण्याजोगे होते. ट्रम्प व किम हे दोघेही त्यांच्या अनपेक्षित निर्णयांमुळे गेल्या वर्षा-दीड वर्षांत जगाला हादरवून टाकणारे ठरले आहेत. हे दोघे इतक्‍या झटपट विशेष पूर्वतयारी न करता भेटतील ही बाब आश्‍चर्यजनकच होती. कॅनडातील ‘जी-७’ परिषद अर्धवट सोडून ट्रम्प सिंगापूरला दीड दिवस आधी पोचले ते किम यांच्याबरोबर करार करण्याचे ठरवूनच आल्यासारखे. तसे पाहिले तर किम यांना भेटायचे हा त्यांचा निर्णय वैयक्तिक होता. आतापर्यंत कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाने सत्तेवर असताना उत्तर कोरियाच्या प्रमुखाशी बोलणी केलेली नव्हती.

किम यांच्या दृष्टीने तर अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबरची भेट म्हणजे अभूतपूर्व संधी होती. त्यांचे आजोबा, किम इल सुंग यांच्या काळापासून उत्तर कोरियाच्या नेत्यांची महत्त्वाकांक्षा अशी की अमेरिकेने उत्तर कोरियाला सार्वभौम देश म्हणून वागवावे व आपल्या अध्यक्षांबरोबर सार्वभौमत्वाच्या समान पातळीवर भेट व्हावी. शिवाय अनेक अण्वस्त्रांच्या व क्षेपणास्त्रांच्या चाचण्या पूर्ण झाल्याने व त्यांची क्षमता सिद्ध झाल्याने किम यांना अण्वस्त्रांच्या निःशस्त्रीकरणाबद्दल निदान चर्चा करण्यातही अडचण नव्हती.

भेटीनंतर दोन्ही देशांनी प्रसिद्ध केलेले संयुक्त निवेदन तसे त्रोटकच आहे. पण त्यात चार महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे दोन्ही देश एकमेकांशी सर्वसाधारण संबंध सुरू करतील. दुसरा मुख्य निर्णय असा की दोन्ही देशांनी संपूर्ण कोरियन द्वीपकल्पात स्थिर स्वरूपाची शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. १९५३ मध्ये कोरियन युद्धानंतर झालेल्या शस्त्रसंधीचे शांतताकरारात रूपांतर करणे ही उत्तर व दक्षिण या दोन्ही कोरियांची इच्छा आहे व या वर्षअखेरपर्यंत ते घडवून आणण्याची त्यांची तयारी आहे. तिसरा मुद्दा म्हणजे उत्तर कोरियाने निःशस्त्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे मान्य केले आहे व त्यासाठी दोन कोरियांनी २७ एप्रिलला केलेला करार ही चौकट असणार आहे. अमेरिकेने अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाबाबत CVID (complete verifiable irreversible denuclearisation) अशी अट सतत घातली असताना, ट्रम्प यांनी या विषयावर मोघम व अ-निर्णायक कलम का मान्य केले व उत्तर कोरियाबरोबर तडजोड का केली हा सध्या चर्चेचा विषय आहे. या भेटीतून खरोखर काय निष्पन्न झाले? अमेरिकेने काय मिळवले व काय सोडले? किम यांनी अमेरिकेसारख्या प्रबळ देशाकडून काय सवलती मिळविल्या? कोणाची बाजू अधिक जमेची ठरली? असे अनेक प्रश्‍न उद्‌भवतात. कोरियन द्वीपकल्पामध्ये शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका व उत्तर कोरियाने प्रयत्न करावेत, अशा जुजबी कलमांतून अनेक अर्थ निघतात. द्वीपकल्प म्हणजे दक्षिण कोरियाही त्यात आला व तेथे तर तीस हजार अमेरिकी सैनिक, आधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने तैनात आहेत. तसेच अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाबाबत निवेदनात कोठेही कालमर्यादेचा उल्लेख नाही. ‘अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाबद्दल उत्तर कोरिया प्रयत्न करील,’ असे आश्‍वासन उत्तर कोरियाने पूर्वीही दिले होते. पण अशा ढिल्या कराराचा काय उपयोग, असा प्रश्‍न जगातील अनेक नेते व राजनैतिक अभ्यासक विचारत आहेत.

या भेटीत किम यांना अमेरिकेकडून सुरक्षिततेचे आश्‍वासन द्यायचे, असा ट्रम्प यांनी मनात निश्‍चय केला असावा. अमेरिका व दक्षिण कोरिया यांचे दक्षिण कोरियातील वार्षिक लष्करी सराव यापुढे होणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी केली. हा निर्णय अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांसाठी आश्‍चर्यकारक व धक्कादायक आहे. पुढील काळात परिस्थितीनुसार अमेरिकी सैन्यही दक्षिण कोरियातून मागे घेण्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेच्या अशा सहानुभूतीपूर्ण निर्णयानंतर या भेटीत मान्य केलेल्या बाबी पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तर कोरियावर काय जबाबदारी राहणार, असा प्रश्‍न साहजिकच ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर किम यांच्यावर विश्‍वास टाकीत, सगळ्या जगासमोर दिलेली आश्‍वासने ते पूर्ण करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमेरिकेचे, त्यांच्या मित्रराष्ट्रांचे उत्तर कोरियावरचे आर्थिक निर्बंध मात्र कायम राहतील आणि उत्तर कोरिया अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाबाबत ठोस पावले टाकणार नाही, तोपर्यंत ते हटविले जाणार नाहीत. अमेरिकेच्या जोडीने चीननेही गेल्या वर्षांपासून उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यास सुरवात केल्याने कोरियाची आर्थिक स्थिती जिकिरीची झाली होती. उत्तर कोरियाचा ९० टक्के व्यापार चीनवर अवलंबून आहे. पण गेल्या दोन- तीन महिन्यांत चीनने हे निर्बंध जरा शिथिल केले होते. चीन या भेटीच्यावेळी हजर नसला, तरी कोरियातील प्रक्रियांशी चीनचा जवळचा संबंध राहणार आहे. मात्र अमेरिका व उत्तर कोरिया हे दोघे थेट संबंध प्रस्थापित करून आपल्याला वगळून तर टाकणार नाहीत, अशी शंका चीनला वाटते. अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरिया चीनच्या दृष्टीने त्यांच्या शेजारी असुरक्षितता निर्माण करीत आहे. त्यामुळे तेथे खरोखरच अण्वस्त्र निःशस्त्रीकरण झाले व आश्‍वासन दिल्याप्रमाणे दक्षिण कोरियाबरोबरील लष्करी सराव अमेरिकेने बंद केला आणि काही वर्षांनी आपले सैनिक मागे घेतले, तर हे सगळे चीनच्या पथ्यावर पडेल आणि हिंद- प्रशांत क्षेत्रात चीन अधिकच प्रबळ होईल. दक्षिण कोरियाला व त्यांचे अध्यक्ष मून जे इन यांना ट्रम्प-किम भेटीमुळे सर्वांत अधिक आनंद झाला असेल, यात शंका नाही. त्यांच्या ‘sun-shine policy’ चा हा विजय आहे. सत्तेवर आल्यापासून गेल्या ५-६ महिन्यांत त्यांनी उत्तर कोरियाबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी केलेले अथक परिश्रम, किम यांच्याबरोबर सरहद्दीवर झालेली भेट आणि उत्तर कोरियाबद्दलच्या मून जे इन यांच्या धोरणाला दक्षिण कोरियात ७० टक्‍क्‍यांहून अधिक लोकांचा पाठिंबा या ठळक बाबी आहेत. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांचे एकत्रीकरण हे दक्षिण कोरियाचे स्वप्न आज न उद्या साकार होईल हा त्यांचा विश्‍वास आता आणखीन वाढेल. जपान हा कोरियाचा शेजारी देशही उत्तर कोरियाची अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रांमुळे चिंताग्रस्त आहे. दोन्ही देशांत अजूनही राजनैतिक संबंध नाहीत. सतरा जपानी नागरिकांना १९७०-८० च्या काळात उत्तर कोरियाने पळवून नेल्याचा विषय दोन देशांत कटुतेचा ठरला आहे. जपानच्या दृष्टीने हा मानवी हितसंबंधाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ट्रम्प-किम भेटीमुळे जपानलाही दिलासा वाटणार आहे.

ट्रम्प-किम यांच्या असाधारण भेटीची फलश्रुती त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे कसे पालन होते यावर अवलंबून राहील. ट्रम्प यांनी आपल्या ‘सहानुभूतीपर आक्रमते’च्या बळावर आपण किम यांच्यासारख्या अपरिचित व हुकूमशाही व्यक्तीबरोबरही ‘डील’ करू शकतो, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेकडे आजही हिंद- प्रशांत क्षेत्रात आपण प्रभावी शक्ती आहोत, हे सिद्ध करण्याचे नेतृत्व आहे, असे ट्रम्प यांच्या या भेटीत दिसून येते. या क्षेत्रात शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पहिले पाऊल ठरू शकते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudir deore write donald trump and kim jong un article in editorial