
डॉ. कुमार सप्तर्षी
समाज काळानुरूप नित्य बदलत असतो. विशिष्ट कालखंडात तत्कालीन आव्हाने स्वीकारून काही थोर माणसे आपले जीवन समाजाला समर्पित करतात. समाज त्यांना सकारात्मक प्रतिसाद देतो. देशात, महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात लोकमान्य टिळक या महापुरुषांचा जमाना होता. त्याला इतिहास ‘टिळक युग’ या नावाने अधोरेखित करतो. १९१५ ते १९२० हा टिळक युग संपून गांधी युग प्रारंभ होण्याचा संधिकाळ म्हणता येईल. त्या काळात काही कट्टर टिळक पंथीय भक्त गांधीयुगाला अडविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत. परंतु या संधिकाळात तारुण्यात पदार्पण केलेले काही प्रगल्भ युवक मात्र मावळत्या आणि उगवत्या अशा दोन्ही तेजोगोलांची आंतरिक संगती जाणून दोन्ही महापुरुषांना आपल्या आयुष्याचे अर्घ्य वाहत होते. त्यापैकी पुण्यातील एक महत्त्वाचा तरुण म्हणजे त्र्यंबक रघुनाथ देवगिरीकर उर्फ मामासाहेब देवगिरीकर!