नाममुद्रा : जिद्दीचे दुसरे नाव

supriya naik
supriya naik

‘ती’ मैदानात उतरली आणि उपस्थितांच्या नजरा तिच्या पायावर खिळल्या. तिच्या पायात बूट नव्हते आणि ती हातोडा फेकणार होती. तिने हातोडा पेलला, गरगर फिरवत ताकदीने फेकला. तो ३५.०५ मीटरवर पडला आणि तिचे ब्राँझपदक निश्‍चित झाले. परवा बालेवाडीत वीस वर्षांखालील राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत सुप्रिया नाईकच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण. तिला ब्राँझपदक मिळाले, तरी ते तिच्यासाठी लाखमोलाचे होते. एकोणीस वर्षांची सुप्रिया कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडीची. वडील टेम्पोचालक. परिस्थिती बेताची. सुप्रियाला लहानपणापासून मैदानी खेळांची आवड. आठवीपासून ती हातोडाफेक स्पर्धेत सहभागी होऊ लागली. तिच्यातील गुणवत्ता पाहून शिक्षक अनिल कुमे यांनी तिला मार्गदर्शन केले. रोज सकाळी क्षमता वाढविणारा व्यायाम करायचा, सायकलवरून कवठेगुलंदला आठ किलोमीटरवरील शाळेला जायचे, सायंकाळी दमेपर्यंत हातोडाफेकीचा सराव करायचा, ही तिची दिनचर्या. ‘मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवायचंय’ असं सांगणाऱ्या सुप्रियाने ‘खेलो इंडिया’सह तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. साधन-सुविधांची वानवा असतानाही गुणवत्तेवर ती स्पर्धा गाजवत राहिली. 

पण बालेवाडीतील राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत तिला सहभागी होता येईल की नाही, अशी परिस्थिती अचानक निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने तिच्या गावाला वेढा घातला. अचानक पाणी वाढल्याने घरातील साहित्य तिच्या कुटुंबीयांना वाचविता आले नाही. त्यात स्पर्धेत वापरावयाचे तिचे बूटही वाहून गेले आणि स्पर्धेत उतरण्याच्या तिच्या सगळ्या वाटा जवळ जवळ बंद झाल्या. मात्र वडील आणि प्रशिक्षकांनी धीर देऊन स्पर्धेत उतरण्यासाठी तिला तयार केले. पुराच्या संकटाशी सामना केलेली सुप्रिया स्पर्धेसाठी पुण्यात पोचली आणि तिने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सर्व परिस्थिती सांगितली. पुरामुळे ओढवलेला प्रसंग आणि तिच्या जिद्दीची दखल घेत असोसिएशनने विशेष बाब म्हणून सुप्रियाला बूट नसतानाही स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली. तिने त्या संधीचे सोने करताना सहाव्या प्रयत्नांत ब्राँझपदकाला गवसणी घातली. तिला ब्राँझपदक मिळाले असले, तरी ज्या परिस्थितीत स्पर्धेत उतरून तिने हे पदक मिळविले, ते पाहता तिच्या यशाचे मोल कितीतरी मोठे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com