चैतन्याचं दान

सुनीता तारापुरे
बुधवार, 16 जानेवारी 2019

माझ्या घराजवळ तुळजाभवानीचं छोटंसं मंदिर आहे. टुमदार, स्वच्छ, सुंदर! मंदिराभोवती निगुतीनं राखलेली इवलीशी बाग, त्यात खूप सारी चाफ्याची झाडं, नित्य फुललेली, पांढऱ्या पाकळ्यांची, गाभ्याशी पिवळा रंग ल्यायलेली सुबक फुलं. हिरव्या गर्द पानांमधून लाजत डोकावणाऱ्या अर्धोन्मिलित फुलांच्या अस्तित्त्वाची चाहू लागते, ती त्यांच्या मंद सुवासानं. पायतळी मात्र पूर्ण उमललेल्या फुलांचा सडा. स्वागताकरिता जणू पायघड्याच अंथरल्यायत. चाफ्याखालीच बसण्याकरिता सोयीस्कर आसनं, कितीही घाई असो, इथं पावलं थबकतातच. क्षणभर बसावं, चाफ्याशी हितगुज करावं. माझ्या मनातली दुखरी कळ त्याला आपोआप कळत असते.

माझ्या घराजवळ तुळजाभवानीचं छोटंसं मंदिर आहे. टुमदार, स्वच्छ, सुंदर! मंदिराभोवती निगुतीनं राखलेली इवलीशी बाग, त्यात खूप सारी चाफ्याची झाडं, नित्य फुललेली, पांढऱ्या पाकळ्यांची, गाभ्याशी पिवळा रंग ल्यायलेली सुबक फुलं. हिरव्या गर्द पानांमधून लाजत डोकावणाऱ्या अर्धोन्मिलित फुलांच्या अस्तित्त्वाची चाहू लागते, ती त्यांच्या मंद सुवासानं. पायतळी मात्र पूर्ण उमललेल्या फुलांचा सडा. स्वागताकरिता जणू पायघड्याच अंथरल्यायत. चाफ्याखालीच बसण्याकरिता सोयीस्कर आसनं, कितीही घाई असो, इथं पावलं थबकतातच. क्षणभर बसावं, चाफ्याशी हितगुज करावं. माझ्या मनातली दुखरी कळ त्याला आपोआप कळत असते. मग त्याच्या हिरव्यागार पानांमधलं सळसळतं चैतन्य नि फुलांमधली सारं जग सुगंधित करण्याची ईर्षा यांचं दान तो मला देतो, हा ‘शब्देविण संवादु नित्याचा.’ आज त्यांच्याकडं पाहताना ‘वॉल्ट व्हिटमॅन’ यांच्या कवितेच्या ओळी आठवतात - ‘‘When I give, I give myself!’ वाटतं, हा चाफा या ओळी जगतोय. त्याच्याकडे जे आहे ते नुसतं देतो असं नव्हे, तर सर्वस्वानं देतोय!

अनायास साने गुरुजी, स्वामी विवेकानंद, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, मदर तेरेसा... समाजाच्या उन्नतीकरिता सर्वस्वाचं दान दिलेल्या नेकांची याद मनात ताजी होते. त्यांचं समर्पण आठवतं. त्या समर्पणातलं चैतन्य जाणवतं. असं म्हणतात, की अक्रोडाचं झाड एका पिढीनं लावलं तर त्याची फळं तिसऱ्या-चौथ्या पिढीला खायला मिळतात. या महान विभूतींनी लावलेल्या वृक्षांच्या डेरेदार छायेत आपण वावरत आहोत, त्याची फळं चाखतो आहोत, पण आपण लावत आहोत का अक्रोडाचं झाड नंतरच्या पिढ्यांकरिता? दरेक पिढीनं झाड लावलं तरच ना प्रत्येक पिढीला फळं चाखायला मिळतील. आजवर आपण घेतलं, भरभरून घेतलं, पण देण्यातला आनंद कधी मिळवणार? पण मी... मी काय देणार?
छे! हा चाफा कुठे असा विचार करतोय की मी काय देणार? त्याच्याजवळ जे आहे, ते देतोय... नव्हे मुक्त हस्ते उधळतोय. माळरानावर, काट्याकुट्यात, निर्जन वनात उगवणारी रानफुलं, गवतफुलं त्यांच्या अस्तित्वाची कुणी दखल घेत आहे की नाही, याची पर्वा न करता उगवतात, परिमळतात. आपल्या अस्तित्वानं परिसराच्या सौंदर्यात भर घालतात आणि निर्माल्य होऊन जातात. त्यांचं जीवितकार्य सफल होतं. विचारांच्या तंद्रीत असतानाच एक चाफ्याचं फूल झाडावरून उतरून हळूच माझ्या ओंजळीत येतं. ओंजळ सुगंधित होते. जीवितकार्य संपवतानाही त्या फुलानं मला चैतन्याचं दान दिलेलं असतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial