- डॉ. नीलिमा गुंडी
मराठीच्या साहित्यविश्वातील टोपणनावांमागे सांस्कृतिक स्वरूपाचे विविध रंग लपलेले आहेत. एकोणिसाव्या शतकातील विचारवंत व समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख यांनी ‘प्रभाकर’ या साप्ताहिकातून लेखन केले होते. त्यांनी समाजसुधारणा व्हावी, या कळकळीने शंभरहून अधिक पत्रे ‘लोकहितवादी’ या टोपणनावाने लिहिली. त्या टोपणनावातून त्यांची सामाजिक भूमिका व्यक्त झाली आहे.
एकेकाळी कवींना स्वतःची ओळख लपवायला टोपणनावाची गरज वाटत असे; कारण कवितेत ‘प्रथमवचनी प्रयोग’ (‘मी’ असा संदर्भ) आला की वाचकांना तो त्या कवीचा वैयक्तिक अनुभव वाटत असे ! काही वेळा उलटही असे. आपण कवी - म्हणजे इतरांपेक्षा वेगळे - आहोत; याची जाणीव करून देण्यासाठीही टोपणनाव मिरवावेसे वाटे ! वाङ्मयाच्या इतिहासाला टोपणनावांमागील सांस्कृतिक संदर्भांचे एक अस्तरच लगडलेले दिसते.
कौटुंबिक नातेसंबंध जपण्याची प्रवृत्ती काही टोपणनावांमध्ये दिसते. उदा. कृष्णाजी केशव दामले यांनी ‘केशवसुत’ या टोपणनावाद्वारे आपल्या वडिलांना मोठेपणा दिला आहे. वि. वा. शिरवाडकर यांनी काव्यलेखनासाठी घेतलेल्या टोपणनावातून त्यांच्या बहिणीचे नाव सर्वतोमुखी झाले आहे. काशीनाथ हरी मोडक या कल्याण येथील कवींनी ‘माधवानुज’ असे टोपणनाव घेऊन आपल्या भावाची ओळख ठळक केली आहे. यामागे नम्रताही आहे.
रविकिरणमंडळातील कवयित्री मनोरमाबाई रानडे यांनी ‘गोपिकातनया’ हे आईचा उल्लेख असलेले टोपणनाव स्वीकारून स्वतःतील स्त्रीत्वाचे आधुनिक वळण लक्षात आणून दिले आहे. राम गणेश गडकरी यांनी कविता लिहिताना 'गोविंदाग्रज' असे टोपणनाव घेतले. पुढे वि.वा शिरवाडकर यांनी 'कुसुमाग्रज' हे टोपणनाव घेताना आपल्या प्रतिभेची जातकुळी 'गोविंदाग्रज' यांच्या सारखी पल्लेदार आहे; हे त्यांना टोपणनावातून सुचवायचे असावे.
डॉ. माधवराव पटवर्धन या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाच्या साहित्यिकांनी काव्यलेखनासाठी ‘माधव जूलियन’ हे टोपणनाव स्वीकारले. त्यामागे वेगळे सांस्कृतिक संदर्भ आहेत. मेरी काॅरेलीच्या ‘गाॅड्स गुड मॅन’ या कादंबरीतील कवी ज्युलियन अॅडरले ही व्यक्तिरेखा माधवरावांना स्वतःशी साम्य असलेली म्हणून पसंत पडली होती. त्यांनी काही समीक्षालेख ‘प’ या टोपणनावाने लिहिले आहेत, हे फार थोड्या लोकांना माहीत असेल. त्यांनी ‘प्रगति’ या साप्ताहिकातून काव्यचिकित्सा केली होती. रा. श्री. जोग यांनीही ‘निशिगंध’ या टोपणनावाने कविता व ‘श्री. साहित्यसेवक एम.ए.’ या टोपणनावाने समीक्षालेखन केले होते. म्हणजे कवींप्रमाणे काही समीक्षकांना देखील टोपणनाव गरजेचे वाटले होते.
सामाजिक दडपणामुळे टोपणनाव घेऊन लेखन केलेल्या मालतीबाई बेडेकर यांना कोण विसरेल? सामाजिक वास्तवाचे आणि स्त्रीप्रश्नाचे प्रखर भान असणाऱ्या मालतीबाई काळाच्या पुढे होत्या. त्यांचा ‘कळ्यांचे निःश्वास’ (१९३३) हा कथासंग्रह ‘विभावरी शिरूरकर’ या टोपणनावाने आला. त्याकाळी त्यांना झालेल्या टोकाच्या विरोधाची कल्पना आपल्याला ‘विभावरीचे टीकाकार’ हे पुस्तक वाचताना येते.
आरती प्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर), ‘बलुतं’कार दया पवार (दगडू पवार), चारुता सागर (दिनकर भोसले) या टोपणनावांच्या साहित्यिकांना काही वेळा अज्ञानामुळे ‘लेखिकांची सूची’ मध्ये स्थान मिळालेले दिसते! ग्रेस ( माणिक गोडघाटे), दादूमियाॅ (बडोद्याचे लेखक डॉ दा. वि. नेने ), पी. सावळाराम (निवृत्तीनाथ पाटील) यांची टोपणनावे अमराठी वळणामुळे लक्ष वेधून घेतात.
जयवंत दळवी यांनी ‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव घेऊन अनेक वर्षे ‘ललित’ मासिकातून मार्मिक विनोदी लेखन केले होते. त्यांच्याआधी ‘पुरुषराज अळूरपांडे’ या टोपणनावाने पु. ल. देशपांडे, रा.वा. अलुरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष यांनी ‘अभिरुची’मधून मिश्कील विडंबनपर सदर चालवले होते.
नंतर अभिरुचीच्या दुसऱ्या पर्वात (१९६६ नंतर) मं. वि. राजाध्यक्ष आणि द. ग. गोडसे यांनी ‘निषाद आणि शमा’ या टोपणनावाने सदर चालवले. (‘शमा’ म्हणजे गोडसे व्यंग्यचित्रे काढत.) याविषयी मं. वि. राजाध्यक्ष (निषाद ) यांनी ‘वादसंवाद’ (२००३) मध्ये लिहिले आहे : ‘नाही तरी हे बुरखे, कितीही बंदोबस्ताने चढवले, तरी काही काळाने विरतात. तत्पूर्वी चाणाक्ष मंडळी ठेवणीवरून, चालीवरून माणूस ओळखतात म्हणे!’, हे त्यांचे उद्गार खरेच आहेत. फक्त त्यासाठी वाङ््मय क्षेत्राविषयी जिज्ञासा असलेला तल्लख वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर असायला हवा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.