आला उन्हाळा!

सुनीता तारापुरे
बुधवार, 27 मार्च 2019

‘‘हे  चिनी लोक येडचाप आहेत का गं? एक सूर्य पुरेसा नव्हता जाळायला म्हणून की काय आणखी एक सूर्य आणताहेत, म्हणजे झालाच आपला कोळसा...’’ हुश्‍श म्हणून खुर्चीत कोसळलेली सखी घाम पुसत करवादली. प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत न पडता मी सरबताचा ग्लास तिच्या पुढ्यात ठेवला. ‘होळी जळाली, थंडी पळाली!’ ही उक्ती सार्थ करत थंडीनं गाशा गुंडाळलाय आणि तापमानानं चाळिशीत पदार्पण कोलंय.

‘‘हे  चिनी लोक येडचाप आहेत का गं? एक सूर्य पुरेसा नव्हता जाळायला म्हणून की काय आणखी एक सूर्य आणताहेत, म्हणजे झालाच आपला कोळसा...’’ हुश्‍श म्हणून खुर्चीत कोसळलेली सखी घाम पुसत करवादली. प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत न पडता मी सरबताचा ग्लास तिच्या पुढ्यात ठेवला. ‘होळी जळाली, थंडी पळाली!’ ही उक्ती सार्थ करत थंडीनं गाशा गुंडाळलाय आणि तापमानानं चाळिशीत पदार्पण कोलंय. अशावेळी भर दुपारच्या उन्हातून आलेल्या सखीपुढं चीनमधल्या हफई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेसमध्ये चाललेल्या मानवनिर्मित सूर्याच्या प्रयोगाचं मी कौतुक केलं असतं, तर सरबताचा ग्लास कदाचित माझ्या डोक्‍यावर उपडा झाला असता; पण मनोमन खंतावलेच. पाहा ना, हिवाळा, पावसाळा या ऋतूंची किती आतुरतेनं आपण वाट पाहतो. हे ऋतू स्वभावधर्माला जागतील याची शाश्‍वती नसतानाही त्यांचं स्वागत जल्लोषात करतो. उन्हाळ्याच्या आगमनानं मात्र आपल्या, विशेषतः शहरवासीयांच्या, कपाळावर आठ्या चढतात.

इतर कोणाला कौतुक वाटो ना वाटो, मला मात्र उन्हाळा खरंच आवडतो. हातचं काहीही राखून न ठेवता जवळचं सारं ओंजळी भरभरून उधळणारा हा ऋतू. सर्वांगानं फुलणारा आणि फुलवणारा. म्हणून तर सृष्टीही नटूनथटून या ऋतूच्या स्वागताला सज्ज झालीय. पळस, पांगारा लाल रंगात न्हाऊन निघालेयंत, तर जॅकरांडाचा नीलमोहर रस्त्यावरही सडा टाकतोय. कायम दाट हिरव्या रंगाच्या दिसणाऱ्या वड-पिंपळाचं रूपही लाल-गुलाबी नवपालवीनं केवढं गोजिरं दिसतंय. गुलमोहोर आणि बहावाच्या लाल-पिवळ्या रंगपंचमीला अद्याप सुरवात व्हायचीय; पण निष्पर्ण बाभळीवर पिवळे गेंद फुटताहेत आणि चाफा तर वेड्यासारखा बहरतोय. भर उन्हातून चालत आल्यावर क्षणभर कडुनिंबाच्या गार सावलीत थांबावं आणि गारव्याबरोबर मोहोरानं सुगंधित होऊन जावं. रानातल्या करवंदीच्या जाळीवर आणि बांधावरल्या हिरव्या गर्द जांभळीवर पांढऱ्या फुलांनी नक्षीकाम सुरू केलंय. आंब्याच्या पायतळी गळलेल्या मोहोराचा खच असला, तरी नीट पाहा, प्रत्येक पानाआड कैऱ्या दडल्यायंत. पाहता पाहता काजू-फणसाच्या मोहोरानं परिसर गंधित होईल; तर मोगरा, अनंत, जुई, सायली, रातराणीच्या दरवळानं रात्रीचा किंचित गारवाही धुंदफुंद माठातलं पाणी, कलिंगडाची फाक, कैरीचं पन्हं, कोकमाचं सरबत... यांची गोडी उन्हाच्या तलखीबरोबर वाढत जाईल. कोणीतरी बागेला पाणी देतंय... व्वा, हा मृदगंध! आली... कोकिळेची पंचम तान कानी आली... तिच्या सादेला प्रतिसाद देऊया ना... आला उन्हाळा! आला उन्हाळा!! धमाल! चिन्यांनी सूर्याचं पिल्लू जन्माला घातलंय, तर ही मजा वर्षभर लुटता येईल ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial