नाउ कलियोना?

सुनीता तारापुरे
बुधवार, 13 मार्च 2019

परवा एक मैत्रीण म्हणाली, ‘मी उर्दू लिहा-वाचायला शिकतेय.’ कौतुक वाटलं. उत्सुकताही. विचारलं, ‘का गं, उर्दू का शिकावीशी वाटली?’ तर म्हणाली, ‘मला उर्दू शेरो-शायरी किती आवडते तुला ठाऊक आहेच. देवनागरी लिपीतली शायरी वाचताना ती ‘मजा’ येत नाही. उसका लुत्फ तो समंदर में गोते लगाने से ही मिलेगा ना!’ वाह! बहुत खूब! लगे रहो! शुभेच्छा देऊन मी तिचा निरोप घेतला. ही मैत्रीण खरं तर कामात गळ्यापर्यंत बुडालेली, स्वतःच्या करिअरविषयी अत्यंत महत्त्वाकांक्षी. मात्र त्यापोटी आपल्या आवडीला नख लावण्याचा वेडेपणा ती करत नाहीये, हे पाहून बरं वाटलं.

परवा एक मैत्रीण म्हणाली, ‘मी उर्दू लिहा-वाचायला शिकतेय.’ कौतुक वाटलं. उत्सुकताही. विचारलं, ‘का गं, उर्दू का शिकावीशी वाटली?’ तर म्हणाली, ‘मला उर्दू शेरो-शायरी किती आवडते तुला ठाऊक आहेच. देवनागरी लिपीतली शायरी वाचताना ती ‘मजा’ येत नाही. उसका लुत्फ तो समंदर में गोते लगाने से ही मिलेगा ना!’ वाह! बहुत खूब! लगे रहो! शुभेच्छा देऊन मी तिचा निरोप घेतला. ही मैत्रीण खरं तर कामात गळ्यापर्यंत बुडालेली, स्वतःच्या करिअरविषयी अत्यंत महत्त्वाकांक्षी. मात्र त्यापोटी आपल्या आवडीला नख लावण्याचा वेडेपणा ती करत नाहीये, हे पाहून बरं वाटलं. साहित्यकृती आस्वादण्याकरता ती भाषा, बोलणारा समाज, त्यांचा परिसर, आचार-विचार-संस्कार, चालीरीती, परस्परसंबंध, सण-उत्सव हे जाणून घेतलं तर त्यांच्याबरोबरीनं आपला प्रवास होतो. साहित्यकृतीची उत्तुंगता आशयात तर असतेच; पण तिची शब्दकळा, भाषासौंदर्य, रसाळपण, सुभगता हे उमजण्याकरता मूळ साहित्य-सागरातच खोलवर डुबकी मारायला हवी, तरच ही रत्नं हाती गवसतील.
रवींद्रनाथ टागोरांना दैवत मानणाऱ्या पुलंनी, वयाची पन्नाशी उलटल्यावर, बंगाली भाषेशी सलगी करण्याकरिता थेट शांतिनिकेतनात मुक्काम ठोकला होता, हे आपल्याला ठाऊक आहेच. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना सात-आठ भाषा केवळ अवगत नव्हत्या, तर त्या भाषांमधून ग्रंथलेखन करण्याइतकं प्रभुत्व त्यांनी प्राप्त केलं होतं. मागे वाचलं होतं, की पुण्याच्या माधुरी दातार यांना एकोणतीस भाषा बोलता येतात. नवी भाषा शिकणं त्यांना हातचा मळ वाटतो. या पार्श्‍वभूमीवर स्वतःला निरखलं वाटलं, आपली मातृभाषा मराठीही आपण निर्भेळ बोलत नाही. त्यात इंग्रजी शब्द सहज घुसडतो. किमानपक्षी आपली मातृभाषा मराठी, तिच्या बोलीभाषा, राष्ट्रभाषा हिंदी आणि ज्ञानभाषा इंग्रजी यांच्यावर तरी प्रभुत्व मिळवू शकतो. त्यांचा समग्र अभ्यास करू शकतो. परीक्षा देण्याकरता नव्हे, तर साहित्य आस्वादण्याकरता. निरनिराळ्या भाषेतल्या शब्दप्रभूंनी लिहून ठेवलेलं अमूल्य शब्दधन लुटायचं तर त्या त्या भाषा आत्मसात करणं हाच एकमेव पर्याय आहे.

शिवाय, भाषा माणसा-माणसांतला दुरावा कसा सहज मिटवून टाकते, हे प्रवासात आपणही कित्येकदा अनुभवलं असेल. ‘रांव रे! वच रे! किते? बरे असा मरे?’ अशा मोजक्‍याच शब्दांच्या अचूक देवाणघेवाणीतून गोवेकर खूष होतात आणि मदतीला धावून येतात, हा माझा अनुभव. ‘नमस्कारम्‌! रा, वेल्लु, कूचो’ योग्य अर्थाने वापरून पाहा, तेलुगू भाषकांच्या कपाळावरच्या आठ्या मिटतीलच. नाऊ कलियोना? तर मग, आपण शिकूया ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial