‘हीरो’विना पिक्‍चर! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 February 2019

तमिळनाडूतील राजकारणात ‘ग्लॅमर’चे महत्त्व खूपच आहे; परंतु यंदा त्याची उणीव भासते आहे. राष्ट्रीय पक्षांनी अपेक्षेप्रमाणे आघाड्या केल्या असल्या, तरी राजकीय चित्र धूसर आहे.

तमिळनाडूतील राजकारणात ‘ग्लॅमर’चे महत्त्व खूपच आहे; परंतु यंदा त्याची उणीव भासते आहे. राष्ट्रीय पक्षांनी अपेक्षेप्रमाणे आघाड्या केल्या असल्या, तरी राजकीय चित्र धूसर आहे.

तमिळनाडूच्या राजकारणातील दोन अत्यंत शक्‍तिशाली नेते आणि एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी एम. करुणानिधी आणि जे. जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर बरीच ‘भवति न भवति’ झाल्यावर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांनी आपले सहकारी निवडले आहेत. भाजप हा जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाबरोबर जाणार, अशी चिन्हे दिसत होतीच आणि जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात नेतृत्वासाठी जी काही चढाओढ सुरू झाली, तेव्हा भाजप त्यात बरेच लक्ष घालत होता. आता झालेल्या समझोत्यानुसार तमिळनाडूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुक निवडणुका लढवणार असला, तरी या जागावाटपात भाजपच्या वाट्याला अवघ्या पाच जागा आल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेसच्या पदरात नऊ जागा आल्या आहेत. द्रमुकच्या सहाय्याने तो पक्ष लढेल. तमिळनाडूत लोकसभेच्या एकूण जागा ३९ असून, गेल्या लोकसभेत जयललिता यांनी त्यापैकी ३७ जागा जिंकून विक्रम केला होता. अर्थात, तमिळनाडूत या दोन प्रतिस्पर्धी पक्षांनीच सारा राजकीय अवकाश व्यापून टाकल्यामुळे, राष्ट्रीय पक्ष त्यांच्यामागे फरफटत जातात. कधी या तर त्या पक्षाबरोबर समझोता करत असतात. त्यामुळे या दोन आघाड्या अपेक्षेप्रमाणेच झाल्या असल्या, तरी यंदा या निवडणुकीस आणखी एक आणि तमीळ राजकारणाला साजेसा असा ‘फिल्मी’ पदरही प्राप्त होऊ घातला होता. केवळ तमीळच नव्हे, तर अवघ्या दाक्षिणात्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रजनीकांत या ख्यातकीर्त अभिनेत्याने थेट राजकारणात उडी घेतल्यापासून भाजपचे नेते त्याला वश करण्याच्या प्रयत्नात होते. रजनीकांत खरोखरच निवडणुकीच्या मैदानात उतरला असता, तर तेथे नेमके काय झाले असते, हे सांगता येणे कठीणच होते. मात्र, प्रचाराची रंगत भलतीच वाढली असती, यात शंका नाही. पण, ऐनवेळी रजनीकांतने निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आणि आता प्रचारातील ड्रामेबाजी ‘बॉक्‍स ऑफिस’वर पिक्‍चर रिलीज होण्याआधीच काहीशी संपुष्टात आली आहे. प्रकाश राज आणि कमल हसन हे अभिनेते ती कसर कितपत भरून काढतात, ते बघायचे!

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत जयललिता यांनी जे काही अभूतपूर्व यश मिळविले होते, तेव्हा त्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांच्या कारभारावर तमीळ जनतेने केलेले हे शिक्‍कामोर्तब होते. १९६२ मध्ये तेव्हाच्या मद्रास प्रांतात आणि आताच्या तमिळनाडूत काँग्रेसने ३१ जागा जिंकून विक्रम केला होता. त्यानंतर जयललिता यांनी मिळवलेले हे मोठे यश होते. अर्थात, द्रमुकचा पराभव तेव्हा अटळच होता; कारण हा पक्ष तेव्हा डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ सरकारमध्ये सहभागी होता. त्या सरकारवर ‘टू-जी स्पेक्‍ट्रम’ गैरव्यवहाराचे मोठे सावट होते आणि तेव्हा दूरसंचार खात्याची जबाबदारी सांभाळणारे द्रमुकचे नेते ए. राजा यांच्यावर बालंट येऊन त्यांना काही महिने गजाआडही जावे लागले होते. त्या काळात उजेडात आलेल्या अनेक गैरव्यवहारांपैकी हा एक मोठा गैरव्यवहार होता. त्यामुळे द्रमुकचे पानिपत अटळ होते. मात्र, नंतरच्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि मुख्य म्हणजे अण्णाद्रमुक आणि द्रमुक या पक्षांचे ‘सुप्रिमो’ अनुक्रमे जयललिता व करुणानिधी हे काळाच्या पडद्याआड गेले. करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुकची धुरा त्यांचे चिरंजीव स्टॅलिन यांच्याकडे आली. मात्र, जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये पक्ष ताब्यात घेण्यासाठी झालेली सुंदोपसुंदी आणि शह-काटशहाचे राजकारण यामुळे त्या पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

रजनीकांतने ‘रजनी मक्कल मंदरम’ ही संघटना काढल्यानंतर त्याच्या राजकीय ‘एन्ट्री’बाबत सुरू झालेल्या तर्कवितर्कांना तूर्त पूर्णविराम मिळाला असला, तरी २०२१ मध्ये होणारी तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक लढवण्याचा इरादा त्याने पूर्वीच जाहीर केला आहे. मात्र, ‘तमिळनाडूमधील पाणीप्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकेल, असा विश्‍वास असणाऱ्या पक्षालाच जनतेने मतदान करावे. मी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे माझी छायाचित्रे आणि संघटनेच्या झेंड्याचा राजकीय कारणांसाठी कोणीही वापर करू नये,’ असे रजनीकांतने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पंचाईत झाली असणार ती भाजपचीच; कारण रजनीकांतची विचारसरणी ही हिंदुत्वाच्या राजकारणाला अनुकूल अशी आहे. अर्थात, रजनीकांत रिंगणात नसला, तरी अभिनेता प्रकाश राज निवडणूक लढवणार आहे. त्याशिवाय कमल हसन या वेळी प्रचारात नेमकी काय भूमिका घेतो, याकडेही तमिळनाडूतील मतदारांचे लक्ष आहे. पण एकंदरीत राजकीय पातळीवरही नेतृत्वाची वानवा आणि त्यातच रजनीकांतची अलिप्तता यामुळे तमिळनाडूतील निवडणुका ‘हीरो’विना पार पडणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamil nadu lok sabha election and glamour in editorial