पहाटपावलं (कंट्रोल + आल्ट + डिलीट)

सुनीता तारापुरे 
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

ऑफिसमधली नेहमीची लगबग. सकाळपासून निमूट दिमतीला असलेल्या स्टुडिओतल्या संगणकानं मोक्‍याच्या क्षणी काम करण्याचं नाकारलं. हॅंगून गेला बिचारा! चडफडत "कंट्रोल + आल्ट + डिलीट बटनं दाबली. रिस्टार्ट!
 

ऑफिसमधली नेहमीची लगबग. सकाळपासून निमूट दिमतीला असलेल्या स्टुडिओतल्या संगणकानं मोक्‍याच्या क्षणी काम करण्याचं नाकारलं. हॅंगून गेला बिचारा! चडफडत "कंट्रोल + आल्ट + डिलीट बटनं दाबली. रिस्टार्ट!

काही क्षणांच्या विश्रांतीनंतर संगणक पन्हा तैनातीत. संगणकानं थोडंसं का, कू करायला सुरवात केली, त्याची तब्येत बिघडतेयसं वाटलं, हॅंग होतोयसं वाटलं, की वापरा हा परवलीचा मंत्र "कंट्रोल + आल्ट + डिलीट!' रिस्टार्ट करा आणि वेळ निभावून न्या, हे नेहमीचंच झालंय, खरं तर पूर्वी ज्या कामांना अख्खा दिवस लागायचा ती कामं आता काही मिनिटांत होताहेत. काही काही तर चुटकीसरशी. पण हाव वाढत चाललीय. एवढ्या वेळात आणखी दोन कामं हातावेगळी करावीशी वाटतात. अंगभूत वेगापेक्षा, क्षमतेपेक्षा अधिक वेगानं अधिक क्षमतेनं काम करायला सांगितलं, की संगणकातली सिस्टिम हॅंग होते, हे आता अनुभवांती कळलंय, पण वळत नाहीये, स्वतःही धावायचं आणि त्याच्याकडूनही तीच अपेक्षा ठेवायची. व्यसनच जडलंय. 

ही वेगाची नशाच घात करतेय का आपला? निसर्गाशी अनुरूप जीवनशैली होती, निसर्गाचा एक घटक म्हणून वावरत होतो तेव्हा आपल्या कामाला एक नैसर्गिक लय होती. स्वतःची एक निसर्गदत्त गती होती, पण आपल्याला हे निसर्गाचं घड्याळ संथ वाटायला लागलं. पृथ्वी आजही तिच्याच गतीनं सूर्याभोवती फिरतेय. चंद्रानंही पृथ्वीप्रदक्षिणेचा आपला वेग तोच ठेवलाय. भोवतालातला प्रत्येक घटक निसर्गाशी अनुरूप लय, ताल राखून आहे. त्यांची कुणाशी स्पर्धा नाही, म्हणून मागं पडण्याचा किंवा अव्वल स्थान टिकवून ठेवण्याचा ताणॅं नाही.

माणसाला मात्र घाई, प्रचंड घाई झालीय याच्यापुढं धावण्याची. वेगानं अधिक वेगानं. यंत्र निर्माण करून वेळेशी स्पर्धा सुरू केली. आपणच निर्मिलेल्या घड्याळातल्या काट्याच्या तालावर नाचताना शरीराच्या घड्याळाकडं मात्र आपण डोळेझाक केली. कामाच्या धबडग्यात लंचला वेळ मिळत नाही म्हणून न्याहरीच्या वेळेत "ब्रंच' आला. तेवढाही वेळ मिळेनासा झाल्यावर येण्याजाण्याच्या प्रवासातच "एनर्जी बार' आणि पूरक म्हणून व्हिटॅमिन्सचा घाऊक रतीब सुरू झाला. तहान, भूक, काम, विश्रांती, झोप... प्रत्येक बाबतीत ढवळाढवळ. साध्या, सोप्या जीवनशैलीचं रूपांतर कृत्रिम लाईफस्टाईलमध्ये परावर्तीत करून टाकलं. परिणामी निरनिराळ्या व्याधी, वैद्यकीय तपासण्या, उपचार... या दुष्टचक्रात अडकल्यावर मात्र आठवण झाली, ती निसर्गाचीच. अनेक व्याधींवर उपचार म्हणून निसर्गाच्या सहवासात राहण्याचा सल्ला मिळतोय. त्यापेक्षा थांबूया का थोडं आत्ताच. "कंट्रोल + आल्ट + डिलीट' करून रिस्टार्ट करूया का आपलाही शरीररूपी संगणक? काही सवयींवर कंट्रोल ठेवूया, काहींना अल्टर करूया, तर काहींना डिलीटच करूया. कसं?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunita tarapure Writes Article pahatpawla in Sakal