भाष्य : स्वदेशी तंत्र हाच विकासाचा मंत्र

कोरोनावरील लशीपासून चांद्रयान मोहिमेपर्यंत वेगवेगळ्या निमित्तांनी आपण स्वदेशीचे आविष्कार अनुभवत आलो आहोत.
Brahmos
Brahmossakal

- डॉ. रवींद्र उटगीकर

कोरोनावरील लशीपासून चांद्रयान मोहिमेपर्यंत वेगवेगळ्या निमित्तांनी आपण स्वदेशीचे आविष्कार अनुभवत आलो आहोत. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात त्यांना मिळू लागलेली चालना आपल्या सर्वांचे विकसित भारताचे नागरिक होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकेल.

यंत्रगतीचे विसावे शतक असो की तंत्रप्रगतीचे एकविसावे शतक, विज्ञान-तंत्रज्ञानाचा पाया ज्या देशांनी भक्कम केला, त्यांनी विकासाची फळे लवकर चाखली. अर्थात, प्रत्येक देशाच्या या वाटचालीवर प्रभाव टाकणारे घटकही वेगवेगळे राहिले. भारताच्या विकासक्षितिजावर विज्ञान-तंत्रज्ञानाची पहाट उगवण्यास खऱ्या अर्थाने स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवात झाली.

आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी टप्पा ओलांडून पुढे जाताना भारत चंद्रावर पोचणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत पोचला आहे. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार आणि शासनव्यवस्थेतील त्यांचा सहभाग सुकर करणारे डिजिटल जाळे विणले आहे. कोरोनासारख्या जागतिक महासाथींचा प्रतिकार करणाऱ्या लशी अल्पावधीत विकसित करून त्या जगभर पुरवण्याची किमयाही आपण साधली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आघाडीवर भारताने गेल्या दशकात लक्षणीय प्रगती साधली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, खगोलविज्ञान, अक्षय ऊर्जा, सेमीकंडक्टर, हवामान व अवकाश संशोधन, जैवतंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांवर आपण विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही दशकांतील जगापुढील प्रमुख आव्हाने आणि संधी या दोन्ही दृष्टींनी या क्षेत्रांना महत्त्व आहे. स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वळणावर, म्हणजे २०४७पर्यंत विकसित देश होण्याचे स्वप्न साकारण्यासाठीही या क्षेत्रांचा हातभार मोलाचा ठरणार आहे.

भविष्याची शाश्वती हा आजच्या जगापुढील सर्वाधिक चिंता व चिंतनाचा विषय आहे. त्यासाठी शाश्वत विकासाचा अनुसर अनिवार्य ठरत आहे. एकीकडे अर्ध्याहून अधिक जगाच्या विकासाकांक्षेची पूर्तता आणि दुसरीकडे त्या विकासवादातून निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य समस्या यांतून विज्ञान-तंत्रज्ञानाच मार्ग दाखवू शकणार आहे.

साथरोगप्रसार, विकोपाचे हवामान बदल, अन्न व पाण्याची टंचाई, विकासाला चालना देऊ शकणाऱ्या स्वच्छ व परवडणाऱ्या ऊर्जेची उपलब्धता, सर्वांच्या आवाक्यातील आरोग्यसेवा या जगाच्या गरजा आहेत. त्यांची उत्तरे फक्त वैज्ञानिक संशोधने आणि त्यांवर आधारित तंत्रज्ञान विकास यांमध्येच आहेत. हा विकास तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञान विकास अशा दोन मार्गांनी साध्य होईल.

जगामध्ये कोठेतरी आधीच विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा स्थानिक गरजा आणि परिस्थितीनुरूप अंगीकार व विकास म्हणजे तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण. यामध्ये नक्कल किंवा पर्याय असा अर्थ अभिप्रेत नसून, आधीच विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा स्थानिक परिस्थिती आणि वापर यांनुरूप त्यांचा अंगीकार अपेक्षित आहे.

भारतामध्ये हे स्वदेशीकरण सुरुवातीला संरक्षण उत्पादनांच्या अनुषंगाने सर्व परिचयाचे झाले. या आघाडीवर एकेक टप्पा ओलांडत आता आपण तेजस ही लढाऊ विमाने, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा यांची निर्मिती केली आहे. जगातील ८५ देशांत निर्यातीसाठीही आपली संरक्षण उत्पादने सक्षम ठरली आहेत.

भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रम हे स्वदेशीकरणाचे ठळक उदाहरण आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) स्थापन १९६९मध्ये झाली. आर्यभट्ट हा भारताचा अंतराळातील पहिला उपग्रह. तत्कालीन सोव्हिएत महासंघातील (आजचा रशिया व त्याशेजारील देशांचा संघ) अंतरिक्ष तळावरून १९७५मध्ये त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याचे संकल्पन व जुळणी भारतात केली होती.

