दिव्यत्वाची जेथ प्रचिती

सुनीता तारापुरे
बुधवार, 15 मे 2019

ऐन पावसाळ्यात खांडस गावापासून भीमाशंकरच्या चढाईला सुरवात केली होती. त्या अवघड रानवाटा, ते बेलाग सुळके, ती गर्द वनराई यांची आपल्याला एवढी भूल का पडते, ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ म्हणत वारकऱ्याप्रमाणं डोंगरांच्या भेटीला आपण पुनःपुन्हा का येतो, याचं मनोमन आश्‍चर्य करत चालत होते. एका कड्याशी क्षणभर थांबले, तेव्हा नजर खाली दूरवर दिसणाऱ्या गावाकडं गेली. तिथली घरं, पाऊलवाटा, शेताचे हिरवेगार तुकडे चित्रासम भासत होते. मध्यभागी निवांत पहुडलेला तलाव. त्या इवल्याशा तळ्यानं माथ्यावरच्या अमर्याद आकाशाला आपल्यात सामावून घेतलं होतं. इतक्‍या दुरूनही त्या जलाशयाकडं पाहून खूप शांत वाटलं.

ऐन पावसाळ्यात खांडस गावापासून भीमाशंकरच्या चढाईला सुरवात केली होती. त्या अवघड रानवाटा, ते बेलाग सुळके, ती गर्द वनराई यांची आपल्याला एवढी भूल का पडते, ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ म्हणत वारकऱ्याप्रमाणं डोंगरांच्या भेटीला आपण पुनःपुन्हा का येतो, याचं मनोमन आश्‍चर्य करत चालत होते. एका कड्याशी क्षणभर थांबले, तेव्हा नजर खाली दूरवर दिसणाऱ्या गावाकडं गेली. तिथली घरं, पाऊलवाटा, शेताचे हिरवेगार तुकडे चित्रासम भासत होते. मध्यभागी निवांत पहुडलेला तलाव. त्या इवल्याशा तळ्यानं माथ्यावरच्या अमर्याद आकाशाला आपल्यात सामावून घेतलं होतं. इतक्‍या दुरूनही त्या जलाशयाकडं पाहून खूप शांत वाटलं. असंच काहीसं सूरजतालकडं पाहतानाही झालं. लेह-लडाखच्या प्रवासात बारालाचा खिंड ओलांडून ट्रान्सहिमालयात प्रवेशल्यावर सूरजतालच्या दर्शनानं अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. अंगावर गवताचं पातंही उगवू न देणाऱ्या मातकट रंगाच्या विशालकाय पर्वतरांगा, दिवसा तीस अंश सेल्सियसच्या पुढे असणारं नि सूर्य मावळताच शून्यापर्यंत खाली घसरणारं तापमान, अत्यंत दुर्गम, निर्जन, अक्राळविक्राळ परिसर तो. पण छातीत धडकी भरवणाऱ्या त्या रखरखीत परिसराला मृदुता बहाल केली होती नीलमणीसम चमचमणाऱ्या एवढ्याशा सूरजतालनं. पाहताना श्वास रोखला गेला. वाटलं आपल्या श्वासानंही त्या शांत, स्तब्ध जलाशयावर तरंग उमटतील आणि कदाचित त्या नितळ निळ्या पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहून खुळावणाऱ्या आभाळावरही चुन्या उमटतील. नकोच ते. त्यापेक्षा गगनाच्या निळाईला अंतरंगात साठवून या सरोवराला असाच पहुडेदे. अचल. तीच निश्‍चलता माझ्यातही भरून उरो!

डलहौसी परिसरात पदभ्रमणादरम्यान असाच एक विस्तीर्ण पोखर पाहिला होता. गर्द हिरव्या वनाच्या मधोमध विसावलेला. सभोवतालची हिरवाई आपल्यात सामावून घेऊन पाचूसम दिसणारा. आम्ही सारेच अनिमिष नेत्रांनी त्याकडे केवळ पाहत राहिलो. निःशब्द. बऱ्याच वेळानं कुणीतरी पुटपुटलं, ‘त्यात अलगद विरून जावंसं वाटतं नाही!’ कोणीच उत्तरलं नाही. आमच्या मनातलेच शब्द होते ते. लहान-मोठ्या जलाशयांकडं पाहताना थोड्याफार फरकानं हाच अनुभव येतो. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये दडलेले शांत, स्तब्ध नि स्वच्छ ताल पाहताना खासच. नजर खिळून राहते. हळूहळू भारलेपण येतं. त्या एकतानतेनं भवतालाशी असलेले बंध तुटत जातात. मनातली सारी खळबळ त्या पाण्यात जणू विसर्जित होते. अस्तित्वाचं भान हरपतं. ‘मी’पण नुरतं. अंतर्बाह्य शांत वाटायला लागतं. त्या अनुपमेय सौंदर्याची अनुभूती घेता घेता दिव्यत्वाचा साक्षात्कार घडतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial