हे जग मी सुंदर करून जाईन!

सुनीता तारापुरे
बुधवार, 24 एप्रिल 2019

नव्या पैठणीत मैत्रीण छान सजली होती. ‘‘सुरेख दिसतेयंस!’’ या माझ्या अभिप्रायावर उसळून म्हणाली, ‘‘होच मुळी! पण, कुणाला कदर आहे का त्याची? ‘एफबी-इन्स्टा’वर फोटो टाकायचे म्हणून सकाळपासून केवढा खटाटोप केला. तास घालवला पार्लरमध्ये. पण, जेमतेम पन्नासेक लाइक्‍स आणि चार कमेंट्‌स...’’ फोटोशॉपनं देखणे केलेले फोटो दाखवत ती चिडचिडली, ‘‘रुप्सनं फोटो टाकायचा अवकाश लाइक्‍स नि कमेंट्‌सचा पाऊस पडतो. काय कमी आहे गं माझ्यात?’’ तोच धागा पकडत मी म्हटलं, ‘‘कमतरता आहे तुझ्या लोभस हास्याची. पाउट्‌च्या नादात तुझा ‘यूएसपी’ गमावून बसलीस.

नव्या पैठणीत मैत्रीण छान सजली होती. ‘‘सुरेख दिसतेयंस!’’ या माझ्या अभिप्रायावर उसळून म्हणाली, ‘‘होच मुळी! पण, कुणाला कदर आहे का त्याची? ‘एफबी-इन्स्टा’वर फोटो टाकायचे म्हणून सकाळपासून केवढा खटाटोप केला. तास घालवला पार्लरमध्ये. पण, जेमतेम पन्नासेक लाइक्‍स आणि चार कमेंट्‌स...’’ फोटोशॉपनं देखणे केलेले फोटो दाखवत ती चिडचिडली, ‘‘रुप्सनं फोटो टाकायचा अवकाश लाइक्‍स नि कमेंट्‌सचा पाऊस पडतो. काय कमी आहे गं माझ्यात?’’ तोच धागा पकडत मी म्हटलं, ‘‘कमतरता आहे तुझ्या लोभस हास्याची. पाउट्‌च्या नादात तुझा ‘यूएसपी’ गमावून बसलीस. आता छान हास बघू!’’ सुंदर हसू चेहऱ्यावर खेळवत ती समारंभात मिसळून गेली; माझ्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठवून. आपण सुंदर असावं, सुंदर दिसावं, असं वाटणं नैसर्गिक. पण, आपल्याला आतून चांगलं वाटावं म्हणून सजणं निराळं आणि समस्त जगानं माझ्या सौंदर्यावर शिक्कामोर्तब करावं म्हणून नटणं वेगळं. खरं तर, जे बाह्यरूप मला जन्मजात लाभलंय, ज्यात माझं स्वतःचं काडीमात्र कर्तृत्व नाही, त्याबद्दल गर्व करणं किंवा खंतावणं योग्य आहे? सौंदर्याचे मापदंड देश-काल-व्यक्तीपरत्वे बदलत असतात. अशावेळी त्या उंचावलेल्या अंगठ्यांची किती तमा बाळगावी? माझं अस्तित्व सोशल मीडियाकरिता नाही, तर त्याचं माझ्याकरिता आहे, हे आपण समजून घेणार की नाही? आणि आंतरिक सौंदर्याचं काय? माझं असणं-दिसणं मला स्वतःला आवडतंय काय? जडणघडण, संस्कार, औपचारिक-अनौपचारिक शिक्षण यातून माझं असं एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व घडलंय, जे अधिकाधिक संपन्न होण्यासाठी मी सतत प्रयत्नरत आहे, त्याचं मूल्यमापन अशा रीतीनं होणार? वास्तविक, निसर्गाची कोणतीही कलाकृती कुरूप असत नाही. माणूसही. माणसाखेरीज इतर सर्व जीव, आहोत त्यापेक्षा वेगळं दिसण्यासाठी, बाह्य गोष्टींची मदत घेऊन सजत नाहीत. गुलाबाचा दिमाख पाहून चाफ्याला गुलाब होण्याची स्वप्नं पडत नाहीत. हंसाचं डौलात विहरणं पाहून बदकाला न्यूनगंड येत नाही. अर्थात, ही विशेषणंही आपणच चिकटवलेली. त्यांना त्याची जाणीवही नाही. सगळे सजीव आपापल्या जन्मजात वैशिष्ट्यांसह जीवित्कार्यात मग्न आहेत. आनंदानं. ‘सारं जग झोपी गेलंय, माझं उमलणं कोण पाहणार?’ म्हणून ब्रह्मकमळ मध्यरात्री उमलणं थांबवत नाही. कुणी पाहो न पाहो, इवलंसं गवतफूल वाऱ्यावर डुलत, त्या माळरानाला सौंदर्य बहाल करतं. ‘हे जग मी अधिक सुंदर करून जाईन!’ ही जिद्द, हा वसा आपणही त्यांच्याकडून घेऊया ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial