शिवसेनेपुढे शरणागती ! (मर्म)

शिवसेनेपुढे शरणागती ! (मर्म)

शिवसेनेने "जय श्रीराम!' ही घोषणा भले कोणताही हेतू मनात ठेवून दिलेली असो; त्याचा तातडीने लाभ कोकणातील नाणार प्रकल्पविरोधकांना झाला आहे! कोकणात नाणार परिसरात होऊ घातलेल्या रासायनिक प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणास अखेर स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना विधिमंडळात करावी लागली, हे शिवसेनेच्या भूमिकेला मिळालेले यश आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आपली साथ सोडू नये, या एकमात्र हेतूपोटी देवेंद्र फडणवीस यांना हा निर्णय घेणे भाग पडले.

अन्यथा, अवघ्या काही महिन्यांपूर्वी नाणार येथे या प्रकल्पग्रस्तांच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली, तेव्हा फडणवीस यांनी त्या घोषणेची खिल्ली उडवत, अधिसूचना रद्द कशी होते याबाबतच्या प्रक्रियेवर लंबेचौडे भाष्य केले होते. शिवाय, या प्रकल्पामुळे कोकणात रोजगारनिर्मिती कशी होणार आहे, असे सांगत त्या प्रकल्पाचे समर्थन केले होते. या प्रकल्पासाठी ताब्यात घ्याव्या लागणाऱ्या जमिनीवरील आंबे, काजूच्या बागा मोठ्या प्रमाणावर उद्‌ध्वस्त होणार असल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरातील जनतेचा त्याला तीव्र विरोध होता आणि तो व्यक्‍त करण्यासाठी कोकणवासीयांनी आझाद मैदानात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच धरणे धरले होते. त्यांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 
अर्थात, शिवसेनेला राजी करण्यासाठी आता भाजप कोणतेही पाऊल उचलायला तयार असल्याचे भाजपच्या आणखी काही निर्णयांमुळे दिसू लागले आहे. या जमिनी ताब्यात घेण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, नेमक्‍या त्याच मुहूर्तावर ही बाब स्पष्ट झाली. विधानसभेतील उपाध्यक्षपद आणि विधान परिषदेतील उपसभापतिपद ही दोन पदे गेली काही वर्षे रिक्‍त आहेत.

आता ही दोन्ही पदे या विधानसभेच्या उर्वरित आठ-दहा महिन्यांसाठी का होईना, शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे! त्यापलीकडली बाब म्हणजे नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनास स्थगिती देण्याचा निर्णय आपण उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. त्यामुळे निर्णय कोणीही घेतला, तरी श्रेयाचे धनी मात्र उद्धव हेच झाले आहेत! भाजपचे हे निर्णय बघता प्रदीर्घकाळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तारही अधिवेशन संपल्यावर झाला आणि शिवसेनेच्या पदरात काही महत्त्वाची खाती पडली, तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com