डॉ. सुलभा ब्रह्मे : डाव्या चळवळीचे बौद्धिक साधनकेंद्र

अजित अभ्यंकर
शनिवार, 3 डिसेंबर 2016

डाव्या चळवळीच्या विविध विषयांवरील भूमिकांच्या समर्थनासाठी बौद्धिक- वैचारिक हत्यार ठरू शकेल, असे साहित्य निर्माण करणे, हे सुलभाताई ब्रह्मे यांचे मिशन होते.

डाव्या चळवळीच्या विविध विषयांवरील भूमिकांच्या समर्थनासाठी बौद्धिक- वैचारिक हत्यार ठरू शकेल, असे साहित्य निर्माण करणे, हे सुलभाताई ब्रह्मे यांचे मिशन होते.

कोणत्याही व्यावसायिक किंवा सेवाभावी ध्येयासाठी व्यग्र असणाऱ्या व्यक्ती आपण नेहमीच पाहतो. पण व्यक्ती आणि तिचा उपक्रम यांच्यातील भेदरेषाच संपून गेलेली आहे, अशा व्यक्ती विरळाच. डॉ. सुलभा ब्रह्मे या "डाव्या चळवळीसाठी बौद्धिक साधननिर्मिती' या ध्येयाशी, उपक्रमाशी एकरूप झाल्या होत्या. त्यांना ध्येयनिष्ठ असे म्हणणे चूक आहे, कारण त्या स्वतः आणि त्यांचे ध्येय यांच्यात भेदरेषाच नव्हती. Self Actualization किंवा स्वत्त्वप्राप्ती असेच त्यांच्या मनोवस्थेचे वर्णन करावे लागेल. त्यांचा नि माझा परिचय मी बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी असल्यापासून म्हणजे, 1975-76 पासून झाला. त्या वेळी त्या गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्थेमध्ये संशोधक म्हणून काम करत होत्या. त्यांच्याकडे सामाजिक-आर्थिक संशोधन प्रकल्पांचे काम असायचे. त्यात सहभागी कार्यकर्त्यांचा राबता त्यांच्या त्या संस्थेतील छोट्या खोलीमध्ये असायचा. त्या वेळी त्यांना पाहिले ते अत्यंत नेमका आणि तर्कनिष्ठ संवाद करणाऱ्या व्यक्ती म्हणून. त्या वेळी संगणक इत्यादी काहीच नसल्याने त्यांच्या त्या खोलीमध्ये जुने आर्थिक ग्रंथ, विविध मासिके, निबंधांच्या टंकलिखित प्रती यांचे अक्षरशः ढिगारे असायचे. त्या जुन्या कागदांचा एक विशिष्ट दर्प असायचा. त्या सर्व छापील-टंकलिखिताचेच आमच्यावर दडपण यायचे.
पुढे चळवळीत अधिक सक्रिय झाल्यावर त्यांच्या लेखनाचा अधिक परिचय होऊ लागला.

डाव्या चळवळीच्या विविध विषयांच्या समर्थनासाठी बौद्धिक वैचारिक हत्यार ठरू शकेल, असे साहित्य निर्माण करणे, हे त्यांचे मिशन होते. हे साहित्य त्या त्या विषयाचा ऐतिहासिक आढावा, आकडेवारी, सैद्धांतिक मुद्दे यांच्यासहित परिपूर्ण करण्याचा त्याचा सतत प्रयत्न असायचा. राखीव जागांचे समर्थन, राष्ट्रीय एकात्मता, डंकेल प्रस्ताव, जागतिक व्यापार संघटना, इराकवरील अमेरिकेचे आक्रमण, एन्रॉन करार, खासगीकरण- उदारीकरणाचा खरा अर्थ, बहुराष्ट्रीय कंपन्या, साम्राज्यवाद, बेरोजगारी, असे कितीतरी विषय सांगता येतील. चळवळीशी संबंधित असा कोणताच विषय नसेल, की ज्यावर सुलभाताईंनी पुस्तिके लिहिली नाहीत. त्याचा आकार साधारण 32 ते 64 पाने इतका असायचा. काही अपवाद वगळता, त्याचे संपूर्ण लेखन- संशोधन, मुद्रित तपासणी, प्रकाशन वितरण सर्व काही त्या स्वतः करत. चळवळीची भूमिका म्हणून त्यातील मुद्दे आणि आकडेवारी यातील अचूकता आणि नेमकेपणा या बाबतीत त्या लेखनाचा दर्जा उत्तम असे. महाराष्ट्रातील संघटित अशा डाव्या पक्षांच्या तुलनेत सुलभाताईंनी केलेले हे कार्य खूपच मोठे होते. त्यातून डाव्या चळवळींना बळ मिळाले.

नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांची कन्या किंवा उच्चशिक्षित महिला म्हणून उच्चभ्रूपणाची भावना त्यांच्यात कधीच नव्हती. त्यांची राहणी साधी होती. सुलभाताईंचे वैशिष्ट्य असे, की त्यांना अभ्यासक, लेखक आणि संघटक या तिन्ही भूमिका तितक्‍याच पटत किंवा आवडत. लोकविज्ञान संघटना, जागतिकीकरणविरोधी कृती समिती, पुरोगामी स्त्री संघटना, दुष्काळ निवारण समिती, किंवा त्या त्या वेळी स्थापन झालेल्या कितीतरी समित्या यांच्यामध्ये त्या एखाद्या संघटक कार्यकर्त्याप्रमाणे सहभागी असत. स्वतःचे राहते मोठे घर हेसुद्धा त्यास सोन्याची किंमत येत असतानाही त्यांनी मूळ स्वरूपात जतन केले आणि त्यालाच चळवळीचे केंद्र बनविले. तन-मन- धन आणि कुशाग्र बुद्धिमत्ता या सर्वस्वाने त्या चळवळीशी एकरूप होत्या. हे जीवनतत्त्व एकूणच डाव्या चळवळीचे सार्वत्रिक वैशिष्ट्य असले, तरी सुलभाताईंकडे या सर्वच क्षमता मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे ते योगदान मोठे ठरते. त्यांचा स्वभाव खूपसा एकल स्वरूपाचा होता.

कार्यकर्ते वगळता त्यांच्या वैयक्तिक संवादात किंवा संपर्कातदेखील फारसे कोणी असल्याचे मी तरी पाहिलेले नाही. कार्यकर्ते म्हणून होणारा संवाद वगळता, त्या मितभाषीच होत्या. त्यांचा दैनंदिन सामाजिक स्थितीचा अनुभव हा कार्यकर्त्यांकडून परावर्तित असा असल्याने त्यावर काही निश्‍चित स्वरूपाच्या मर्यादा येत असत. त्याचा परिणाम माझ्या मते त्यांच्या काही विषयांवरील मतांवर आणि त्यांच्या कार्याच्या परिणामकारकतेवर निश्‍चितच होत असावा. त्यामुळेच सुलभाताईंची त्या त्या विषयांतील मते खूपशी पक्की असत. मात्र त्यांना व्यक्तिसुलभ असा अहंकाराचा स्पर्शदेखील नव्हता. त्यांना जर तार्किक पातळीवर काही पटले नाही, तर त्या तसे स्पष्ट सांगतील, किंवा तुमचे त्यांच्याशी कितीही मतभेद होऊ शकतील. पण त्यात वैयक्तिक कटुता नसे.
सुलभाताईंच्या जीवनाप्रमाणेच त्यांचा मृत्यूदेखील अत्यंत साधाच होता. एका कार्यकर्त्याशी फोनवरून बोलल्या. त्याला काही कामासाठी घरी बोलाविले, पण तो तेथे पोचेपर्यंत त्यांचे निधन झालेले होते. चळवळीसाठी बौद्धिक आघाडीवर वाहून घेऊन काम करावे लागते, याचा आदर्श त्यांनी घालून दिला, त्या मार्गावरून जात राहण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते.

Web Title: tribute to sulbha brahme