ढिंग टांग : मिस ताडोबा आणि विश्वसुंदरी..!

माघाची गुलाबी थंडी पडली होती. जंगल जागं होत होतं. मोहाच्या झाडाखाली सातबायांचा कल्लोळ सुरु झालेला. पलिकडल्या झरीच्या टोकाला असलेल्या बिळाकडे साळिंदर निघालं होतं. उजवीकडल्या पहाडाकडून दोन अस्वलं उतरली.
tadoba national park beautiful tigress
tadoba national park beautiful tigressSakal

माघाची गुलाबी थंडी पडली होती. जंगल जागं होत होतं. मोहाच्या झाडाखाली सातबायांचा कल्लोळ सुरु झालेला. पलिकडल्या झरीच्या टोकाला असलेल्या बिळाकडे साळिंदर निघालं होतं. उजवीकडल्या पहाडाकडून दोन अस्वलं उतरली. नाक वर करकरुन त्यांनी रानआंब्यावरल्या मोहराचा अदमास घेतला.

अर्जुनाच्या वृक्षावर वानरांचं टोळकं उगीच वेळ काढत होतं. पाणवठ्याकडे काळवीटांचा एक कळप निघाला. पाण्याशी पोचण्यापूर्वी फॉरेस्टाच्या जीपगाडीचा मातीचा रस्ता ओलांडावा लागतो. एका झेपेत तो ओलांडून जीव खाऊन पळायचं, हा काळवीटांचा परिपाठच आहे. तेवढ्यात-

(नेहमीप्रमाणे) नेपतीच्या झुडपात खसफस झाली, आणि दोन वाघांचं मुस्कट दिसू लागलं. दोघंही डुलत डुलत पाणवठ्याजवळच्या कातळावर येऊन पडले. प्राण्यांची निळावंती नावाची भाषा असते. आम्हाला ती थोडी थोडी येते. (आम्हाला काय, कुठल्याही भाषा येतात.) त्यांच्यात जो संवाद झाला, त्याचा मराठी तर्जुमा देत आहो :

मिसेस वाघ : (मिश्यांवर जीभ फिरवत) मी म्हणत्ये, लाज सोडायची ती किती? कुठं गेला होतात रात्रभर शेण खायला?

मिस्टर वाघ : (पडेल चेहऱ्यानं) काहीही काय बोलताय? ताडोबा फेस्टिवल चालला होता, डोकावलो घटकाभर, एवढंच! वाघांनाही थोडं मनोरंजन लागतंच ना?

मिसेस वाघ : (फणकारुन) मी पण जाऊ का मध्यप्रदेशात मनोरंजन करुन घ्यायला? तुम्हाला त्या कॉलरवाल्या वाघिणीसारखीच कुणीतरी गावभवानी मिळायला हवी होती! (मुसमुसत) मी म्हणून आयुष्यभर सहन केलं! माझं मेलीचं नशीबच फुटकं!!

मि. वाघ : (करवादून) कशाला पराचा कावळा करताय? मुनगंटीवारसाहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम ऐन जंगलात घेतला, म्हणून सहज बघायला गेलो होतो...

मिसेस वाघ : (संतापून) मुनगंटीवारसाहेबांचं नुसतं नाव! त्या विश्वसुंदऱ्या गोळा झाल्या म्हणून गेलात शेपटी हलवत!!

मि. वाघ : (बेसावधपणे) उगीच नाही कुणी विश्वसुंदरी होत!! त्यांनी नुसतं स्टेजवर येऊन अभिवादन केलं तर जंगल उचंबळून आलं होतं...त्या स्पेनच्या सुंदरीला तर जाऊन सांगावंसं वाटलं!

मिसेस वाघ : (संतापाचा कडेलोट) घुर्रर्र...घुर्रर्र...हॉऽऽ...!

मि. वाघ : (डोळे मिटून भावविवश होत) अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती, अम्ही सुंदर झाऽऽलो असतो...!!

मिसेस वाघ : (बेभान होत) कळतात बरं ही बोलणी! तरी बरं, तरुण होत्ये, तेव्हा पेंच, कान्हाकिसली, पन्ना, कित्तीतरी अभयारण्यातून मला चांगले चांगले उपवर वाघ सांगून आले होते! एक तर जिम कॉर्बेट रिटर्न होता!! पण मी तुमच्या गळ्यात शेपटी घातली!!

मि. वाघ : (चालूगिरी करत) आजही तुम्ही काही कमी सुंदर दिसत नाही, बाईसाहेब! तुम्ही मारलेला ससाही मी चवीनं खातो की नाही? गेल्या पावसाळ्यात मी तुमच्यासाठी आख्खा काळवीट लोळवला होता, विसरलात वाटतं!!

मिसेस वाघ : (चिडून) ‘टी-वन’नं केली होती ती शिकार! बिचारा चोरट्या शिकारीला घाबरुन पळाला!! तुम्ही ‘आयत्या काळवीटावर वाघोबा’ झालात!! काही बोलू नका! त्या विश्वसुंदऱ्यांनी काय केलं ते सांगा आधी!!

मि. वाघ : (सारवासारव करत) काऽऽही नाही! वाघांची संख्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु म्हणाल्या!! मुनगंटीवारसाहेबांना थँक्यू म्हणाल्या!! त्यांच्यामुळेच ताडोबात वाघांची संख्या वाढतेय, असं त्या रवीनाबाई टंडनदेखील म्हणाल्या!! खरंच, मानलं पाह्यजे मुनगंटीवारसाहेबांना!!

मिसेस वाघ : (डोळे वटारत) जळ्ळं लक्षण! मी आता ठरवलंय!!

मि. वाघ : (कंटाळून) काय ठरवलंय तुम्ही?

मिसेस वाघ : (निर्धाराने) मीच जाऊन मुनगंटीवारसाहेबांसमोर उभी राहणार आहे!! वाघांच्या वाढीचं खरं कारण त्यांना तरी कळू दे!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com