तिथपासून उमटवत आलेल्या अवकाश तंत्रज्ञानातील प्रगतीच्या खुणा आता आणखी समृद्ध करत अवकाश प्रक्षेपकांतील ९५% सुट्या भागांची निर्मितीही मायदेशातच करण्यापर्यंत आपण मजल मारली आहे. स्वदेशीकरणाचा हाच कित्ता अन्य क्षेत्रांतही आपण गिरवत आहोत. सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात आपण आता प्रवेश करू पाहात आहोत.

आपले दैनंदिन जीवन इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी व्यापले आहे आणि सेमीकंडक्टर ही अशा प्रत्येक उपकरणातील अविभाज्यता आहे. आता मायक्रॉन टेक्नॉलॉजी या अमेरिकेतील आघाडीच्या कंपनीने याच्या प्रकल्प उभारणीचे काम गुजरातमधील साणंद येथे सुरू केले आहे.

लोकसंख्याशास्त्रीय लाभांश

लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ही भारताची दीर्घकाळ जमेची बाजू ठरत आहे. तंत्रक्षमता हे या तरुण मनुष्यबळाने सिद्ध केलेले वैशिष्ट्य आहे. परंतु ही क्षमता आतापर्यंत आघाडीच्या जागतिक कंपन्यांसाठी भारताबाहेर व मुख्यतः अमेरिकेतील त्यांच्या आस्थापनांच्या तंत्रसामर्थ्यात भर घालणारी किंवा भारतातील त्यांच्या बॅकऑफिसचे कणे मजबूत करणारी ठरली आहे. इर्न्स्ट अँड यंग या सल्लासेवा संस्थेनुसार, जगातील सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांची त्यांच्या मूळ देशांबाहेरील ४५% कार्यालये ही एकट्या भारतामध्ये आहेत.

या सामर्थ्यातून भारताचे तंत्रबाहूही जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येक नागरिकाला थेट ओळख (आधार), थेट सोय (डिजिलॉकर) आणि थेट लाभ (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर-डीबीटी) देणारे डिजिटल जाळे हे त्याचे सर्वांत ठळक उदाहरण ठरत आहे.

‘यूपीआय’सारखी आर्थिक देवघेव असो, ‘उज्ज्वला’सारख्या सरकारी योजना असो की, ‘किसान सन्मान’सारख्या सरकारी मदतीचे लाभ देणाऱ्या योजनांचे निधी हस्तांतरण असो, या सर्वांसाठी हे जाळे अलीकडील काही वर्षे सक्षम ठरत आहे. ‘इंडिया स्टॅक’ नावाने ते ओळखले जाते.

शेतकरी ऊर्जादाता

शेतकरी हा जगाचा अन्नदाता आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा आजही कणा आहे. परंतु आपल्या राष्ट्रीय सरासरीच्या एक तृतीयांश उत्पन्नात भारतातील शेतकऱ्यांना गुजराण करावी लागते. त्यामुळे तंत्रक्षमतेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचणे ही देशविकासासाठीची मोठी गरज आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुमारे पावणेचारशे कृषी तंत्रज्ञान कंपन्यांनी या प्रयत्नांत सहभाग घेतला आहे.

पीकसल्ल्यापासून उत्पादकतावाढीपर्यंत अनेकपदरी सल्ला-सेवा या स्टार्ट-अप कंपन्या देऊ पाहात आहेत. आणखी एक तंत्रज्ञानविकास या शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवू पाहत आहे, तो म्हणजे जैवऊर्जा तंत्रज्ञान. शेतीतील मूळ उत्पन्नाच्या जोडीला नासाडी झालेला टाकाऊ शेतमाल आणि जैविक कचरा यांपासून जैवऊर्जानिर्मितीला भारतात आता चालना मिळत आहे.

जैवतंत्रज्ञान विकासामुळे भारताची जैवअर्थव्यवस्था गेल्या आठ वर्षांत आठपटींनी वाढली आहे. शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवण्याची आणि देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची क्षमता या तंत्रविकासामध्ये आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशी विकासाची दिशा स्पष्ट करताना, जैवउत्पादने व हरित ऊर्जानिर्मिती यांसाठीच्या प्रोत्साहन योजनांची घोषणाही सरकारने केली आहे. ती या क्षेत्राला चालना देणारी ठरणार आहे.

संधींची कवाडे जसजशी खुली होत आहेत, तसतसे विकसित देश होण्याचे भारताचे स्वप्न साकारण्याची वेळ जवळ येत आहे. विकासाची वाट आणि त्या वाटेवर प्रयत्नशील राहण्याची चिकाटी कायम ठेवल्याचे हे फळ स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण अनुभवू लागलो आहोत. त्यापासून आजवर काहीसे दूर राहिलेले गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी (संक्षेपरूप : ग्यान) हे विकसित भारताचे चार स्तंभ राहतील, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

व्यक्तिगत स्तरावरही आपण प्रत्येकाने अपयशाच्या पायरीवर न थांबता, विज्ञान-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी-गणिताचा (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स- स्टेम) बुंधा पकडून कर्तृत्व बहरू दिले, तर विजेत्यांचा विजेता देश होण्याचे भाग्य भारताच्या भाळी आपण नक्की कोरू शकू!

(लेखक प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष असून, तीन दशके उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com